बाप बाप होता है !

नोकरीनिमित्त आदेशचा पहिला interview होता. पण आदेशला कसलंही दडपण नव्हतं. स्वतःला “कूल” समजणारी ही पिढी. “अरे interview काय, आपण यू देऊन येऊ” या अतिआत्मविश्वासाने तो वावरत होता. त्याचे रिटायर झालेले वडील सारखे येरझारा घालत होते. सगळं दडपण त्यांनाच आलेलं.

“बाबा कशाला टेन्शन घेताय, मुलाखतीला चाललोय, युद्धाला नाही”

“अरे बाळा तुला माहीत नाही, मुलाखतीत कितीतरी अवघड प्रश्न विचारतात..कधी काय विचारतील सांगता येत नाही”

“विचारू देत की, मला येतात सगळी उत्तरं.. त्यात काय एवढं..नाहीच आलं तर सांगेन की नाही येत म्हणून”

“अश्याने नोकरी मिळेल का?”

“चिल डॅड..बिनकामाचे टेन्शन देताय..अहो पोरांचे बाप पोरांना धीर देतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, तुमचं उलटंच”

“अरे त्या पोरांना कवडीचा आत्मविश्वास नसतो म्हणून, इथे तुझा आत्मविश्वास पार overflow होतोय म्हणून काळजी वाटतेय. बरं जाऊदे, मी तुझी तयारी करून घेतो थोडीफार, म्हणजे मला समाधान वाटेल”

“तुम्ही? अहो बाबा तेव्हाचा काळ वेगळा, आताचा वेगळा… सोडा हो”

“अरे काळ वेगळा असला तर काय झालं? काही बेसिक गोष्टी सारख्याच असतात बरं का. अगदी तुझ्या मागच्या भिंतीचा रंग कुठलाय हेही विचारतात”

“तुमच्यावेळी विचारत असतील असली फालतू प्रश्न…आता जरा मॉडर्न प्रश्न विचारतात…”

“अरे यामागचं कारण म्हणजे कामगाराची नजर किती तीक्ष्ण आहे हे ओळखण्यासाठी अश्या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात…पण जाऊदे, कर काय करायचं ते…नाही सांगत तुला. पण हो, येतांना पडलेलं तोंड दिसायला नको”

“Okk डॅड”

आदेश वडिलांना “तुम्हाला काय समजतं” म्हणून दुर्लक्ष करून मुलाखतीला निघून गेला. तिथे बाहेर बसलेले उमेदवार अगदी आदेश सारखे. अति आत्मविश्वास, आम्ही म्हणजे कोण ! स्वतःला हिरो समजणारे ते उमेदवार ज्या गतीने आत जायचे त्याच गतीने मुलाखत झाल्यावर घाम पुसत बाहेर यायचे. आता मात्र आदेशलाही जरा भीती वाटू लागलेली.

आदेशचं नाव आलं आणि तो आत गेला. आत जाताच समोर पाच मुलाखतदार बसलेले. एकेकाची तोंड पाहून याची गाळणच उडाली. एकाने त्याला बस म्हटलं. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आदेश ला काही उत्तरं आली काही नाही आली. शेवटी सरांनी त्याला एक टास्क दिला. आमच्या खुर्चीमागच्या भिंतीवर एक खिळा ठोकलाय, तिथे जा आणि हे कॅलेंडर लावून ये.

आदेशला काही समजेना, इतकं सोपं काम का सांगितलं असेल? काहीतरी नक्कीच असेल यामागे. जातांना आपण उजव्या बाजूने जातो की डाव्या हे बघतील का? की कॅलेंडर सरळ लावतो हे बघतील? आपल्याला हे काम तर देणार नाही ना?

नको नको ते प्रश्न मनात सुरू झाले. तो उठला आणि कॅलेंडर उचलून मागच्या भिंतीवर ठोकलेल्या खिळ्यावर लावायला गेला. भिंत पाहून त्याला आठवलं आणि हसू आलं..”बाबा म्हणाले होते की मुलाखतदार भिंतीचा रंग विचारतात..काहीही आपलं, आता हा इतका मोठा माणूस मला भिंतीचा रंग विचारणार आणि मी भिंतीचा रंग हिरवा आहे असं सांगणार..छे, असं कधी असतं का..बाबांचं आपलं काहीही..”

आदेश कॅलेंडर लावून आपल्या जागेवर बसायला यायला लागतो, मुलाखतदार त्याला जागेवरच थांबवतो आणि मागच्या भिंतीकडे पाठ करून उभं राहायला सांगतो.

“मिस्टर आदेश, मागे न वळता मला सांगा की तुम्ही कॅलेंडर लावलं त्या भिंतीचा रंग कोणता आहे”

आदेश आता उडतोच, बाबा आठवतात…भिंत, रंग…

“हिरवा रंग..”

“Excellent… पण तुमच्या लक्षात कसं राहिलं?”

“सर…क..क..कामगाराची नजर तीक्ष्ण हवी ना..म..म्हणून”

बाबांचे शब्द आठवत आदेश डायलॉग मारतो…

आदेशला नोकरीसाठी निवडलं जातं.. तिथेच त्याला ती खबर दिली जाते. घरी येताच बाबा दारात वाट पाहत उभे असतात…

“मग…चांगली झाली ना मुलाखत?”

काय सांगणार बाबांना, हातात पेढे ठेवत तो लाजेने आत निघून गेला.

काहीही म्हणा दोस्तांनो,

“बाप… बाप होता है..”

Leave a Comment