रामराज्य (भाग 3) ©संजना इंगळे

marathi story ramrajya

“मनाली, वृषाली, तारा??? हे काय? तिघीजनी वेगवेगळं काय बनवताय??”

“ताई हे रोजच आहे…एकाने प्रत्येकाला स्वयंपाक करणं म्हणजे किती अवघड आहे…रोज 7 जणांचं जेवण बनवावं लागतं… मग प्रत्येकजण आपापला स्वयंपाक करून डबा घेऊन निघून जातं…”

“आणि बाबा?”

“सासूबाई होत्या तेव्हा त्या बनवून घ्यायच्या. पण आता..”

“मी करून घेईल, तुम्हाला घाई होत असेल..निघा तुम्ही..”

तिघींजनी आणि त्यांचे नवरे निघून गेले..

सासरेबुवा शांतपणे त्यांच्या खुर्चीवर बसलेले असतात..शून्यात नजर भिडवून….

करुणा त्यांना नाष्टा घेऊन जाते,

“बाबा हे घ्या..”

नेहमी एकाकी राहण्याच्या सवयीमुळे करुणा च्या अश्या अचानक येण्याने ते दचकतात…

“बाबा..”

“तुझ्या सासूचीच आठवण झाली बघ, यावेळी बरोबर ती मला नाष्टा घेऊन यायची…”

“बाबा…सावरा आता स्वतःला…जाणारा जातो, पण म्हणून जग थांबून राहत नाही…आपल्यालाही पुढे सरकावं लागेल…”

“तू थांबलीस…जीवाला तेवढंच बरं वाटलं बघ, नाहीतर आता मी एकटाच असेन घरात…भुतासारखा…तू गेल्यावर काय होणार माझं?”

“बाबा मी कुठेही जात नाहीये…तुम्ही नाष्टा करून घ्या…मी आलेच..”

सुवर्णा बाबांची समजूत घालत निघते, पण आतून तीच ढासळलेली असते…

घरातल्या गोष्टी तिला आता समजू लागतात…तिन्ही सुना आपापलं आवरून निघून जात..पण घरात बाकीचं सगळं तसंच… भांड्यांचा ढीग, कपड्यांची रास, झाडू नाही फरशी नाही…त्यांना सवय झालेली याची, आपापलं आवरून निघून जायचं, मग घरात सासूबाई बिचाऱ्या एकेक आवरत बसत। त्यांच्या वयाला पेलवत नसतांना कुटुंबासाठी त्या करत..

या तिन्ही सुना केवळ औपचारिकता म्हणून एकत्र राहत होत्या, एकत्र राहून सुदधा आपापलं फक्त पाहत होत्या…

सुवर्णा ने घरातलं सर्व आवरलं..अगदी या तिघींचे कपडे धुवून वाळवून घडी करून त्यांच्या त्यांच्या खोलीत नेऊन ठेवले. ढीगभर भांडे धुवून ठेवले, घराला झाडू फरशी केली…

तिन्ही सुना घरी आल्या अन घर पाहून जरा ओशाळल्या..आम्ही तिघी असून घर इतकं आवरत नव्हतो एवढं वहिनींनी आवरलं…त्या तिघींना सुवर्णा ने नाष्टा दिला…तो घेऊन प्रत्येकजण आपापल्या खोलीत जाणार इतक्यात सुवर्णा म्हणाली..

“कुठे चाललात? इथे बसा…एकत्र नाष्टा करा…”

या तिघींचे एकमेकांशी बरेच खटके उडायचे त्यामुळे असं एकत्र बसणं ते शक्यतो टाळत…पण सुवर्णा वाहिणींसमोर कशाला या गोष्टी दाखवायच्या?? म्हणून चुपचाप त्या एकत्र बसल्या…

मनाली खाता खात अचानक ला ठसका आला…वृषाली ते पाहून पटकन उठली अन पाणी आणलं…

सुवर्णा मनाशीच विचार करू लागली..

“या तिघी वाईट नाहीत, काहीतरी नक्की घडलं असणार, त्याशिवाय या असं तुटक तुटक वागणार नाहीत…”

रात्री सुवर्णा हळूच मनालीशी बोलायचा प्रयत्न करते…इतर दोघी सुवर्णा शी नीट बोलायच्या, पण मनाली च्या डोळ्यात सुवर्णा बद्दल एक ईर्षा असायची…कशाबद्दल आणि का हे माहीत नव्हतं..

“मनाली…माझ्या नंतर तू घरातली मोठी सून आहेस…तुझ्यावर फार जबाबदारी आहे..”

मनाली चा राग बाहेर येतो..

“हाच विचार करून इतके दिवस केलंच ना वहिनी मी? तुम्ही लांब होत्या, मस्त वेगळं राहून राजा राणीचा संसार करत होत्या…आमचं काय? आम्हाला ना कधी प्रायव्हसी मिळाली ना कधी स्वातंत्र्य…”

सुवर्णा ला मनाली ची दुखरी जागा समजली…मी वेगळी राहत असताना तिला सुद्धा असं राहायची इच्छा झालेली…पण परिस्थितीमुळे तसं काही घडलं नाही…

“असं काय बोलतेस मनाली? आम्ही वेगळं राहावं म्हणून शहरात गेलो नव्हतो… तिथली नोकरी तुझे जेठ धुडकावून लावत होते…पण बाबांनी आग्रह केला..नाईलाजाने आम्हाला तिथे जावं लागलं…माझी तरी कुठे इच्छा होती गं, यांना विचार, कित्येकदा मी आपल्या गावी बदली होईल का म्हणून प्रयत्न करायला सांगितलेला…”

ते बोलत ऐकून तारा, मनाली नंतरची म्हणजेच 3 नंबरची सून तिथे येते…

“नुसतं तेवढंच नाहीये वहिनी..आम्हाला आमची काही स्वप्न आहेत, ईच्छा आहेत…त्या कधी पूर्ण करणार आम्ही? सासूबाई होत्या तोवर आम्ही ऐकायचो…पण आता तरी निदान आम्हाला आमच्या पद्धतीने जगायचं आहे..”

वृषालीही तिथे येते..

“फक्त हाताखालची बाई म्हणून आम्ही तिघी वावरत असायचो..सासूबाईंच्या ऑर्डर पूर्ण करत करत नाकी नऊ यायचे..आम्ही कंटाळलो होतो या बंधनाला…”

करुणा ला एकेकीची सल समजू लागते.. त्या अश्या का वागताय याचं कारण समजू लागतं…

“मला एक सांगा, सासूबाईंनी तुम्हाला कधीच जीव लावला नाही?? आठवून सांगा…”

तिघीजनी आठवू लागतात… एखादीला उशीर झाला उठायला तर त्या स्वतः डबा हातात देत, आमची खोली त्याच आवरत, बाजारात गेल्या की तिघींसाठी हमखास काहीना काही घेऊन येत..आम्ही नोकरी करतो असं दिमाखात सर्वांना सांगत..”

सुवर्णा च्या या प्रश्नाने तिघींना अंतर्मुख करून सोडलं…

क्रमशः

रामराज्य (भाग 4) ©संजना इंगळे

1 thought on “रामराज्य (भाग 3) ©संजना इंगळे”

Leave a Comment