Show must go on

 

जवळपास वर्षभर कोमात असलेली सुवर्णा आज शुद्धीवर आली होती. घरच्यांनी तर आशा सोडूनच दिलेली, पण आज डॉक्टरांनी अचानक फोन केला आणि सर्व नातेवाईक दवाखान्यात जमा झाले.  मुलगा सुधीर, सासू, नवरा सुभानराव आणि माहेरची काही मंडळी, सर्वजण तिला डोळे भरून पहात होती. डॉक्टरांशी बोलून झाल्यावर सुवर्णाला घरच्यांनी घरी नेलं. 

आपण गेले वर्षभर कोमात होतो या जाणिवेने ती विव्हळली. या काळात घरच्यांना किती दुःखातून जावं लागलं असेल? किती मानसिक उलथापालथ झाली असेल? हे सगळं आठवून तिला रडू येऊ लागलं. सुधीरला डबा कुणी दिला असेल? यांचं पथ्याचं जेवण कुणी बनवलं असेल? दूध, लाईट बिल, भाजीपाला, किराणा कुणी लक्ष दिलं असेल? सासुकडे कुणी लक्ष दिलं असेल? नाना प्रकारचे प्रश्न तिच्या मनात येऊ लागले. आपल्या नसण्याने यांची किती तारांबळ उडाली या विचाराने तिला खूप अपराधी वाटू लागलं. शरीर अशक्त होतं, पण तरी तिने पदर खोचला आणि ती कामाला लागली. 

किचनमध्ये एक स्वयंपाकिण स्वयंपाक बनवत होती, तिला पाहून सुवर्णाच्या लक्षात आलं, मी नसतांना हिच्याकडून स्वयंपाक करण्यात येत असावा. 

“अगं तू तिकडे काय करतेय? खोलीतून बाहेर का आलीस? डॉ ने आराम सांगितलाय..” नवरा काहीसा घाबरून म्हणाला, शेजारी सुधीरही उभा राहून बघत होता.

“मी नसतांना तुमचे काय हाल झाले असतील हो, माफ करा मला..” तिला बोलतानाही रडू यायचं आणि अपराधी वाटायचं…

“पण आता नाही, आता सगळं पहिल्यासारखं होणार..त्या बाईला सांगा उद्यापासून येऊ नको म्हणून..”

असं म्हणत सुवर्णाने सगळी जबाबदारी अंगावर घेतली. 

सर्वांना आवडतात म्हणून पोहे बनवायला घेतले. पोहे सापडेना, तिने सुधीरला आवाज दिला..

“अरे पोहे कुठे ठेवलेत? या डब्यात असायचे ना?”

“अगं आई मला नाही सांगता येणार, बहुतेक खालच्या ट्रॉलीत असतील..”

सर्वच वस्तूंच्या जागा बदलल्या होत्या, हाताशी काहीही लागत नव्हतं. 

“असं होतं बघा घरातली बाई घरात नसली की..”

पोह्यांना तिला वेळ लागला, शेवटी सर्वांना तिने बोलावलं..सर्वजण कचरत नाश्त्याला बसले. तिने आनंदाने वाढलं, सर्वांनी 2 घास खाल्ले खरे, पण अजून जाईना..

“काय झालं? पोहे चांगले नाहीत का?”

“नाही आई, अगं आता सकाळी ओट्स खायची सवय झालीये, दुसरा नाश्ता नको वाटतो..तब्येतीसाठी चांगलं असतं..”

“हे काय नवीन…” असं म्हणत तिने टेबल आवरून घेतला, तिचा हिरमोड झालेला. 

काही वेळाने सुधीर ची खोली ती पाहायला गेली, 

“सगळं अस्ताव्यस्त असणार, या मुलाला अजिबात सवय नव्हती कामाची..”

पण त्याच्या खोलीत सगळं अगदी टापटीप होतं.. सुवर्णाला बरं वाटलं..पण कपड्यांच्या जागा मात्र बदलल्या होत्या. ती नीट करायला गेली तोच सुधीर म्हणाला,

“आई असुदेत गं, त्या जागांचीच सवय झालीये आता..”

सुवर्णा सासूबाईंकडे गेली, त्यांनी अंथरुण धरलं होतं.. तिने त्यांच्या पायाला चोळायला निलगिरी तेल आणलं…सासूने नको नको म्हणत असतांना तिने त्यांचे पाय चोळायला घेतले…

“अगं हे नको, ते बरगंडी तेल असतं ते आण.. वर ठेवलं आहे बघ..आणि चोळताना वरून खाली चोळ…”

सासूची पण सगळी पद्धतच बदलली होती, आधी मी आणलेल्या तेलाने आणि मी केलेल्या मालिशला आपोआप डोळा लागायचा त्यांचा…

वर्षभरात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. वर्षभरा पूर्वी ती घरी सर्वांना सांगायची, “हे असं करा, ते तसं करा…”. आज तिलाच तिच्या घरचे सांगताय काय कसं करायचं ते..क्षणभर तिला स्वतःच्याच घरात परकं वाटू लागलेलं. 

सर्वजण तिला आराम करायला सांगून आपापल्या कामाला निघून गेले. काहीवेळाने लँडलाईन वर फोन वाजला, तिने उचलला, 

समोरून एक वयस्क व्यक्ती बोलत होता..

“सुभानराव, अहो वयोमानानुसार आता लक्षात राहत नाही, त्या दिवशी तुम्ही कविता ला पाठवू नका असं सांगितलं होतं, पण मी निरोप द्यायचं विसरलो. तुमची बायको शुद्धीवर आली ते चांगलंच झालं म्हणा, पण कविता चांगली रुळली होती घरात..सुधीरला पण तिच्या हातचे आवडायला लागलेले. सुवर्णाची परिस्थिती पाहून तुमचं लग्न लावून दिलं असतं पण सुवर्णा अशी अचानक शुध्दीवर येईल वाटलं नव्हतं…कविताला म्हटलेलं की घरात सगळं जमतंय का बघ, तिने घर छान ठेवलं होतं हो..तिचाही आधीचा संसार कोसळला होताच की…पण शेवटी, असो…बायकोची काळजी घ्या..”

सुवर्णा च्या पायाखालची जमीनच सरकली, म्हणजे ती स्वयंपाकाला येणारी बाई…बाई नसून सुभानरावांची होणारी पत्नी होती? सुधीर चं बदललेलं वागणं, सुभानरावांच्या चेहऱ्यावर असलेली भीती याची कारणं तिला आता समजली..

 तिच्या डोळ्यात पाणी आलं…

जीवनाचं एक कठीण सत्य तिला समजलं..

कुणाचं कुणावाचून अडत नाही…

आपण असलो, नसलो..जग सुरू राहतं…

प्रत्येकजण आपली सोय बघतो..

आपापल्या वाटेवर चालत राहतो…

आणि आपण एक वेडे,

आपल्यावाचून इतरांचे हाल होतील..

आपल्यावाचून कसं होईल…

तो/ते/ती माझ्याशिवाय राहूच शकत नाही…

असे गैरसमज उराशी बाळगून बसतो…

.

13 thoughts on “Show must go on”

  1. अगदी खरं. नात्याच्या गुंत्यात अडकून पडतो. आपल म्हणून सर्व करतो. आणि हेच त्रासदायक ठरते. कोणाचे कोणावाचून कधीच अडतं नाही

    Reply
  2. कुणाचं आपल्यावाचून अडेल असा समज करून घेतला की मग दुःख होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाचून आपले अडेल असाही समज करून घेऊ नये.

    Reply
  3. अहम् सर्वस्म् वाटत असते पण ते खरे नसते कुणाचेच कुणावाचून फार काळ अडून रहात नाही हेच खरे ✍️🎈

    Reply
  4. हे खरे आहे कुणाचे काही ही अडत नाही. …..kub chan stroy hoti

    Reply
  5. कुणावाचून कोणाचे अडत नाही परंतु त्या व्यक्तीची ही ह्रदयात जागा असते ति दुसऱ्याला देता येत नसावी.

    Reply
  6. माणूस सोबत आहे तोपर्यन्त च सगळी नाती. नंतर नवीन नाती शोधायला सुरवात. त्यामुळे कोणाचेच कोणा वाचून अडत नाही.

    Reply
  7. कुणाचेही कुणा वाचून अडत नाही… हेच सत्य आहे….

    Reply
  8. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय….

    Reply
  9. खर आहे स्त्री स्वताला इतराच्या सुखासाठी खुप कष्ट घेते आणी याच गैरसमजात असते की माझ्या नसेन तर कमीत कमी माझी उणिव तरी नवर्याला व मुलानां राहील पण वास्तविक जिवनात असे काहिच घडत नाही प्रतेक जण फक्त स्वताची खुशी व सोय बघतो हे वास्तव आहे

    Reply

Leave a Comment