..परि यासम हाच…

इरफान खान (irfan khan)

एरवी कुणी मोठी व्यक्ती आपल्यातून गेली की हळहळ व्यक्त करण्यापलीकडे माझ्यासारखा सामान्य माणूस काहीही करत नाही, पण तू अशी काय जादू केली होतीस की तू गेल्याची बातमी कळताच डोळ्यात चटकन पाणी आलं? तसा तुझा आणि माझा काहीच संबंध नाही, तू मला आणि मी तुला कधी पाहिलेलंही नाही, पण तरीही तुझ्याबद्दल इतका आदर आणि जिव्हाळा निर्माण व्हावा अशी काय जादू करून गेलास तू??

तू गेलास पण तुझ्यामागे असंख्य हृदयात तुझं अस्तित्व मागे ठेऊन गेलास. इतर अनेक नट होऊन गेले, त्यांनी फार तर फार आमचं मनोरंजन केलं, पण तू? तू अशी काही भूमिका साकारायचास की वाटायचं हा माणूस कॅमेरा समोर बोलतोय की सहजच बोलतोय..तुझ्यात सामान्य माणसाने स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. अभिनय काय असतो हे तुला पाहून समजलं, व्यक्त होणं काय असतं हे तु शिकवलंस…

विनोद तू अगदी सहज सुंदर साकारायचास, गंभीर भूमिकाही तितक्याच लीलया पेलायचास..tv वर ऍड लागली की चॅनेल बदलणारे आम्ही, तुझी व्होडाफोन ची ऍड लागली की तीही बघायचो. जीव तोडून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणारा एका बाजूला आणि चालता बोलता सहजपणे जाहिरात करणारा तू एका बाजूला…असं वाटायचं की कुणीतरी हितचिंतक आपल्या भल्यासाठी काहीतरी सांगतोय. तुला खोटं वाटेल, केवळ तुझी ऍड पाहून, तुझ्याकडे पाहून मी व्होडाफोन सिम विकत घेतलं होतं.

Indian actor म्हणून हॉलिवूड मध्ये कुणाला प्रश्न पडला असता Irfan Khan हे एकच नाव त्यांना सुचत असावं. Life of pi, spider man, jurassic world मध्ये तुझ्यासारखा भारतीय चेहरा पाहून छाती अभिमानाने फुलून यायची. नुसतं डोळ्यांनी तू अभिनय साकारायचास..

2018 मध्ये तुला आजार झाल्याची बातमी कळली आणि मन मानायला तयारच झालं नाही, तू यातून बाहेर पडशील अशी आशा ठेऊन होते..पण कदाचित दैवही तुला तुझ्या ओंजळीत घ्यायला आसुसलं असेल…इतका प्रतिभावान होतास तू..

तुला माहितीये? तू गेलास आणि सर्वत्र तुझे फोटो झळकू लागलेत..व्हाट्सअप्प वर स्टेटस काय, फेसबुक वर स्टोरी काय…ही तुझी जादू नाही तर अजून काय आहे?

जिथे असशील तिथून आम्हा सर्व चाहत्यांचं प्रेम बघ, तू जाता जाता इथे सोडून गेलेलं तुझं अस्तित्व बघ, तुझ्यावर प्रेम करणारे तुझे चाहते बघ…आणि जमलं पुन्हा एकदा जन्म घे…त्या देवाशी भांडून…

Leave a Comment