धुरा (भाग 3) ©संजना इंगळे

political story, marathi political story, must read marathi story,
Marathi story

तेजु असं बोलली यावर आईचा विश्वासच बसेना..

“तेजु?? तू बोलतेय हे?”

“हो…मीच बोलतेय, जिला राजकारणाचा आणि खुद्द या देशाचा तिटकारा आहे ती बोलतेय…”

“तेजु, तू चेष्टा करतेय..”

“नाही…आज हे सगळं पाहिलं आणि माझ्यातली एका बापाची मुलगी जागी झाली…जिच्या बापाने इतकं मोठं साम्राज्य उभं केलं, जनतेला उराशी धरलं, त्याला आता असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं? नाही…मी हे होऊ देणार नाही…मी उचलेल ही ‘धुरा..’

आईला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते…मुलीने आपली लाज राखली…नाहीतर नाईक साहेबानंतर जनतेचं काय होईल या विचाराने आईला झोप लागत नसे…आईने पटकन देवाजवळ दिवा लावला, कार्यकर्त्यांना बोलावून पटापट कामं करायला घेतली…निवडणुकीला अजून 2 महिने अवकाश होता..तोवर तेजु ला निवडणुकीसाठी तयार करायचं होतं….

नाईकांची मुलगी म्हणून तेजु कडे मोठ्या आशेने सर्वजण पाहत होते…अश्या वेळी तेजु ला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली…सोबतच आपण हे करू शकू की नाही याबाबत तिच्या मनात संभ्रम निर्माण झालेला…

“तेजु…चल..उद्या आपली प्रचार सभा आहे…खूप मंडळी जमतील..तुला त्यांच्यासमोर बोलायचं आहे…मामा तुला लिहून देईल तेवढं पाठ करून ठेव…”

“बरं…”

तेजु शांत झाली, तिच्या मनावर अचानक असं दडपण आल्याने ती भांबावून गेली होती..मामा कडून भाषण लिहून घ्यायचं आहे हेही विसरली…

तेजुला हे सगळं नवीन होतं, तिला प्रचंड दडपण आलेलं…दुसऱ्या दिवशी प्रचार सभेत सर्वजण जमले, हजारोंनी लोकं “नाईकांच्या लेकीला” पाहायला आले होते… त्या लोकांच्या नजरा तेजु मध्ये नाईकांना शोधत होत्या..तेजु सर्वांसमोर गेली…मनात खूप घालमेल सुरू होती…स्टेजवर तिला एका खुर्चीवर बसवण्यात आलं…स्वतःचा अवतार बघून तिला कसतरी झालं..लाईट रंगाची साडी, केसांची साधी रचना, मेकअप नाही…तिला लारा आणि श्रिया चे लंडन च्या रस्त्यावरून जातांनाचे शब्द आठवले..

“”मी सांगतो..एक टिपिकल साडी घालून, दोन्ही हात जोडून आणि गळा फोडत मॅडम म्हटल्या असत्या…माझ्या प्रिय बंधू अन भगिनींनो…”

तिला असं झालं की भावनेच्या भरात मी चुकीचा निर्णय तर नाही घेतला ना?

स्टेजवर सुरवातीला काही लोकांची भाषणं झाली…आणि तेजु चं नाव पुकारलं गेलं… आई जवळ येऊन म्हणते,

“तेजु बेटा, भाषण केलंय ना नीट?”

हे ऐकताच तेजुला घाम फुटतो…काल आईने भाषण लिहून घ्यायला सांगितलं आणि आपण मात्र भलत्याच तंद्रीत असल्याने ते पुरतं विसरलो…

आईही टेन्शन मध्ये येते…

“पण तुला काहीतरी बोलावंच लागेल.जा माईकसमोर..”

तेजु उठते, तिची देहबोली पाहूनच समजत होतं की ती घाबरली आहे ते…

तेजु माईकसमोर येते आणि सर्व गर्दी शांत होते, तेजु आता काय बोलते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं…

तेजु माईकसमोर जाते..कितीतरी वेळ शांतच असते…गर्दीत चुळबूळ सुरू होते.. त्यात काही दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्तेही हेर म्हणून दबा धरून बसलेले असतात.. त्यांना आता निमित्तच होऊन जातं..

“अरे बोला की मॅडम…”

“Hello… Myself… Tejaswini…”

“ओ मॅडम हे लंडन नाही, भारत आहे…मराठी येत नाही अन कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार…”

तेजु हे ऐकूनच घाबरते…आपल्या जागेवर जाऊन बसणार इतक्यात एक आवाज येतो…

“नाईक साहेबांनी जनतेला घडवलं…पण स्वतःच्या पोरीला मात्र काहीच शिकवलेलं नाही वाटतं…”

हे ऐकून तेजु चे डोळे लालबुंद होतात…तिच्या मनात संतापाची एकच लाट उसळते..डोळ्यासमोर बाबा आणि त्यांचं शेवटची भेट आठवली… त्यांनी निर्माण केलेला जनसमुदाय आणि ते गेल्यामुळे स्वतःला संपावणारा तो माणूस डोळ्यासमोर आला…

“नाईकांची मुलगी आहे मी…तेच नाईक ज्यांनी या जनतेला पोटच्या पोरासमान जपलं…तेच नाईक ज्यांनी विरोधकांबद्दल कधीही वाईट शब्द काढला नाही..प्रत्येकाला आदर देत गेले…अश्या नाईकांची मुलगी आहे मी…नाईकांनंतर महाराष्ट्राला कुणीही वाली नाही असं समजू नका…नाईक साहेब गेले पण माझ्यावर ही धुरा टाकून गेलेत…याच नाईकांचं रक्त माझ्यात अजून जिवंत आहे आणि त्या रक्ताची शपथ घेऊन सांगते मी माझा महाराष्ट्र विकला जाऊ देणार नाही, आख्ख्या जगाला हेवा वाटेल असं राज्य उभं करेन…इथल्या एकेका माणसाला स्वाभिमानाने उभं करेन…”

तिच्या तोंडातून आपसूक हे शब्द निघतात आणि टाळ्यांचा कडकडाट होतो..नाईकानंतर आता ही धुरा तेजु वर आली आणि जनतेला तेजु वर विश्वास बसला..

क्रमशः

धुरा (भाग 4) ©संजना इंगळे

30 thoughts on “धुरा (भाग 3) ©संजना इंगळे”

Leave a Comment