“अंघोळा करा ना रे पटापट, मशीन लावायचं आहे, 10 वाजून गेले, कपडे धुणार केव्हा वाळणार केव्हा?”
सुट्टीच्या दिवशी घरोघरी ऐकू येत असलेलं वाक्य. मीनाच्या घरीही तेच. आज रविवार, एक 9 ला उठलं, एक 10 ला..घरातल्या चार मेम्बर साठी चारवेळा चहा झाला. चहाच्या पातेल्याने पार जीव सोडला होता. सुट्टीच्या दिवशी उशिराने अंघोळ करण्याची मजा आईला काय कळणार, म्हणून सर्वजण रील बघत लोळत पडले होते.
“सोन्या, तायडे…पटकन अंघोळी करा…”
“माझे कपडे मी धुवून टाकेन, नको टेन्शन घेऊ..”
“कशाला? मागच्या वेळी साबणाचा वास येत होता कपड्यांना नुसता…ते काही नाही, चला पटकन..”
नेहमीच्या या कटकटीला उपाय म्हणून मीनाने एक शक्कल लढवली. तिने दोन्ही मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी साधे ढगळे नाईट सूट तिच्या मैत्रिणीकडून शिवून घेतले. घरी गेल्यावर प्रत्येकाला तिने बोलावलं,
“हे बघा, आता सकाळी 7 वाजता मी मशीन लावणार आहे…हे आपापले कपडे घ्या, सकाळी उठुन अंगातले सगळे कपडे बादलीत टाकायचे आणि हे कपडे घालून बसायचं..”
सर्वजण आईकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते, आईला रोख कळला..
“हो सगळे, आतले बाहेरचे सगळे..असंही त्या 2-3 तासात लोळतच पडलेले असतात ना? कोण बघतं तुम्हाला? सगळे कपडे बादलीत हवेत. 7 वाजता मशीन लागणार म्हणजे लागणार, दिवसभर कपडे कपडे करायला मी मशीन नाही…”
सर्वांनी कपडे मागून पुढून बघितले, आईचा नवा प्रयोग..चला हेही करून पाहू.
सुट्टीचा दिवस उजाडला,आई खुश होती..तिचा नवीन प्रयोग आज सुरू झाला होता..सर्वांनी अंगातले कपडे बादलीत काढून दिले आणि नवीन नाईट सूट घालून आपापल्या टाईमपासच्या कामाला निघून गेले.
आई खुश झाली, तिने पटकन मशीन लावलं, तासाभरात कपडे झाले..सकाळच्या कोवळ्या उन्हात कपडे सुकायला टाकण्याचा आनंद एखाद्या गृहिणीला विचारा..अहाहा, काय भारी वाटत होतं आईला..आईने स्वतःचीच पाठ धोपटून घेतली.
सर्वांनी उशिराने अंघोळी केल्या, आज आई अंघोळीसाठी ओरडली नाही म्हणून मुलं आणि नवरा खुश, आणि कपडे झाले म्हणून आई खुश…
मीनाचं फार लवकर आवरुन झालं…रोज कपडे दोरीवर टाकायला तिला 1 वाजे, आज सकाळी 8 लाच टाकलेले. तिने मस्तपैकी जेवण केलं, tv वर सिनेमा बघितला, जराशी झोप घेतली..दुपारी चार च्या आसपास तिला जाग आली..हातपाय धुवायला ती बाथरूम मध्ये गेली आणि जोरात किंचाळली…तिच्या आवाजाने सर्वजण धावत आले..काय झालं? काय झालं?
“…नालायकांनो, सकाळी 7 ला मशीन लावायचं म्हणून नवीन कपडे तुम्हाला घेऊन दिलेत, आणि तुम्ही तेच परत धुवायला टाकले?”
तो नाईट सूट धुवायला टाकू नका हे सांगायचं ती विसरली होती..
आता मला सांगा, तिचीच चूक होती ना यात? 🤣🤣🤣
फारच सुंदर. प्रत्येक घरातील चित्र छान उमटवले.
छान व्यथा एका गृहिणीची