The mirror (द मिरर) – भाग 2 ©संजना इंगळे

भाग 1
https://www.irablogging.in/2020/04/the-mirror-1.html

पोलिसांना आता पलाश च्या सांगण्याचं गांभीर्य समजतं.

ते पलाश ला पुन्हा टेबल जवळ बोलवतात. “काय झालं नक्की समजेल का?”

“तेच सांगत होतो पण तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत होतात?”

“हे बघा जास्त बडबड करू नका…काय आहे ते सविस्तर सांगा…”

“हे बघा सर…”

“सर ह्या फाईल वर सही…”

“सर आरोपी साठी जामीनदार आलाय..”

“सर चहा आणू??”

पोलिसांना या गर्दीत बोलणं अवघड झालं..

“मिस्टर पलाश, आपण बाहेर जाऊ बोलायला…इकडे बोलणं शक्य नाही..”

“बाहेर म्हणजे…कुठे??”

“हॉटेल मध्ये..”“नाही सर…प्लिज…वाटल्यास आपण माझ्या घरी जाऊ..किंवा इथेच बोलू..”

“हे बघा मिस्टर पलाश, मी एक जबाबदार पोलीस ऑफिसर आहे, मला असं रस्त्यावर उभं राहून चौकशी करता येणार नाही..आणि तुमचं घर बरंच दूर आहे…चला हॉटेल लाच…तिकडे सेफ असेल सगळं…”

नाईलाजाने पलाश ला तिथे जावं लागतं..

“तर मिस्टर पलाश…मला नीट सांगा सगळं..”

“सर…मी पलाश निमसे…मुंबईत आई वडिलांसोबत राहतो..”

“अजून कोण कोण आहेत घरात?”

“मी, आई बाबा, काका, माझा चुलतभाऊ आणि आमचा नोकर..”

“बरंच मोठं कुटुंब दिसतंय..”

“हो पटनाईक साहेब…मी एक लेखक आहे, माझं पहिलंच पुस्तक मी प्रकाशित केलं. शस्त्र नावाचं… पण मला माहित नव्हतं की आयुष्यात त्या पुस्तकाने इतका धुमाकूळ माजेल..मी त्यात एकेक गोष्टी लिहीत गेलो..आणि सगळं सत्यात उतरत गेलं..त्या लेखकाच्या आयुष्यात जे जे घडत होतं ते सगळं माझ्या आयुष्यात घडत गेलं…”

“अजून काय काय आहे पुस्तकात?”

“सर..काल्पनिक म्हणून लिहलय…त्यात अनेक लोकांचे खून होतात, अनेक आयुष्य रसातळाला जातात…हे सगळं काल्पनिक असूनही…सर…”

इतक्यात एक मुलगा पलाश च्या जवळ येतो..

“सर, तुम्ही शस्त्र चे लेखक ना? मी वाचलंय तुमचं पुस्तक…खूपच भावलं मला..एक ऑटोग्राफ मिळेल प्लिज?”

“एवढं म्हणत तो कागद पेन पुढे करतो..”

पलाश त्या कागद अन पेनकडे बघून घाबरतो..आणि तिथून उठून निघून जातो…हॉटेल च्या दरवाजात येऊन थांबतो….खिशातुन एक सिगारेट काढून ओढायला लागतो…तो मुलगा नाराज होऊन तिथून निघून जातो..

पोलीस ऑफिसर पटनाईक तिथे येतात..

“इतका माज चांगला नव्हे..तो मुलगा..”

“साहेब…या कागद पेनची धास्ती घेतलीये मी..जे काही लिहीन ते खरं होत जातं… म्हणून मी आता कागद आणि पेन पासून दूर राहतो…”

पटनाईक वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहतात…

“तो मुलगा गेला..आपण बोलायचं आता?”

दोघेही पुन्हा टेबलापाशी जातात…तो मुलगा रागीट नजरेने पलाश कडे अजूनही बघत असतो..पलाश हतबल होऊन मान खाली घालतो..

“मला ते पुस्तक वाचायला मिळेल??”

पलाश त्याचा बॅगेतून ते पुस्तक काढून पुढे ठेवतो..

पटनाईक वाचायला सुरुवात करतात…

“ही कथा आहे एका दैवी मनुष्याची, जो जन्मतः एक दैवी वरदान प्राप्त करून आलेला असतो. साक्षात सरस्वती त्याचा वाणीतून प्रगट होते. असा हा अक्षय..एक विलक्षण व्यक्तिमत्त्व..त्याच्या या दैवी गुणाची ओळख त्याला तोवर होत नाही जोवर त्याने लिहिलेला शब्दन शद्ब त्याच्या डोळ्यासमोर घडतो. तो एका अश्या माणसाची कथा लिहितो की ज्याच्या आयुष्यात अनेक संघर्ष येतात. अक्षय कडून कुटुंबाच्या अनेक अपेक्षा असतात, पण अक्षयला शब्दांशीवाय काहीही उमजत नसे. नोकरी न करता अक्षय सतत लिखाणात व्यस्त असे..त्याची प्रेयसी, कावेरी. तिची मैत्रीण सानिका…सानिका कावेरीच्या मनात अक्षय च्या भविष्याबद्दल प्रश्न उभी करते आणि कावेरी अक्षय पासून दूर जाते. अक्षय ला जेव्हा समजतं तेव्हा तो रागारागाने लिहतो की “एक अज्ञात व्यक्ती सानिका चा एका मॉल मध्ये सुरा खुपसुन खून करेन…” लिहिल्यानंतर अक्षय ला जाणीव होते की हे खरं होईल, आणि लिहिलेलं सुद्धा पुसता येणार नाही, फाडून फेकलं तरी उपयोग होणार नाही. तो सानिका ला सम्पर्क करतो पण ती फोन उचलत नाही.अक्षय पोलीस स्टेशन गाठतो…तिथले पोलीस त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत नाही..आणि अचानक त्यांना फोन येतो की सानिका नामक मुलीचा खून झालाय… पोलीस अक्षय ला घेऊन हॉटेल मध्ये चौकशी साठी जातात, आणि तिथेच एक तरुण मुलगा बेशुद्ध होतो…”पोलीस चटकन पुस्तक बंद करतात…अंगावर शहारे आलेले असतात, छातीत धडधड होत असते…आत्तापर्यंत लिहिलेलं सगळं खरं झालं होतं… पलाश चं पोलीस स्टेशन ला येणं, सानिका च्या खुनाचा फोन येणं, पोलीस त्याला घेऊन हॉटेल मध्ये जाणं… आणि….पोलीस सही मागायला आलेल्या त्या मुलाला शोधतात ..

“वेटर इथला मुलगा कुठे गेला?”

“माहीत नाही साहेब…बिल सुद्धा दिलं नाही अजून..”

“शोधा त्याला..”

पटनाईक वेड्यासारखे त्याला शोधू लागतात…ते वॉश रूम मध्ये जातात, आतून कडी लावलेली असते. ते आवाज देतात, काहीही रिस्पॉन्स येत नाही…ते दरवाजा तोडतात आणि…

तो मुलगा बेशुद्ध पडलेला असतो…

क्रमशःLeave a Comment