उपकाराची परतफेड

हॉस्पिटलमध्ये पेशंटची मोठी लाईन लागलेली. प्रत्येकाला घाई होती. आपला नंबर येण्याची सर्वजण वाट बघत होते. सुधाचा पाचवा नंबर होता. तिच्या तीन वर्षांच्या मुलीला सर्दी झालेली म्हणून ती घेऊन आलेली. तिच्यानंतर एक बाई आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन आली, मोठी रांग बघून तिच्या मनाची तगमग सुरू झाली, कडेवरचं लेकरू तापाने बेजार होतं, रडत होतं. त्याला सांभाळलं जात नव्हतं. सोबत एक चार वर्षाचा तिचा मोठा मुलगा. तो इकडून तिकडे उड्या मारत होता. एकीकडे कडेवरच्या बाळाला शांत करायची अन दुसरीकडे मोठ्या मुलाला एका ठिकाणी शांत बस म्हणून सतत ओरडायची. पण दोघेही ऐकायचे नाहीत.

शेवटी असह्य होऊन तिने आधीच्या पेशंटला विनंती केली की माझं बाळ लहान आहे, मला आधी जाऊ देता का म्हणून. पण लोकं किती असंवेदनशील, एकानेही होकार दिला नाही.

“मला बसवलं जात नाहीये, मीच आजारी आहे” म्हणत त्यांनी सपशेल नकार दिला. मुख्य म्हणजे त्या सर्वजणी स्त्रिया होत्या. एका आईची तगमग दुसऱ्या स्त्री ला समजत नव्हती हे दुर्दैव. सुधा हे सगळं बघत होती. तिची मुलगी दीड वर्षाची असताना आई म्हणून झालेला त्रास तिच्या डोळ्यासमोर आला. चार नंबर पुढे सरकले, आईने कसंबसं बाळाला धीर धरण्यास भाग पाडलं पण आता बाळाचा संयम सुटला, बाळाला खूप त्रास होऊ लागला, सुधाने कसलाही विचार न करता त्या स्त्री ला सांगितलं..

“आता माझा नंबर आहे, पण तुम्ही जा आत..”

त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पटकन आत गेली, डॉक्टरांनी पटकन औषध दिलं आणि बाळ शांत झालं. आईची तगमग थांबली, तिला हायसं वाटलं. ती बाहेर आली आणि सुधाचे मनोमन आभार मानू लागली.

काही महिन्यांनी सुधा तिच्या मुलीला घेऊन शाळेच्या ऍडमिशन साठी रांगेत उभी होती. तिच्या मुलीला शाळेत प्रवेश घ्यायचा होता. वडील कामानिमित्त बाहेरगावी असल्याने सुधालाच सगळं करावं लागे, आज सुधा तापाने फणफणली होती, पण मुलीचा शाळेत प्रवेश महत्वाचा होता. शिवाय घरी कुणी नसल्याने मुलीला सोबत घेणं भाग होतं.

भलीमोठी रांग, सुधाचा जवळपास 25वा नंबर होता. सुधाला उभं राहवत नव्हतं. खूप त्रास होत होता. तेवढ्यात एक शिपाई आला आणि तो म्हणाला,

“मॅडम, तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं आहे..”

“मला?”

“”हो..”

आश्चर्यचकित होऊन सुधा आत गेली. समोर प्रिन्सिपल मॅडम आणि सोबत एक शिपाईन बाई उभ्या होत्या. त्यांना कुठेतरी पाहिल्या सारखं वाटत होतं.

“नमस्कार मॅडम, या शिपाईन बाई..बरीच वर्षे इथे कामाला आहेत. त्यांनी आग्रह केला तुमचं काम लवकर करा म्हणून. सहसा आम्ही असं करत नाही, पण त्या खूप वर्षांपासून इथे प्रामाणिकपणे काम करताय..त्यांची विनंती मी टाळू शकले नाही. हा घ्या फॉर्म, एवढा भरून द्या..बाकी प्रोसेस नंतर फोन करून कळवली जाईल तुम्हाला”

सुधाला खूप बरं वाटलं, त्या शिपाईन बाई कडे ती डोळे भरून बघत होती. बाहेर आल्यावर तिने विचारलं,

“खूप उपकार झाले तुमचे, पण माफ करा मी ओळखलं नाही तुम्हाला..”

“उपकार नाही, उपकाराची परतफेड केली फक्त. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्ही माझ्या बाळाला तुमचा नंबर दिला. माझ्या लक्षात होतं ते, आणि तुमचा चेहरा सुद्धा..”
****
म्हणतात ना, चांगली कर्म कधीही वाया जात नाही. तो वरचा बरोबर हिशोब ठेवतो आणि या ना त्या मार्गाने त्याची शाबासकी देतोच..!!!

2 thoughts on “उपकाराची परतफेड”

Leave a Comment