दैवलेख (भाग 9)

#दैवलेख (भाग 9)

देवांगचं मन हलकं झालं, वैदेहीला त्याने खरं काय ते सांगून टाकलं होतं.. पण ती जेव्हा म्हणाली की ‘काळजी करू नकोस, तुझं लग्न तुझ्या मैत्रिणीशीच होईल’ तेव्हा का कोण जाणे एक वेगळीच कळ देवांगच्या हृदयात उठली.

दोघेही घरात आले, घरी आई बाबा तर दोघांची वाटच बघत होते. तेवढ्यात वैदेहीच्या आईला तिच्या ननंदेचा फोन येतो.

“काय गं वहिनी, कुठे आहेस..मी आले बघ यात्रेवरून, तिथून काहीच संपर्क होत नव्हता..आज घरी आले आणि तडक तुला फोन केला..”

“बरं झालं, अहो तुम्ही ते स्थळ सुचवलं होतं ना…तेच..”

“अच्छा हो हो, तुला तेच सांगायला फोन केला मी..पाहुणे उद्या येणारेत पाहायला..”

वैदेहीची आई स्तब्ध झाली..काय चाललंय कळेनासं झालं..नणंदबाईंनी सांगितलेलं स्थळ हे नाही? मग आपण इथे कसं आलो? आणि हेसुद्धा आपल्याला स्थळ आल्यासारखं का वागवताय?

“हॅलो, हॅलो..वहिनी, ऐकतेस ना?”

“ताई, तुम्हाला भेटायला येते मी…”

वैदेहीची आई फोन ठेवते, काय बोलावं कळेना. आता जास्त काही होण्यापेक्षा इथून आधी बाहेर पडलेलं बरं, नणंदबाईंकडे गेलो की सगळा खुलासा करून घेऊ. वैदेहीची आई निरोप घ्यायचं म्हणते, जातांना आजीचा पाया पडून जायचं म्हणून आजीकडे जाते, तिथे आजी म्हणते,

“आता लवकरात लवकर लग्नाची तारीख काढा बरं..”

वैदेहीची आई फक्त हसून प्रतिसाद देते. देवांगची आई त्यांना बळजबरीने साडी नेसवायला आत घेऊन गेली. बाहेर देवांग आणि वैदेही होते फक्त. देवांगच्या मनात काहीतरी आलं आणि त्याने वैदेहीला बाहेर बोलावलं..

“काय रे? काही सांगायचं आहे का?”

“नाही, विचारायचं आहे”

“विचार की..”

“मी माझ्या मैत्रिणीबद्दल सांगितलं..तुला वाईट नाही वाटलं? तुझ्याही मनात कुणी..”

“नाही नाही, तसं काही नाही..”

“मग मी आवडलो नाही का? नाही म्हणजे, तू इतक्या सहजासहजी लग्नाला नकार द्यायला तयार झालीस की जणू काही झालंच नाही, जर माझी मैत्रीण नसती…तर…काय केलं असतं..”

वैदेहीला त्याचा रोख कळतो, तिला या नात्यात आवड आहे की नाही, अनो नसेल तर का नाही हेच त्याला जाणून घ्यायचे होते.

“देवांग, माझं आयुष्य खुप वेगळं आहे रे. आपण लहानपणी एकत्र खेळलेलो, तेवढाच एक काय तो सुखाचा काळ होता आयुष्यात. पण नंतर बाबा गेले आणि आयुष्यात दुःखच दुःखं आली. खूप लहान वयात समजूतदारपणा आला. समोर जे दिसेल ते स्वीकारायची सवय पडली. एखादी गोष्ट आवडली नाही तर नाही म्हणण्याइतके पैसेही नसायचे आणि आधारही..हट्ट कुणाकडे करणार? पै पै जमा करणाऱ्या आईकडे? तिने शिकवलं, मोठं केलं…आज माझ्या कमाईमुळे घरात पुरून उरेल इतका पैसा आहे..पण जे आहे ते स्वीकारायचं, भावनांना लगाम घालायचा आणि पुढे जायचं..हा स्वभाव काही बदलला नाही..आता तुला हे लग्न करायचं नाहीये म्हटल्यावर माझ्याकडून नकार द्यायचा आणि विषय संपवायचा.. पुढे जायचं..”

इतक्यात वैदेहीची आई बाहेर आली आणि दोघीजणी निघून गेल्या. इकडे देवांगच्या डोळ्यात नकळतपणे पाणी आलं, वरून उत्साही, निर्मळ दिसणाऱ्या नाजूक मुलीने आयुष्यात किती काही सोसलं आहे हे त्याला दिसून आलं. आयुष्याकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन अगदी व्यवहारी झालेला. ना कसल्या भावना, ना कसली अपेक्षा. जीवनात सोसलेल्या दुःखाने ती अगदी कोरडी झालेली, त्यात आपण तिला नकार द्यायला लावून त्यात अजूनच भर पाडली याची खदखद त्याच्या मनात जाणवू लागली.

तिकडे वैदेही आणि तिची आई वैदेहीच्या आत्याकडे पोहोचतात.

“आई, आत्याकडे का आलोय?”

“थांब जरा…आधी आत जाऊदे..”

आत जाताच नणंदबाईंना वैदेहीच्या आईने विचारलं,

“ताई तुम्ही नक्की कोणता मुलगा सुचवला होता?”

“रजत..रजत पवार. का गं?”

“गोंधळ झालाय ताई..”

असं म्हणत वैदेहीची आई सगळा वृत्तांत सांगते. हे ऐकून आत्या म्हणते,

“मोठी गडबड झाली म्हणायची, पण मला एक कळत नाहीये..तुझा गोंधळ झाला ठीक आहे, पण त्यांनी तुम्हाला त्या अर्थाने आत घेतलं कसं? म्हणजे तुम्हाला वाटलं तुम्ही मुलाकडे जाताय, पण त्यांनी मुलीकडचे आल्यासारखी वागणूक का दिली?”

“ते आमच्या ओळखीतले आहेत, आम्ही चाळीत राहायचो ना, तिथे शेजारी होते ते..”

“पण मग सहज भेटायला आले असतील असं वाटायला हवं ना त्यांना..”

“गोष्ट पुढे अजून आहे, वैदेही आणि देवांग, दोघेही पोटात असताना त्यांचा विवाह लावण्यात आलेला..देवांगच्या आजीने करवून घेतलं हे, पण तेव्हा विवाह केला ते आत्तापर्यंत त्यांच्या डोक्यात आहे..”

“पण मग इतके दिवस का संपर्क केला नाही त्यांनी? बरं तेही जाऊदे, मला एक सांग, मुलगा कसा आहे? चांगला असेल तर काय हरकत?”

“खूपच छान आहे ताई, कुटुंब सुद्धा इतकं छान आहे ना..मलाही वाटतं वैदेही तिथे खूश राहीन, पण..”

“पण काय?”

“तुम्ही आणलेलं ते स्थळ..”

“अरे देवा..म्हणजे माझा अपमान होईल असं वाटतंय का वहिनी तुला? अंग स्थळ तू शोधलं काय आणि मी शोधलं काय, आपली वैदेही खुश राहणं महत्वाचं..”

हे ऐकून वैदेहीच्या आईला जरा हायसं वाटलं. पण आता वैदेही बोलायला लागली,

“झालं तुमचं? आता ऐका, देवांगला हे लग्न नकोय, त्याने माझ्यातर्फे नकार कळवायला लावलाय…कारण मला माहीत नाही, त्यामुळे नकार द्यायचा आणि विषय संपवायचा..”

वैदेहीची आई आणि आत्या डोक्यावर हात मारून घेतात..

“ताई, हे स्थळ गेलं..तुम्ही सांगितलेला मुलगा बघुया आता..”

_____
इकडे देवांग सईला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, आता दोघांच्या लग्नाचा मार्ग मोकळा होणार होता.. ही वार्ता त्याला सईला द्यायची होती. 2-3 रिंग नंतर तिने फोन उचलला, त्याने तिला सगळं कथन केलं आणि तिच्या प्रतिसादाची वाट पाहू लागला..

“Oh… cool..”

शब्दांप्रमाणेच थंड प्रतिसाद तिने दिला. तिला लग्नाची एवढी घाईही नव्हती आणि उत्कटताही नव्हती.

“मी येतोय ऑफिसला 2 दिवसात, काय चाललंय तिकडे?”

“विशेष काही नाही, तू नाहीये म्हणून तुझा दुष्मन.. राजेश सध्या हवेत आहे.. बॉस कडून वाहवा मिळवतोय..”

देवांग हसायला लागतो..

“दुष्मन काय म्हणतेस गं, तो उगाच स्पर्धा करतोय माझ्याशी.. मित्र बनायचंच नाहीये त्याला..माझ्या मनात मात्र त्याच्याबद्दल जराही द्वेष नाही..”

“ए काय रे देवांग, तू इतक्या सरळ मनाचा आहेत…तुझा एकही दुष्मन नसेल…बरोबर ना?”

हे ऐकल्यावर निरागस, सालस, शांत अश्या देवांगच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, त्याचे डोळे लाल होतात…एखादा शांत समुद्र अचानक भरती आणतो तसंच काहीसं…

“आयुष्यात पहिला आणि शेवटचा असा माझा एकच दुष्मन आहे..ज्याला मी कधीही माफ करू शकत नाही..”

“कोण?”

“रजत…रजत पवार..”

क्रमशः

1 thought on “दैवलेख (भाग 9)”

Leave a Comment