दैवलेख (भाग 13)
वैदेहीला साखरपुड्यात बघून देवांगला धक्का बसतो. खरं तर काही कारण नव्हतं एवढं बैचेन होण्याचं. दोघांचं ना लग्न ठरलेलं असतं ना दोघांमध्ये काही संवाद असतो, तरीही देवांगची अनामिक असुरक्षितता जागी होते. त्याचं मन थाऱ्यावर राहत नाही. तो आई बाबांना शोधतो, धाप टाकत त्यांच्याजवळ जातो.
“आई, बाबा.. वैदेही..”
आई बाबांना समजत नाही हा नक्की काय बोलतोय. बाबा त्याला एका खुर्चीवर बसवतात,
“हा आता सांग काय झालंय नक्की? वैदेहीचं काय?”
“बाबा वैदेहीचा साखरपुडा आहे..”
आई बाबांना हे ऐकून धक्का बसतो, कारण ते मुलाकडून आलेले असतात. मुलगी वैदेही आहे हे त्यांना माहित नव्हतं.
“असं? चला, चांगलं झालं की.. मुलगा खुप श्रीमंत आहे, हुशार आहे.. वैदेहीला चांगला मुलगा मिळाला..”
देवांग काही बोलू शकत नव्हता. त्याला कसला त्रास होत होता त्याचं त्यालाच कळत नव्हतं.
“देवांग तू घरी जा, आम्ही येऊ घरी कार्यक्रम झाला की. दमला आहेस तू… की थांबायचं आहे तुला?”
“अं? हो… नाही.. मी जातो…”
देवांगचे पाय तिथून निघत नव्हते, कसाबसा तो गेटपाशी आला. तेवढ्यात नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय गाडीतून उतरले आणि आत प्रवेश करू लागले. नवरदेव नीट दिसला नाही. देवांगच्या मनात आलं की कोण मुलगा आहे बघून तरी जावं.
स्टेजवर कार्यक्रम सुरु होतो. साखरपुड्याचे विधी सुरु होतात. अंगठीचा कार्यक्रम सुरु होणार असतो. देवांग नीट बघतो, मुलाचा चेहरा बघण्यासाठी थोडा पुढे येतो…
आणि बघतो तर… हा तर रजत… रजत पवार..
रजतचे सगळे कारनामे त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागतात. रजत किती नालायक माणूस आहे हे त्याला ठाऊक होतं.
आता त्याचं चित्त थाऱ्यावर राहिलं नाही, त्याला कसलंच भान राहिलं नाही.. तो सुसाट सुटला आणि स्टेजकडे पळाला..
मुलगा मुलगी एकमेकांना अंगठी घालणार तोच देवांग ओरडतो..
“थांबा… हा मुलगा वैदेहीसाठी योग्य नाही… “
सगळे त्याच्याकडे बघायला लागतात, भटजी माईक वरचं बोलणं थांबवतात. नातेवाईक मंडळी पुढे येतात, देवांगचे आई वडील घाबरत त्याच्याजवळ येतात. काय झालं? सर्वांना प्रश्न पडतो.
रजत उठून उभा राहतो, चिडलेला असतो..
“ए कोण रे तू मुर्खा…? चल निघ इथून…”
“रजत, तुला वैदेहीचं आयुष्य खराब करू देणार नाही मी…”
रजत त्याला नीट न्याहाळतो, मग त्याच्या लक्षात येतं की हा तोच, जो माझ्याकडे नोकरीसाठी आलेला आणि मी त्याला अपमानित करून बाहेर काढलेलं.
“अच्छा…तू तोच काय ..माझ्याकडे नोकरीसाठी भिक मागत आलेलास, बरोबर ना?”
“रजत तोंडावर ताबा ठेव, भीक नव्हतो मागत, काम मागायला आलेलो..”
“तेच रे… नोकरदार माणसं तुम्ही, काम मागणं काय अन् भीक मागणं काय, सारखंच..”
वैदेहीला तर कळेना काय बोलावं, पण रजत नालायक माणूस आहे हे आज तिला अजूनच प्रकर्षाने जाणवू लागलं होतं…
वैदेहीची आई समोर आली,
“देवांग, काय लावलं आहे हे? माझ्या मुलीचा साखरपुडा आहे आज…तू काय तमाशा लावलाय?”
“काकू ऐका माझं, हा मुलगा चांगला नाहीये”
“तुला काय त्याचं? तुला काय गरज आहे आमच्यात मधे मधे करायची?”
या प्रश्नांचं उत्तर खुद्द देवांगलाही माहीत नव्हतं. का? कशासाठी?
वर पक्षाची कुजबुज सुरू झाली, “वैदेहीचं लफडं आहे वाटतं, प्रियकर होता मग कशाला दुसऱ्याच्या गळ्यात पडायचं? पैसा पाहिला असेल दुसरं काय..
रजतची आई आणि नातेवाईक चिडले, वैदेहीच्या आईला म्हणाले,
“हा असा अपमान आजवर कुणी केलेला नाही आपल्या खानदानाचा..येतो आम्ही..”
रजतची आई त्याला घेऊन बाहेर पडली, रजत विरोध करत होता पण यावेळी त्याच्या आईने त्याला दटावलं. गर्दी सरू लागलेली, लोकं शिव्या देत बाहेर पडत होते..वैदेही आणि तिची आई अश्रू ढाळत बघत होते ..वैदेहीची आई देवांग जवळ आली आणि जोरात त्याच्या कानशिलात लगावली..
“काय मिळालं माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद करून? स्वतः तिचा स्वीकार केला नाहीस आणि आता दुसऱ्याची ही तिला होऊ दिलं नाहीस..काय मिळालं तुला हे करून? आता कोण करेल माझ्या मुलीशी लग्न?”
असं म्हणत आई खाली बसून रडायला लागली, देवांगने आईला उठवलं..
“काकू…मी करेन..”
देवांग बोलून गेला…सर्वजण बघत राहिले, देवांगने या क्षणाला मागचा पुढचा काहीही विचार केला नाही..तो पाटावर जाऊन बसला..
वैदेही आतून सुखावत होती, रजत पासून मुक्तता मिळाली..
देवांग च्या मनात याक्षणी सईचा विचार आला नाही ना तिला दिलेल्या वचनांचा…याक्षणी महत्वाचं होतं फकत वैदेहीला अडकू न देणं.
आपलं ते आपलंच असतं, जन्मोजन्मीचं नातं….अदृश्य बंधन.. वास्तविकतेत डोकावत नसलं तरी मनाच्या सुप्त कप्प्यात ते जागृत असतच की…शेवटी दैवलेखच ना तो…
क्रमशः
पुढील भाग लवकरच येतील, त्यासाठी खालील पेजला फॉलो करू शकता
https://www.facebook.com/irablogs/
please post next part at earliest.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!