साडीचे दुकान

“सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका, ग्राहकाला कोणता माल विकता येईल याचा अंदाज आधी घ्यायचा. म्हणजे एखादा मध्यमवर्गीय असेल तर त्याला हजार दोन हजार च्या रेंज चे कपडे दाखवायचे, एखादा श्रीमंत वाटत असेल तर त्याला पाच हजाराच्या पुढचे कपडे दाखवायचे…एखादा अगदीच गरीब वाटत असेल ते त्याला अगदी दुय्यम क्वालिटीचे दाखवायचे..हे केलं तरच माल खपेल, नाहीतर दुकान चालणार नाही”

एका मोठ्या कपड्यांच्या दुकानात नवीनच रुजू झालेला मॅनेजर त्याच्या हाताखालील लोकांना हे सगळं शिकवत होता. आपल्या दुकानाचा खप दुप्पट करून दाखवेन असं त्याने सिनियर मॅनेजरला चॅलेंज दिलं होतं आणि त्यानुसार तो अश्या कल्पना लढवत होता. स्टाफ मध्ये नवीनच रुजू झालेला एक साधारण मुलगा ते लक्षपूर्वक ऐकत होता. मॅनेजरचं बोलून झाल्यावर त्याने प्रश्न विचारला,

“पण समजायचं कसं की समोरचा व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत”

मॅनेजर त्याच्याकडे बघून कुत्सितपणे हसला,

“आता तुझ्याकडे बघून कुणीही सांगेल की तू गरीब आहेत”

सर्वजण हसायला लागतात.

“अरे साधी गोष्ट आहे, त्या माणसाचा पेहराव, राहणीमान बघायचं.. त्यावरून अंदाज येतोच की..आता एखादी साडीतली बाई आली, कपाळावर मोठं कुंकू..तर समजायचं मध्यमवर्गीय.. याउलट भडक मेकप, उठावदार ड्रेस असेल तर समजायचं मोठ्या घरातली आहे..”

मॅनेजरच्या सूचना संपतात, सर्वजण आपापल्या कामावर जातात. प्रत्येकाला एकेक कोपरा दिलेला असतो. जरीच्या साडींचं एक डिपार्टमेंट, एक सिल्कच्या, एक पैठणी आणि बाकी साध्या साड्या. पैठणी शक्यतो जास्त कुणी घेत नसत, कारण किंमत खूप असायची..लग्नाचा सिझन पण नव्हता, सर्वजण वापरातल्या आणि फार तर फार पार्टी साठी साड्या घ्यायला येत.त्यामुळे ते डिपार्टमेंट मनोजकडे, त्या साधारण मुलाकडे देण्यात आलं.

काही वेळाने एक वयस्कर बाई आणि तिचा तरुण मुलगा दुकानात आले. बाईची साडी अगदी हलक्या रंगाची, आणि मुलगा सुद्धा अतिशय साध्या वेषात. स्टाफ ने एकमेकांना खाणाखुणा केल्या, त्यांना “मध्यमवर्गीय” ठरवून कमी रेंजच्या साड्यांच्या डिपार्टमेंट मध्ये त्यांना बसवण्यात आलं.

बऱ्याच साड्या पाहून झाल्या, पण त्या स्त्रीला काही पसंत पडत नव्हत्या. परत दुय्यम साड्यांच्या डिपार्टमेंट मध्ये त्यांना नेलं, त्याही साड्या आवडल्या नाही. स्टाफ वैतागला. मनोज शांततेत त्यांच्याकडे आला आणि त्यांना आपल्या डिपार्टमेंट मध्ये नेलं. स्टाफ ने डोक्यावर हात मारून घेतला..

“याला अक्कल आहे का? ही बाई 500 ची साडी नाही म्हणतेय, हा तर 5000 च्या साड्या दाखवायला घेऊन गेला..”

मॅनेजर चिडला, पण ग्राहकासमोर काही बोलता येईना. ग्राहकाला जाऊदेत, मग बघतो याच्याकडे..

पंधरा मिनिटातच त्या स्त्री ने दहा हजार च्या पैठणी सारख्या डिझाइनर साड्या उचलल्या, ती समाधानी दिसली. काउंटर वर त्यांनी 30 हजार बिल भरलं आणि सर्वांनी तोंडात बोटं घातली. मॅनेजर ला कळत नव्हतं काय बोलावं. सर्वांनी त्याला विचारलं,

“अरे यांना 500 ची साडी सुद्धा पसंत पडत नव्हती, तू तर 30 हजार चं बिल काढलं यांच्याडून? कसं काय?”

तो मुलगा शांतपणे सांगू लागला,

“तुम्हाला माहित आहे ही लोकं कोण होती? सुगम इंडस्ट्रीज चे मालक श्री. गोसावी यांच्या मिसेस आणि त्यांचा मुलगा..”

“काय? तुला कसं माहीत?”

“रोज पेपर वाचतो मी सर..”

“पण आम्हाला तर वाटलं की यांना 500 ची साडी सुद्धा महाग वाटतेय, आणि अवतारावरून तर त्या अगदी साधारण दिसत होत्या”

“इथेच गल्लत करतो सर आपण, माणसाच्या पेहरावावरून त्याचं परीक्षण करतो. साधे कपडे घालणारा गरीब, उंची कपडे घालणारा श्रीमंत.. असं नसतं..इन्फोसिस च्या सुधा मूर्ती बघा, करोडोची संपत्ती असूनही इतक्या साध्या राहतात. आणि काही लोकं खिशात दमडी नसताना इतकं पॉश राहतात की विचारूच नका. किमतीमुळे नाही, तर क्वालिटी मुळे त्या साड्यांना नको म्हणत होत्या, आणि सर, तुम्ही अशी चुकीची शिकवण देत जाऊ नका, माणसाच्या कपड्यांवरून त्याचं स्टेटस ओळखायला लावत जाऊ नका..”

मॅनेजरचा सर्वांसमोर अपमान झाला, तो चिडला

“आता तू मला शिकवणार काय करायचं ते? आहे कोण तू?”

“या दुकानाचे मालक, श्री. मांगले यांचा सुपुत्र.. मनोज मांगले..कालच चेन्नई वरून आलो. बाबांना बरं नव्हतं म्हणून त्यांनी मला दुकानात चक्कर मारून यायला लावला. म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने चक्कर मारून बघू, म्हणून इथे काम करायला आलोय असं सांगत एन्ट्री केली”

मॅनेजर माफी मागू लागला..हसणाऱ्या स्टाफला सुदधा आता घाम फुटला. सर्वांना बघून मनोज म्हणाला..

“असल्या भंगार स्ट्रॅटेजी यापुढे वापरल्या तर याद राखा..आणि येणाऱ्या ग्राहकाची वेशभूषा बघून त्याला जज करू नका..”

समाप्त

2 thoughts on “साडीचे दुकान”

Leave a Comment