स्थळ, होकार आणि मध्यस्थी

रीना अगदी रडकुंडीला आली होती. तिच्यासाठी स्थळं बघणं सुरू होतं, जवळपास 9-10 स्थळं बघून झालेली, त्यात तिला काही मुलं पटेनात, काहींनी तर तिलाच नकार दिलेला. तिच्या काका, मामा, आत्या, मावशी सर्वांनी किमान एक स्थळ तरी दाखवलं होतं, पण तिची मात्र बऱ्याचदा नकारघंटा असायची.

यावेळेस आत्या मात्र चिडली,

“तुला काय आता रणबीर कपूर हवाय का? इतकी नाटकं करून चालत नाही पोरीच्या जातीने, वय होत चाललंय, प्रत्येकात काही ना काही खोट काढून नकार देते ही मुलगी..”

“आत्या रणबीर कपूर आणलास तर त्यालाही नकार देईन मी..”

तिच्या उद्धट उत्तराने आत्या तावातावाने निघून गेली. आत्याने तिच्या नात्यातील एक मोठ्या घरातलं स्थळ आणलं होतं. भरपूर श्रीमंत होते, त्यांचा मोठा व्यवसाय होता, पण मुलगा फारसा शिकलेला नसल्याने रीनाने नकार दिला. यावरून आत्याची नाचक्की झाली आणि सगळा राग रीना वर निघाला.

रीनाच्या आई वडिलांनी लग्नाचा निर्णय सर्वस्वी तिच्यावर सोपवला असल्याने ते कुठल्याही स्थळाला जबरदस्ती करणार नव्हते. एव्हाना काका, मामा रागावून निघून गेले होते, त्यांनी जवळपास अबोलाच धरला होता. पण रीना तिच्या मतावर ठाम होती.

तिच्या लग्नाच्या काळजीने तिची आई तिच्याजवळ बोलायला आली,

“बाळ, कसा मुलगा हवाय तुला?”

आईने इतक्या प्रेमळ शब्दात विचारलं की तिला रडू फुटलं, आत्तापर्यंत सर्व नातेवाईक तऱ्हेतऱ्हेचे अपमान करून गेले पण तिला समजून घेतलं नाही..

“आई, अगं मी नखरे करत नाहीये.. मलाही माहितीये की प्रत्येक मुलात काही ना काही कमी जास्त असणारच, तडजोड करायची माझी तयारी आहे..पण किमान शिक्षण, स्वकर्तृत्व आणि सुस्वभाव हे गुण एकाही मुलात असू नयेत? या माझ्या किमान अपेक्षा आहेत आई..मामांनी आणलेला तो मुलगा, शिक्षण चांगलं असूनही नोकरी करत नाहीये..व्यवसाय सुरू करायचं म्हणतोय..आता तूच सांग, शिक्षण होऊन इतकी वर्षे झाली तरी याने काहीही हालचाल केली नाही…आणि लग्नाच्या वेळेस सांगतोय व्यवसाय करणार, कसा विश्वास ठेवू मी? काकांनी एक स्थळ आणलेलं, चांगला शिकलेला आणि चांगल्या नोकरीतील होता..पण माहिती काढली तेव्हा समजलं की दोन वेळा त्याच्या घरी पोलीस येऊन गेलेले त्याने केलेल्या फ्रॉड मुळे.. अश्या मुलाला मी हो म्हणू?…नखरे करणं आणि किमान अपेक्षा ठेवणं यात फरक आहे आई..”

आईच्याही डोळ्यात पाणी आलं..

पुढे एकदा पुन्हा मामाने एक स्थळ आणलेलं, मुलगा चांगल्या नोकरीवर होता आणि सुस्वभावी होता. ते रीनाला पाहून गेले आणि उत्तर कळवायला दोन दिवसांचा अवधी दोन्ही कुटुंबांनी मागून घेतला.

“रीना, हे बघ आता गपचुप या स्थळाला होकार दे…नाहीतर बस आयुष्यभर तशीच..इतके नखरे आजवर पाहिले नाही मी कुणाचे..असंच करत राहिलीस तर होशील म्हातारी वाट बघतच..”

मामा तिच्या अंगावरच धावून आला..मामाचा हा अवतार बघून रीना घाबरली, पण लगेच पलीकडून एक आवाज आला..

“माझ्या मुलीला जबरदस्ती केलीस तर याद राख.. तिचं आयुष्य आहे, ती ठरवेल तिला कसा मुलगा हवाय ते..स्थळं आणून तुम्ही उपकार केलेत आता बास, नकोत हे उपकार.. आम्ही आमचं पाहून घेऊ…ती आयुष्यभर अशीच राहिली तरी चालेल आम्हाला..जड नाही झालेली ती..”

सर्व नातेवाईक परत गेले ते रागावूनच..

नंतर काही काळाने रीनाच्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा त्यांना भेटला, अगदी स्वप्नातला राजकुमारच जणू..उत्तम शिक्षण, नोकरी, चांगले संस्कार, दिसायला राजबिंडा, भरपूर पैसा आणि खूप बोलका…रीना ला आकाश ठेंगणं झालं.. दोघांचं थाटामाटात लग्न झालं…आत्या मामा अन काका नाक मुरडतच लग्नाला आले, मुलात काय खराबी आहे आणि आम्ही आणलेलं स्थळच कसं योग्य होतं हे शोधण्यात त्यांनी बराच वेळ घालवला पण काही निष्पन्न झाले नाही.

रीनाने नातेवाईकांच्या दबावाखाली येऊन एखाद्या बेजबाबदार मुलाला होकार दिला असता तर? आयुष्यभर कुढत बसली असती..

आपल्याही घरात असे प्रसंग घडले असावेत, आपण आणलेल्या स्थळाला होकार मिळाला तर मध्यस्थी म्हणून मोठायक्या करण्यात लोकांना काय आनंद वाटतो देव जाणे..!!! आपण आणलेल्या स्थळाला नकार देणं यांना अपमान वाटतो, तिकडे मुला मुलींच्या भविष्याचा प्रश्न असतो याच्याशी त्यांना मतलब नसतो, आपण आणलेलं स्थळ पसंत व्हावं आणि चारचौघात आपल्याला मान मिळावा यासाठी मुलगा-मुलगी किती चांगले आहेत, घर किती छान आहे हे रंगवून रंगवून सांगितलं जातं… आणि मग सगळं झाल्यावर दाखवलेल्या पैकी काहीच दिसत नाही तेव्हा सारवासारव करतात…मुला मुलींच्या संसारात उद्या काही कमी जास्त झालं तर ही माणसं पुढे येत नाहीत, हळूच बाजूला होतात..

“मी दिलेला शब्द” त्यांना महत्वाचा वाटतो, मग त्या दबावाखाली कित्येक अबोल जोडपी भरडली जातात, नाईलाजाने होकार देऊन पदरी पवित्र करून घेतात. अश्या वेळी आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना साथ देणं खूप महत्त्वाचं आहे..बरोबर ना?

4 thoughts on “स्थळ, होकार आणि मध्यस्थी”

Leave a Comment