रामराज्य (भाग 12 अंतिम) ©संजना इंगळे

marathi katha, story of a marathi family, story of a joint family, ramrajya, lord rama, must read marathi story
Ramrajya

घरात आजवर सर्वजण संकुचित विचार करत होते, पण आता सर्वांना एक ध्येय मिळालं होतं…सर्वजण एका ध्येयाने भारले गेले होते.

जमिनीचा विस्तार खूप मोठा होता आणि मोक्याच्या ठिकाणी होता, महेश चं असं म्हणणं होतं की जमिनीवर काही डेव्हलप केलं तर पिढ्यान्पिढ्या आपल्या कुटुंबाला ते अजून वाढवता येईल…आणि जर विकली तर जो पैसा येईल तो या पिढीतच संपेल. जमिनीवर काहीतरी डेव्हलप करावं हाच त्यांचा निर्णय झाला.

सासरेबुवा चिंतेत दिसत होते…

“करुणा…. मुलं फार उत्साहाने सर्व करताय, पण त्यांना यश येईल ना? काही नुकसान झालं तर?”

“बाबा…तुम्ही विश्वास ठेवा…तुमची मुलं एक खूप मोठं साम्राज्य उभं करतील…”

करुणा जरी बाबांना आधार देत असली तरी तिच्याही मनात धाकधूक होतीच, पण चौघ्या भावांचं बोलणं तिने ऐकलं…

“दादा…इतकी मोठी जमीन आहे…यावर काहीतरी उभं करायचं, नुकसान झालं तर परवडणार नाही…असं काहीतरी करू की आपली मिळकतही चालू राहील आणि त्या पैशातून पुढचं भांडवल उभं करता येईल….”

“मी एक सुचवतो” विशाल म्हणतो…

“आपण या जमिनीच्या एका भागात एक मोठी इमारत उभी करू, तिथून विकल्या जाणाऱ्या फ्लॅट मधून आपल्याला एक रक्कम मिळत जाइल… ती रक्कम आपल्याला भांडवल म्हणून वापरता येईल…इमारतीच्या खाली काही गाळे आणि ऑफिसेस बांधू…तिथे आपल्याला स्वतःचा व्यवसाय करता येईल…”

विशाल ची कल्पना सर्वांनाच आवडली…सर्वांची सहमती झाली…करुणा वहिनींना तसं सांगण्यात येतं…

“विशाल भाऊजी, खूप छान कल्पना दिली तुम्ही, आता एक लक्षात घ्या…पुढचे सगळे व्यवहार तुम्हीच करायचे, अश्या व्यवहारी कामात एखादा अनुभवी व्यक्ती असलेला चांगला…”

विशाल ला एकदम जबाबदार चं भान आलं, त्याला खूप मोठा मान आज मिळाला, त्याच्यावर पहिल्यांदा कुणीतरी इतका मोठा विश्वासच टाकला होता….

विशाल ने बाबांकडे एकदा पाहिलं, बाबा यावेळी काही बोलले नाही याचं त्याला विशेष वाटलं…

विशाल ची एकत्र राहण्याबद्दल जी खंत होती ती आज मिटली…त्याला त्याचा सन्मान परत मिळाला…

एक दिवस अचानक मनाली चे आई वडील घरी आले…

“मनाली साठी आम्ही एक घर बघितलं आहे, तिला आता तिकडे राहायला नेतोय…इथे तिची किती घुसमट होतेय हे माहितीये आम्हाला…तिचे आई वडील जिवंत आहेत म्हटलं अजून…”

मनाली सोबत भूतकाळात झालेला अन्याय आजही त्यांच्या लक्षात होता..ते कायम मनाली ला वेगळं राहण्यासाठी उकसावत असायचे, गेले काही दिवस मनाली कडून काही प्रतिसाद न आल्याने तिच्या आई वडिलांना वाटलं की मनालीवर खूप मोठं संकट आलंय आणि त्यांनी तडक तिच्यासाठी घराची सोय करून घेतली..

त्यांचं असं अवसान पाहून घरातले सगळे घाबरतात..मनाली पुढे येते..

“आई बाबा काय हे? कुणी सांगितलं तुम्हाला फ्लॅट घ्यायला?”

“तुझे हाल बघवत नाही आम्हाला, किती दिवस अजून सर्वांचं करणार तू? आता तर 2 माणसं अजून वाढले…” करुणा आणि राघवेंद्र कडे बघून तिचे आई वडील म्हणतात…

“आई बाबा, मला इथून वेगळं करण्यासाठी आला असाल तर आत्ताच जा इथून, मला वेगळं राहणं शक्य नाही…आज ही जी माणसं दिसतायत ना? हीच माझी खरी संपत्ती आहे…या छोटू मूळे मला मातृत्वाचं सुख मिळालं… करुणा वहिनीने बहिणीसारखं प्रेम दिलं…वृषाली अन तारा ने मला योग्य तो मान दिला…आज मी खूप आनंदी आहे या घरात…वेगळी राहिले असते तर मिळालं असतं हे सगळं??”

मनाली च्या आई वडिलांना समजेना, असं काय झालं अचानक की मनालीचा निर्णय एकदम बदलला?

दुसरीकडे विशाल ने सांगितल्या प्रमाणे इमारत उभारली जात होती, फ्लॅट ला लगेच ग्राहक मिळाले अन भांडवल तयार झालं…वृषाली साठी खालच्या गाळ्यात एक मोठ्या बुटीक साठी व्यवस्था करण्यात आली, तारा ला स्वतःचं ऑफिस बांधून देण्यात आलं..महेश आणि प्रताप दोघांनी मिळून हॉटेल बांधण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली…त्यानं यश मिळत गेलं…हातात पैसा येऊ लागला…राघवेंद्र कडे व्यवसायाची महत्वाची सूत्र दिली गेली…आता तोही कामाला लागला होता….

अशातच एकदा वृषाली ची बहीण आणि तिच्या सासरचे वृषाली ला भेटायला आले, भेटायला कसले, तिचे गार्हाणे घेऊन आले..

“वृषाली, बघ तुझी बहीण…नवऱ्याचे सतत कान भरत असते की वेगळं राहूया…तिला म्हटलं मी, तुझ्या बहिणीचं शिक जरा…कसं रामराज्य उभं केलंय त्यांनी…आणि तू बघ…”

वृषाली ला धड आपल्या बहिणीची बाजू घेता येईना, ना तिच्या सासरच्यांची…

इतक्यात सासरेबुवा तिथे आले आणि त्यांच्या कानावर सगळं गेलं..

“काय तक्रार आहे तुमच्या सुनबाई बद्दल?”

“घरात ती तिच्याच धुंदीत असते, घरात सासू सासरे आहेत, त्यांच्याकडे बघायच, त्यांची सेवा करणं सोडून जाते निघून जॉब ला…जरा काही बोललं की रडायला येतं…आम्ही काही बोललेलं सहन होत नाही, आमच्या वेळी आम्ही दिवसभर सासूचे टोमणे ऐकूनही एक शब्द बोलायचो नाही…आणि आता समजलं की ही तिच्या नवऱ्याला वेगळं राहण्यासाठी आग्रह करतेय…आता तुम्हीच सांगा…तुम्ही इतकं छान एकत्र राहताय, कधी वृषाली ने केली तक्रार??”

सासरेबुवांना काय समजायचं ते समजतं..

“मी एक सल्ला देतो…त्यांना वेगळं राहायला सांगा…”

“काय? अहो तुम्ही स्वतः एकत्र राहता, रामराज्य घडवता आणि दुसऱ्याला असं सांगता??”

“रामराज्याच्या कौसल्या होती तशी कैकयी सुद्धा होती…कौशल्याचं ध्येय उदात्त होतं म्हणून तिची पुजा केली गेली..पण कैकयी ची दृष्टी संकुचित होती, म्हणून भरतानेही तिचा त्याग केला…

केवळ आई किंवा वडील आहेत म्हणून अंधपने त्यांचा समोर झुकणारे राम लक्ष्मण नव्हते…आई वडीलही जर चुकले तर त्याचा त्याग करण्याची हिंमत त्यांच्यात होती…आमच्या हिने सर्व सुनांना मुलीप्रणाने वागणूक दिली होती, या सुनांकडून थोडं काही चुकलं तरी कधीही टोमणा मारला नाही की कधी त्यांच्या नवऱ्यांचे कान भरले नाहीत…आणि तुम्ही? तुमच्या बोलण्यावरूनच समजतंय की तुम्ही तिला कशी वागणूक देताय ते…जिथे रामाला केंद्रस्थानी ठेवून पूजा केली जाते तिथेच रामराज्य घडते…आपण असुरा प्रमाणे वागत दुसऱ्याकडून रामराज्याची अपेक्षा करू शकत नाही…”

वृषाली च्या बहिणीला अभय देऊन सासऱ्यांनी त्यांना निरोप दिला…बाबांचं हे रूप सर्व सुना पहिल्यांदा पाहत होत्या…त्यांचं बोलणं शत प्रतिशत खरं होतं… रामराज्य घडवायचं म्हणजे मनात राम असायला हवा, रावणाचे विचार घेऊन कुणी रामराज्य घडवू शकत नाही, त्याच्या लंकेचं दहनच करावं लागतं…

3 वर्षांनी….

“2023 सालच्या सर्वोत्कृष्ट उद्योजक चा पुरस्कार जात आहे..”सुर्यवंशी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज” ला..सुटबुटातला विशाल अवॉर्ड घ्यायला जातो…चौघी सुना भरजरी पैठणी घालून आणि अंगावर तोळाभर दागिने घालून मिरवत होत्या…त्यांच्या श्रीमंतीने नातेवाईक अन शेजार पाजाऱ्यांचे डोळे दिपून गेले होते. विशाल ला आत्मसन्मान मिळाला होता…

“मयंक…अरे कुठे पळतोय….ये इकडे….”

1 वर्षाच्या मयंक च्या मागे पळता पळता मनाली च्या नाकी नऊ आलेले…वृषाली अन तारा म्हणतात..

“वहिनी ची कूस उजवली….देवाची कृपा म्हणायची…”

“होना…घर अगदी गोकुळ बनलंय…”

“अजून कुठे…आता तुझा नंबर बाकिये की..”

“जा ओ वहिनी….” तारा लाजत लाजत म्हणते…

आपला फोन काढत तिच्या मैत्रिणीला फोन लावते..

“अगं tv चालू कर ना…आम्ही दिसतोय का तुला??”

तीच ही मैत्रीण, जी तारा ला वेगळं राहण्यासाठी सांगत होती….

कार्यक्रम आटोपून सर्वजण घरी आले….घरातल्या नोकरांनी जेवायला वाढलं…

“करुणा वहिनी कुठेय???”

करुणा सासूबाईंच्या खोलीत होती,

“आई…आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं…बघा…तुमच्या मुलांनी रामराज्य अखेर उभं केलं…आज राज्यात केवळ याचीच चर्चा सुरू आहे…एक असा साम्राज्य उभं केलंय की पिढ्यानपिढ्या या साम्राज्याची चर्चा होत राहील….”

करुणा डोळे पुसत निघणार इतक्यात फोटोवरचं फुल हळूच करुणा च्या ओंजळीत पडतं…

समाप्त

10 thoughts on “रामराज्य (भाग 12 अंतिम) ©संजना इंगळे”

  1. अप्रतिम लेखन… प्रतिलिपी वर ही स्टोरी अपलोड करा… उत्तम प्रतिसाद मिळेल या कथेला…
    खिळवून ठेवते असे तुमचे शब्द रचना आहेत…🤗🤗👍👍

    Reply
  2. khup can katha. pan kharach aajchya date la ramrajya mhanje ashakyapray gosht ahe. goshtit sarv chan watat pan pratyakshat utravne mhanje shakya nahi

    Reply
  3. काय सुंदर कथा होती! रामराज्य कोणत्याही युगात स्थापित होऊ शकतो हे खरंय – all you need is respect for each other. आणि ही respect सगळ्यांच्या मनात रुजवणे हे घरातल्या मोठ्यांचं काम आहे.

    Reply

Leave a Comment