आईची जागा

लग्नानंतर पहिल्यांदा नीलने मुव्हीची तिकिटे काढून आणली होती. लग्नाला अवघे चार महिने झालेले, लग्नाची नवलाई अजूनही ताजीच होती. नील आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्याला. घरात आई वडील तो आणि आता शलाका नव्याने प्रवेश झालेली नवी नवरी.

प्रत्येक नवऱ्याला असते तशी नीलचा बायकची ओढ होती, अरेंज मॅरेज असल्याने एकमेकांना नव्याने ओळखण्याचे, समजून घेण्याचे सौंदर्य काही वेगळेच. त्यांच्यातली मैत्री आणि प्रेम सोबतच बहरत होतं.

पण घर घर की कहाणी म्हणतात तसं आपला लाडका मुलगा आपल्यापासून दूर जातोय म्हणून सासूबाईंना असुरक्षितता जाणवू लागली. शलाकाला तिच्या माहेराहुन कडक शब्दात सांगण्यात आलेलं, की सासरहून काहीही तक्रार यायला नको, सासू सासरे हेच तुझे आई वडील, आता पूर्ण जीवन त्यांना समर्पित करायचं.

शलाका त्यांच्या शब्दाबाहेर नव्हती. घरासाठी ती पूर्ण समर्पित झालेली. सासूला आई मानून हवं ते करत होती, सासऱ्यांची काळजी आपल्या वडिलांप्रमाणे घेत होती.

मुव्ही ची वेळ दुपारी 1 वाजता होती, शलाकाने मुद्दाम ही वेळ निवडली कारण तोवर घरातील कामं आवरून व्हायची. नीलने घरी आईला “आम्ही मुव्हीला जातोय” म्हणून कळवलं आणि आईचे भावच बदलले.

“कशाला आता? काय गरज आहे? किती कामं आहेत घरात ती कोण करणार?”

शलाकाला प्रश्न पडला, घरातली सर्व कामं आवरून झाली असतांना सासूबाई असं का म्हणताय?

“आई, एखादं काम सुटलं का माझ्याकडून?”

“हो मग, दळण दळायचं आहे..गहू कोण निवडणार?”
शलाकाला आश्चर्य वाटलं, दळून आणलेल्या पिठाची गोणी भरून पडली होती, आणि आत्ता परवा विचारलेलं तेव्हा सासूबाई म्हणलेल्या की “आता महिनाभर दळणाची गरज नाही”

शलाका आणि नील तोंड पाडून मुव्हीला गेले, पण घरी झालेल्या प्रकाराने दोघांचा दिवस खराब गेलेला.
नंतर बऱ्याचदा असे किस्से घडले, कारण नसतांना दोन्ही नवरा बायकोनी एकत्र येऊ नये म्हणून बरेच खटाटोप झालेले. पण शलाकाने कधीच तक्रार केली नाही.

एकदा शालाकाला माहेराहून फोन आला,

“कशी आहेस बाळा?”

“मी मजेत आई, छान रुटीन बसलं आहे माझं इथे..आनंदात आहे मी”

“ऐकून बरं वाटलं..नील खूप समजूतदार आहे”

“हो आई, खूप जीव लावतात मला”

“आणि हो, सासरहून अजिबात तक्रार यायला नको..तुझ्या सासूबाईंना तुझी आई मानून ….”

शलाकाने वाक्य अर्धवट तोडलं..हे ऐकून ऐकून तिचं डोकं खराब झालेलं..

“बस झालं आई…सतत तेच तेच. तुझ्या सांगण्याचा उद्देश जरी चांगला असला तरी मला आता माणसं कळायला लागलीये. मी त्यांना आईसमान मानेन, पण आई नाही. माझी सर्व कर्तव्य बजावेल..मुलगी म्हणून माझे शंभर टक्के देईन..पण म्हणून तुझी जागा त्यांना देणार नाही..”

“असं का बोलतेय बाळा?”

“आई..तू मला एकदा मुव्ही ला जायला नकार दिलेला, कारण मी लेट नाईट शो बुक केलेला..तुला माझी काळजी होती म्हणून तू पाठवलं नाहीस. पण..दुसऱ्याच दिवशी वडिलांना सांगून सुट्टीच्या दिवशी दुपारी मैत्रिणींसोबत मला पाठवलंस..तुझ्या नकारामागे काळजी होती, प्रेम होतं…पण ज्याच्या मुळाशी केवळ द्वेष, मत्सर आणि असुरक्षितता असेल तर नात्याला कोणता आणि का सन्मान द्यावा? ज्येष्ठांचं ऐकायचं असतं असं म्हणतात, कारण त्यांच्या सांगण्यामागे काळजी असते, प्रेम असतं… पण केवळ मोठेपणाचा आव आणत आपल्या हट्टापायी त्याचा फायदा घेणाऱ्या नात्यांना न्याय देणं मला जमणार नाही..मी माझं कर्तव्य करेन, त्यात कुठलीही कसूर सोडणार नाही..पण तुझी जागा दुसऱ्या कुणाला देणार नाही”

समोरून आईचे डोळे पाणावले होते, मुलीच्या बोलण्यावर आई मात्र निशब्द झालेली.

3 thoughts on “आईची जागा”

Leave a Comment