आयजीच्या जीवावर बायजी उदार

रमाला उत्तम स्वयंपाक येत असे, काहीही सांगा..तिखटातले प्रकार असोत वा गोड पदार्थ, अगदी सहजपणे तिला बनवता येई. आणि चव म्हणजे, अहाहा…माहेरी होती तेव्हा आई बाबा कौतुक करून करून अर्धे होत, पण सासरी मात्र..”तेवढं तर यायलाच हवं” असं म्हणत तिचे गुण मान्य करत नसत. पण फर्माईश मात्र अगदी पंचपक्वानाची..

“रमा आज खिचडीच बनव, पण सोबत छानपैकी मसाला पापड, आणि हो तू करतेस ना तशी शेवयांची खीर बनव..”

रमा यायच्या आधी शिळी पोळी आणि भाजीवर भागवणारे आता नवनवीन पदार्थांचा आग्रह धरू लागले. रमाला आवडायचं, पण कुणी एक शब्दही कौतुक करत नाही, आपल्या मेहनतीची जाणीव ठेवत नाही म्हणून तिचा उत्साह कमी होऊ लागलेला.

रमा आल्यापासून सासूबाईंनी दर आठवड्याला गावाकडून एकेक पाहुणा बोलवायला सुरवात केली, रमा यायच्या आधी सासूबाई कुणी आलं तर त्यांना जेवायला बनवावं लागणार म्हणून टाळाटाळ करत, पण आता?

“माई ये गं इकडे, जेवायलाच ये..आणि हो, तुझ्या नातवंडांना आण, सुनेला आण.. आणि शेजारी त्या मुसळे काकू रहायच्या ना? त्यांना आणलं तरी चालेल..”

एकाच वेळी 7-8 माणसं येत, आणि सासूबाईंच्या सूचना चालू होत..

“आज 8 जण येणारेत, वरण भात, शिरा, बटाटा भाजी, उसळ, कोशिंबीर, पापड, खीर बनव छानपैकी..”

पाहुणे आले की सासूबाईंचा जाम आग्रह,

“अहो घ्या की, अजून घ्या..खीर आहे पुरेशी, आणि संपलीच तर रमा टाकेन लगेच दुसरी, त्यात काय..”

कधी नव्हत ते सासूबाई पाहुण्यांना आग्रह करू लागल्या. आणि पाहुणे जातांना “आमचा पाहुणचार बघा किती छान असतो” असं स्वतःलाच मिरवत घेऊ लागल्या.

रमाने सगळं पाहिलं…सगळं केलं..ऐकून घेतलं..करत गेली..आता बस्स… बस्स झालं हे आयजीच्या जीवावर बायजीचं उदार होणं..रमाही साधीसुधी नव्हती, तिने एक प्लॅन केला आणि डोक्यात ठेवलं..

असंच एकदा त्यांनी गावाहून तब्बल 15 माणसं बोलावली, यावेळी रमाच पुढे होऊन म्हणाली,

“आई, काय काय करायचं पाहुण्यांना?”

सासूबाईंनी भलीमोठी लिस्ट सांगितली. रमाने सगळं सामान बाजारातून आणलं..बऱ्यापैकी तयारी करून ठेवली. पाहुणे स्टेशनपर्यंत आलेले, इथे यायला त्यांना 1 तास लागणार होता.

“रमे आता हात चालव पटापट..”

रमा चा मोबाईल वाजला..तिने उचलला..आणि मोठ्याने..

“काय????”

सासूबाई घाबरल्या,

“काय झालं?”

“आ..आ..आजी..”

“तुझी आजी? अरेरे, कधी गेल्या?”

“गेल्या नाही ओ, सिरियस आहेत..मला लागलीच जावं लागेल..”

सासूबाईंना घाम फुटला, रमाला थांबवता येणार नव्हतं..रमा अंगावरच्या कापड्यांवरच पर्स सोबत घेऊन पटकन निघून गेली.

सासूबाई जाम घाबरल्या, पंधरा माणसं घरी येणार, सगळा स्वयंपाक बाकी…त्यांना नाही सुद्धा सांगता येणार नाही..तरी त्यांनी स्वतःची समजूत काढली..

“रमा नाही तर काहीच नाही होणार का? एकेकाळी मी 10-10 माणसांच्या पंगती उठवल्या आहेत..(उठवल्या बरं का, कारण ताटात काही नसायचंच) असं म्हणत सासूबाईंनी हिम्मत करून पुढाकार घेतला. किचनजवळ जाताच काही सुचेना, सगळं तयार होतं समोर, भाजी चिरलेली, कणिक मळलेली..तरी काही समजेना.. कशीबशी भाजी टाकली, त्यातही मीठ मसाला समजेना..पोळ्या करायला घेतल्या, चार पोळ्या झाल्यावर विचार केला, बाकी गरमागरम करूयात. कोशिंबीर आणि पापड मध्ये 1 तास गेला..तोवर भाजी करपली..

“अरे देवा..”

म्हणत दुसरी भाजी करायला घेतली, पाहुणे म्हणून आलेल्या बायका गंमतच बघत होत्या..कसंबसं पाहुण्यांना ताटात एक भाजी, पोळी आणि कोशिंबीर वाढली आणि सासूबाईंनी सुस्कारा टाकला.

तोच पलीकडून आवाज आला,

“पोळी वाढा”

सासूबाईंच्या लक्षात आलं की त्यांनी नेमक्याच पोळ्या केलेल्या, बाकीच्या गरमगरम करणार होत्या.. त्यांना घाम फुटला, पटकन उठल्या आणि एकेक पोळी बनवून वाढू लागल्या. आलेले पाहुणे कसेबसे जेवत होते, एक बाई म्हणाली,

“आमच्या चुलत्या आलेल्या, तेव्हा तर म्हणे फार साग्रसंगीत स्वयंपाक केलेला होता…बरोबर आहे म्हणा, तेव्हा रमा होती…आज तिला जावं लागलं, तुम्हाला तर काही जमत नाही असलं..ती असती तर छान बेत झाला असता हो..”

सासूबाईंच्या जिव्हारी लागलं, रमाच्या जीवावर त्यांनी पंगती उठवल्या खऱ्या पण त्यामागे किती धावपळ आणि कष्ट होते हे त्यांच्या लक्षात आलं, पंगती उठवून त्या स्वतः क्रेडिट घ्यायला बघत होत्या पण शेवटी पाहुण्यांनाही समजायचं की रमा सुगरण आहे म्हणून सगळं चाललंय ते, आज पाहुण्यांनी बोलून दाखवलं तेव्हा त्यांना जाणीव झाली.

त्यानंतर सासूबाईंनी विनाकारण पाहुण्यांना बोलावणं आणि जेवू घालण्याचा आग्रह करणं बंद केलं, तिकडे रमा आजीसोबत मस्त चहा घेत होती..

“बरं झालं आजी वेळेवर फोन केलास, आता तुला कुणी भेटायला आलं की ऍसिडिटी झालेली तेवढं सांग फक्त.”

 

1 thought on “आयजीच्या जीवावर बायजी उदार”

Leave a Comment