रामराज्य (भाग 6) ©संजना इंगळे

भाग 5
https://www.irablogging.in/2020/03/5_25.html?m=1

करुणा तिच्या दोघी जावांना बोलावते, मनाली अन वृषाली ला…

“तुमची धाकटी जाऊ, तारा… तिला या नवीन शहरात अगदी एकटं वाटतंय…ती सर्वात लहान आहे, लाडाची आहे…आपण मोठे आहोत…तिला एकटं वाटणार नाही, तिलाही या घराबद्दल, तुमच्याबद्दल आपुलकी वाटेल असं वागा….तिच्या राहणीमानाबाबत काहीही बोलू नका..”

दोघींना ते पटलं..इतक्यात छोटू शाळेतून येतो..

“मोठी आई..मम्मी..उद्या शाळेत parents मिटिंग आहे…तुम्हाला बोलावलं आहे..”

“किती वाजता?”

“दुपारी 3 वाजता..”

“अरे देवा…आम्ही दोघी तेव्हा तर कामावर असू…”

“मी जाईन… उद्या मला सुट्टी आहे..” तारा मागून येऊन म्हणते…

या दोघींना नवल वाटतं… तारा शक्यतो कशात सहभागी होत नसायची, पण घरातलं एकंदरीत वातावरण बघता तीही सामील होऊ पाहत होती…

“बरं काकू तू चल..”

“काकू नाही बाळा…छोटी आई..”

“म्हणजे मला 3-3 आई?”

“3 नाही…चार…मलाही मोठी आई म्हण..” करुणा त्याला सांगते…

करुणा ने सर्वांनाच छोटु ची आई बनवून आईपणाची एक मोठी जबाबदारी दिली होती… तारा आणि छोटू ला “छोटी आई” म्हणून गम्मतच वाटली…

दुसऱ्या दिवशी तारा आपल्या स्कुटर वर छोटू च्या शाळेत गेली…तारा राहायला अगदी मॉडर्न, भारीतले कपडे घालून ती मिटिंग ला गेली.तिकडे इतर पालकांना जमलं नाही असं इंग्रजी मध्ये तिने शिक्षकांशी संवाद साधला…शाळा सुटल्यावर तिने छोटू ला घेतलं….

“छोटी आई..”म्हणून छोटू तारा कडे गेला अन त्याचे मित्र मैत्रिणी बघायला लागले..

“छोटू ची मम्मी बघ….किती भारी आहे ना…हिरॉईनच…”

तारा च्या येण्याने छोटू सुद्धा शाळेत भाव खाऊन गेला…इतर पालकही तारा कडे “हुशार” पालक म्हणून पाहू लागली…

तारा ला हे सगळं नवीन होतं, पण तिलाही खूप छान वाटलं…
येतांना तारा ने त्याला मॅकडोनाल्ड मध्ये नेऊन बर्गर खाऊ घातलं….छानपैकी आईस्क्रीम खाऊ घातलं..

तारा लग्नाआधी अशीच राहायची…मस्त हिंडणं फिरणं, बाहेर खाणं, बर्गर पिझ्झा वर ताव मारणं… पण लग्नानंतर तिला कुणाची सोबत मिळाली नव्हती..पण छोटू मुळे तिला ते दिवस परत अनुभवायला मिळाले…

“छोटी आई…तू दर महिन्याला येत जा मिटिंग ला बरं का..आणि मला बर्गर खाऊ घालशील ना नक्की?”

“हो माझ्या छोट्या…आपण खूप मज्जा करत जाऊ…पण घरी सांगू नको हा…नाहीतर आपल्या दोघांना उठाबशा काढायला लावतील…”

छोटू आणि तारा खळखळून हसले…

घराला एक करण्यात छोटू चा वाटा खूप मोठा होता..नकळतपणे इवल्याश्या जिवाने सर्वांना एकत्र आणलं होतं…आणि त्या क्षणी माणसांनी आणि प्रेमानी छोटू सर्वात मोठा श्रीमंत झाला होता…

छोटू ला घेऊन तारा घरी आले…आल्यावर मनाली त्यांना सांगते..

“चला..हातपाय धुवा…मी दोघांना छान नाष्टा बनवून देते..”

इतक्यात वृषालीही येते..

“मीपण मदत करते वहिनी…हे काय? छोटू? आज आल्या आल्या भूक भूक केली नाहीस..”

दोघेही शांत असतात…आणि छोटू अचानक एक मोठी ढेकर देतो…

“अच्छा…म्हणजे माय लेक बाहेरून खाऊन आलेत वाटतं..”

इतक्यात करुणा तिथे येते..

“असुदे गं…एखाद्या दिवशी खाल्लं तर काही नाही होत… मग…काय खाल्लं आमच्या पिल्लू ने?”

छोटू रंगवून रंगवून काय खाल्लं, किती छान होतं, किती मजा केली हे सांगू लागला… मनाली अन वृषाली ते ऐकून खुश झाल्या..छोटू चा ताबा आता तारा ने सुद्धा घेतला होता…आणि करुणा ने तारा ला सर्वांमध्ये आणून तिसरा पाया रचला…

एके दिवशी दारात त्यांचे मामसासरे आले…बहिणीचं घर एकदा पाहून यावं यासाठी ते आलेले…सासरेबुवा त्यांना पाहून रडू लागले… मामांचेही डोळे पाणावले. बहीण घरात नाही पाहुन मामांना त्या घरात कसतरी वाटत होतं… घरातल्या प्रत्येक वस्तूवर बहिणीचं प्रतिबिंब दिसत होतं. सासरेबुवा आणि मामा खूप वेळ गप्पा मारत बसले.

वृषाली अन मनाली ने त्यांना नाष्टा दिला, तारा ने चहा आणून दिला…मामांना विशेष वाटलं..या तिघी कधीच एकत्र दिसल्या नव्हत्या, आणि बहिनीकडून या तिघींचं तुटक वागणं कानावर पडतच होतं…पण आता तर सगळं चित्रच बदललं…

सासरेबुवांनी मामांच्या मनातला प्रश्न ओळखला..

“करुणा ..माझी मोठी सून आली अन घरचं बदलून टाकलं बघा…आमच्या हिला जे साध्य करायचचं होतं ते ती न करताच निघून गेली…पण तिची जागा आता करुणा ने घेतली….विखुरलेलं घर सावरायला स्वतःच्या नवऱ्याला आणि संसाराला सोडून ती आलीये..”

सासरेबुवा हे बोलत असतानाच करुणा तिथे आली..

“मामा… कसे आहात? घरी सगळं ठीक आहे ना? अरविंद चं काय चाललं… त्यांचा मंडप चा व्यवसाय काय म्हणतोय…”

मामांच्या तोंडातून शब्द फुटेना…असं वाटत होतं त्यांची बहीणच करुणा च्या तोंडून विचारपूस करत होती…हेच शब्द अन याच आपुलकीने विचारणं…

मामा फक्त डोळ्यातून अश्रू ढाळत होते… करुणा खाली बसली, त्यांच्या हातावर हात ठेवला..

“मामा…माणूस शरीराने नाही, आठवणीतून जीवंत राहतो…तुमच्या बहिणीला या घरातून कुणीही जाऊ देणार नाही…नीट बघा या घराकडे.. इथल्या प्रत्येक वस्तुतून त्यांची आठवण डोकावतेय…त्या इथेच आहेत…आठवणींच्या रूपाने….नीट बघा, घरात जे दिसतंय तेच त्यांना हवं होतं…त्यांचं हेच स्वप्न होतं… घराला रामराज्य बनवायचं..सासुबाईं आमच्यात नेहमी जिवंत राहतील…आमच्या या ध्येयाच्या रुपात…त्या गेल्या, पण जाताना एक खूप मोठी जबाबदारी देऊन गेल्या .. या घरात सासुबाई पुन्हा दिसतील…रामराज्याच्या रुपात… तेव्हा याल ना तुमच्या बहिणीला परत भेटायला??”

क्रमशः

marathi katha, story of a marathi family, story of a joint family, ramrajya, lord rama, must read marathi story
Ramrajya

1 thought on “रामराज्य (भाग 6) ©संजना इंगळे”

Leave a Comment