दैवलेख (भाग 8)

दैवलेख (भाग 8)

मुलगी पाहायला येणार..पण ती वैदेही म्हणजे तीच ट्रेन मध्ये भेटलेली मुलगी असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. वैदेहीला समोर बघताच तो स्तब्ध होतो. ऐन वैशाखात अंगावर पाण्याचा थंडगार शिडकावा पडावा असाच काहीसा भास त्याला झाला. त्याच्या मनात सुप्तपणे दडलेली ती, चित्रातून सतत डोकावू पाहत होती..ती आज समोर आली..!!

“अरे तू..?”

वैदेहीला आठवतं, ट्रेनमध्ये भेटलेला हाच तो. ती सर्वांना सांगते,

“अहो आम्ही या आधी भेटलो आहे, एका प्रवासात..ट्रेनमध्ये”

“काय रे देवांग? खरंय का हे?”

देवांग अजूनही तिच्याकडेच बघत असतो. गव्हाळ रंग, तुकतुकीत चेहरा, दाट केस मोकळे सोडलेले आणि हरवून जावं असे डोळे. त्या दिवशी प्रवासात विस्कटलेल्या अवतारातील ती आणि आज तयार होऊन आलेली वैदेही यांच्यात जराही वेगळेपण नव्हतं..तिचं सौंदर्य तिच्या डोळ्यातून झळकत होतं.

“देवांग..” देवांगची आई त्याला हलवत म्हणाली..

आं? हो…हो म्हणजे मी इकडे येत असताना एकाच ट्रेन मध्ये होतो आम्ही समोरासमोर..”

“बरं …वैदेही, बाळा आजीला भेटून घे, तुझी खूप आठवण काढते ती..”

वैदेही आजीला भेटायला जाते, आजी खोलीत तिचीच वाट बघत बसलेली..वैदेही समोर येते..आजीने तिला लहानपणीच पाहिलेलं..पण तिच्या डोळ्यांवरून आजीने तिला ओळखलं..” वैदेही..माझं लेकरू ते..”

असं म्हणत आजीला बांध फुटला..तिला जवळ घेऊन आजी रडायला लागली..तिचे मुके घेतले. इतर लोकही खोलीत आले. आजीला खूप दिवसांनी इतकं आनंदी पाहिलं होतं. असं वाटत होतं जणू कुटुंब पूर्ण झालंय..

वैदेहीने प्रेमाने आजीचे डोळे पुसले, आजीला कवटाळले आणि म्हणाली,

“आजी, आलीये ना मी भेटायला? का रडतेस आता?”

“आता कुठेही जायचं नाही तू..इथेच राहायचं, लवकर लग्न आटोपून घ्या..मने, आठवतंय ना तुला?लहानपणी पोटातच लग्न लावलेली यांची..”

वैदेहीची आई पूर्णपणे ही गोष्ट विसरून गेलेली, पण आजी असं म्हणाली आणि आईला पटलं, दैवलेख तो हाच..!!

पाहुणचार सुरू होता, आजीने वैदेही आणि देवांगला बाहेरच्या बागेत जायला सांगितलं. वैदेहीने आईकडे पाहिलं, आईने होकार देताच दोघेही बागेत गेले. देवांगला काहीही कळत नव्हतं काय बोलावं, मनात सई चे विचार घोळत होते. तिला हे समजलं तर काय वाटेल? मी हे काऊ करतोय? कशासाठी करतोय?

“नाव सांग..”

वैदेहीच्या या प्रश्नाने देवांग भानावर आला..

“नाव? देवांग, तुला तर माहिती आहे ना..”

“तुझं नाही, तिचं..”

“तिचं? कुणाचं?”

“तिचंच, जिचा तू विचार करतोय..”

देवांग गडबडला, काय उत्तर द्यावं? सई बद्दल हिला सांगावं का? पण मग आजी..तिचं काय, तिला कसं समजावू?

“हे बघ देवांग, जे काही असेल ते मला सांग.. त्या दिवशी ट्रेनच्या प्रवासात आपण जनरल बोललो, वैयक्तिक आयुष्याबद्दल नाही..त्यामुळे मला अंदाज नाही..”

वैदेही एका शांत डोहातील हळुवार झऱ्याप्रमाणे बोलत होती. तिचं बोलणं ऐकतच रहावंसं वाटत होतं. सोबत घालवलेल्या एवढ्याश्या क्षणांमध्ये ती त्याला जवळची वाटू लागली..आणि तो एका दमात बोलून गेला..

“हे बघ, असं आहे की माझं माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचं आहे..पण आजी अडून बसलीय की माझं लग्न तुझ्याशीच व्हायला हवं, आपलं लग्न आपण आपल्या आयांच्या पोटात असतानाच लावलं गेलेलं असं आजी म्हणतेय. म्हणजे आपण जन्मालाही आलो नव्हतो तेव्हापासून नवरा बायको आहोत..”

वैदेही त्याच्याकडे काही क्षण रोखून बघत होती आणि एकदम तिला हसू फुटलं, अगदी खळखळून.. कितीतरी वेळ..देवांग तिच्याकडे बघतच राहिला…

“बस की आता..केव्हाची हसतेय..”

“हसू नको तर काय? आपला बालविवाह नाही, गर्भविवाह म्हणायला हवा..” असं म्हणत तिचं हसणं पुन्हा सुरू..

“बरं.. तर असं सगळं आहे, सांग काय करायचं?”

“काळजी करू नकोस, मी आजीला समजावेन..तुझं लग्न तुझ्या मैत्रिणीसोबतच होईल..”

देवांग तिच्याकडे बघतच राहिला..त्याने खरं तर सुस्कारा टाकायला हवा होता..पण त्याला हे ऐकून कुठेतरी कळ आली..त्याचं अंतर्मन त्याला काहीतरी वेगळंच सांगत होतं..

एवढं म्हणत वैदेही घरात जायला पुढे निघाली..देवांग तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला..आणि एकदम चमकला..तिला थांबवलं..

“एक मिनिट, तुला कसं समजलं की माझ्या मनात काय चालू होतं ते?”

वैदेही काहीही बोलली नाही, फक्त हसली..

क्रमशः

 

9 thoughts on “दैवलेख (भाग 8)”

  1. ही कथा इरा अॅपवर दिसत नाही. आणि या पेजवर सगळे भाग दिसत नाहीत

    Reply

Leave a Comment