रामराज्य (भाग 8) ©संजना इंगळे

मनाली फ्लॅट बद्दल बोललेलं वृषाली ने सुदधा ऐकलं…ती मनाली ला बाजूला घेऊन गेली.“ताई, मिळाला का चांगला फ्लॅट?”

“हो एक चांगला भेटलाय, एकदा बघून येतो आणि फायनल करतो..”

“बरं होईल, आम्हीही लवकर प्रयत्न करतो…”

इतक्यात तारा सुद्धा तिथे येते..

“काय? फ्लॅट मध्ये राहणार दोघी?”

“वेगवेगळ्या… बस झालं आता हे…सासूबाई होत्या तोवर त्यांच्याखातर राहिलो एकत्र…आता जरा प्रॅक्टिकल विचार करायला हवा..”

मनाली आणि वृषाली ने तर ठरवून टाकलं होतं, पण तारा ला काही ते पटलं नाही. एकवेळ तीसुद्धा प्रताप ला वेगळं राहण्याबद्दल सांगायची, पण सध्याचं वातावरण बघून तिला ते योग्य वाटत नव्हतं..

करुणा ते सगळं गपचूप ऐकत होती, इतक्या दिवसांची मेहनत वाया गेली…का राहतोय आपण इथे? कशासाठी? आपला संसार सोडून या तिघांचा संसार सावरायला आले आणि परिणाम असा?

करुणा आता त्यांचा विचार करण्याचं सोडून देते..सासरेबुवांच्या कानी ती हे सगळं घालते…तेही म्हणतात…

“शेवटी माणूस अन त्याचा स्वभाव…कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच..सुनबाई, तू नको यात पडू…तुलाही तुझा संसार आहे…”

“पण सासूबाईंच्या स्वप्नांचं काय?”

“ती गेली अन स्वप्नही घेऊन गेली..आता नशिबात जे असेल तेच होईल..”

करुणा ला तिथून निघू वाटत नव्हतं…सासुबाईंचं स्वप्न असं अर्धवट कसं सोडून जाणार?

मनाली आणि विशाल फ्लॅट बघून आले, त्यांना आवडला आणि त्यांनी फायनल केला…
घरात सर्वांना कसं सांगावं? शेवटी विशाल सर्वांना सांगणार असं ठरलं…

“वहिनी..तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. .म्हणजे कदाचित तुम्हाला हे पटणार नाही, पण …”

“दुसरीकडे राहायला जाताय ना? जा खुशाल…कुणीही थांबवणार नाही तुम्हाला…”

विशाल ते ऐकून जरा दुःखी होतो, वहिणींचा सूर जरा चिडलेला होता.

विशाल आणि मनाली सामानाची बांधणी करतात…

ते करत असताना छोटू येतो अन विचारतो…

“मोठी आई तू कुठे चालली??”

“चल आपल्याला दुसरीकडे राहायला जायचंय…”

“कोण कोण?”

“तू, मी आणि तुझे विशाल काका..”

“नाही…तू इथेच रहा…मला मोठी आई आणि छोटी आई दोघी पाहिजे..”

वृषाली ते ऐकून तिथे येते.

“वहिनी.. छोटू ला कुठे न्यायची गोष्ट करताय?”

या छोटू च्या प्रश्नाने मनाली पूरती कोसळली…छोटू तिच्या इतक्या अंगावरचा झालेला की आपण तिथे छोटू असा मनालीचा पक्का समज झालेला..आपण आता जाणार म्हणजे छोटू इथेच राहणार…ही कल्पना तिला सहन झाली नाही..तिने पटकन आपलं समान हातातून खाली टाकलं आणि छोटू ला मिठी मारली…वृषाली म्हणाली,

“वहिनी, मी समजू शकते…छोटू शिवाय तुम्हाला कारमणार नाही, पण हे करावं लागेल. तुमच्या भविष्यासाठी. ”

करुणा सुद्धा बॅग घेऊन निघते.

करुणा वहिनी अश्या अचानक निघालेल्या पाहून सर्वजण जमा होतात. वहिनी कुठे चालल्या?

“मुंबई ला?”

“इतक्यात? आणि असं अचानक?”

“एक स्वप्न घेऊन आले होते…रामराज्य घडवायचे…पण ते काही होणार नाही असं दिसतंय..”

मनाली करुणा च्या जवळ येते…

“वहिनी..मान्य आहे तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण हे करणं मला भाग आहे…”

“अशी काय मजबुरी आली की तुला हे घर सोडावं लागतंय?”

मनाली शांत झाली,

“प्रत्येक गोष्ट शब्दात सांगता येत नाही वहिनी..काही जाणिवा शब्दांपालिकडे वेदना देतात..”

वृषाली तिथे असलेल्या सर्वांना तिथून निघून जाण्याचा इशारा करते, मनाली आणि करुणा ला दोघींना एकट्यात बोलू देते…

करुणा म्हणते,

“मी  इतके दिवस इथे थांबले, हाच दिवस बघायचा बाकी होता ..”

“वाहिनी तुम्हाला राग येणं  साहजिक आहे, पण एक गोष्ट तुम्हाला माहित नाही… ”

“कुठली गोष्ट?”

“सासूबाईंनी आम्हाला लवकरात लवकर इथून जायला सांगितलं होतं ..”

“काय?”

“हो.. वहिनी  तुम्ही इथे नव्हत्या .. तेव्हा मोठी सून म्हणून मी घराला जोडायचा खूप  प्रयत्न केलेला .. पण  मधल्या काळात यांनी शेयर मार्केट मध्ये पैसे अडकवले आणि फार मोठं नुकसान झालं. … सासरेबुवांनी यांच्याशी बोलणं सोडून दिलं … यांची मनस्थिती ढासळली… इतकी कि अखेर यांच्यावर उपचार घ्यायची वेळ आली. . त्यात मला मूल  होत नाही म्हणून नकळत का होईना नातेवाईक आणि घरातील इतर व्यक्ती अप्रत्यक्षपणे मला दोष देत होते… इथे आमची होणारी घुसमट सासूबाईंना सहन झाली नाही… सासरेबुवा आधीच आमच्यावर राग धरून बसलेले.. आम्ही मोठे असूनही आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळायची …आजही आम्ही तीच सल घेऊन जगत आहोत.. मुश्किलीने आज पैसे जमलेत आणि म्हणून आम्ही वेगळं राहायचा निर्णय घेतोय…”

करुणा  चा राग क्षणात मावळला… तिचं  कारण अगदी योग्य होतं … पण यावर वेगळं राहणं  हा पर्याय नसून काहीतरी तोडगा काढायला हवा असं तिला मनोमन वाटू लागलं ..

“मनाली, तुला मूल  झालं आणि विशाल ला त्याचा सन्मान परत मिळाला तर राहशील इथेच?”

“वाहिनी.. खरंच  तसं  झालं तर इतकं भरलं गोकुळ सोडून जाण्याची हिम्मत तरी होईल का ?”

इतक्यात छोटू रडत रडत येऊन मनाली ला बिलगतो ..

“आई… नको जाऊस ना.. मी तुला त्रास देणार नाही…रोज फक्त भाजी पोळी खाईल …खूप खूप अभ्यास करेन..अन जाऊ नको ना तू.. ”

छोटू च्या तोंडून “मोठी आई ” शब्द जाऊन आज फक्त “आई” शब्द फुटला होता.

करुणा  म्हणते,

“अरे आई गम्मत करत होती… कुठेही जाणार नाहीये ती… ”

क्रमशः

रामराज्य (भाग 9) ©संजना इंगळे

marathi katha, story of a marathi family, story of a joint family, ramrajya, lord rama, must read marathi story
Ramrajya

4 thoughts on “रामराज्य (भाग 8) ©संजना इंगळे”

Leave a Comment