मनाली आपला मुलगा समजून त्याला शिकवू लागली, समजावून देऊ लागली. छोटू आता जास्तीत जास्त वेळ मनाली कडे असायचा..”मोठी आई…मोठी आई” म्हणून घर दणाणून सोडायचा… मनाली त्याला आता अवघड विषय सोपे करून सांगत असे..वृषालीचा बराचसा ताण हलका झाला होता. सकाळच्या वेळी छोटू चं आवरून…छोटू ला शाळेत सोडून ती पार्लर मध्ये जात असे. त्यामुळे तिला पार्लर मध्ये जायला बराच उशीर होई… छोटू घरी येई तेव्हा तिला परत पार्लर सोडून यावं लागे, त्याला खाऊ पिऊ घालून मग परत पार्लर अशी तिची धावपळ होत असायची..पण वृषाली हुशार होती, आपलं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं…पार्लर चं रूपांतर एका बुटीक मध्ये करायचं होतं..त्यासाठी बरंच भांडवल लागणार होतं…पण मुलामुळे काहीसा गॅप पडत होता…
वृषाली, दिसायला सुंदर आणि तसंच सुंदरतेची आवड..तिने तिची खोली सुबक वस्तूंनी आणि कलाकुसर करून छानशी सजवली होती. पण फक्त तिची खोली…इतर खोल्या तिच्यासाठी नव्हत्याच जणू…
करुणा ने वृषाली ची ही धावपळ पाहिली. तिला सांगितलं..
“तू असं पार्लर सोडून येतेस मधेच…कितीतरी ग्राहक परत जात असतील…”
वृषाली चमकली…पहिल्यांदा तिच्या कामाबद्दल कुणीतरी आपुलकीने विचारत होतं… ती मोकळी झाली..
“बरोबर आहे हो वहिनी… फार वाईट वाटतं यामुळे…पण काय करणार…छोटूचं आवरावं लागतं ना..”
“अगं मग मी आहे की..आणि मनाली सुद्धा तुझ्या नंतर शाळेत जाते…आम्ही दोघी आवरत जाऊ त्याचं…”
वृषाली ला विशेष वाटलं…तिच्या स्वप्नासाठी या दोघी हातभार लावायला तयार होत्या…कधी नव्हत ते वृषाली ला या घरात असण्याचा अभिमान वाटू लागला…
छोटू चं बालपण मनाली पासून दूर ठेवण्यात आलं होतं…पण आता छोटू ची सगळी जबाबदारी मनाली स्वतःवर घ्यायला आनंदाने तयार झाली होती..तिलाही आईपण पुर्णपणे अनुभवायचं होतं..तिच्यात एक नवीन आईपण संचारलं. तिच्या यंत्रवत आयुष्यात आता एक नवीन प्राण भरला गेला होता.
दुसऱ्या दिवशी मनाली सकाळी लवकर उठली अन वृषाली च्या खोलीत गेली. वृषाली डोळे चोळत होती…छोटू उठून आईला उठवत होता…
“छोटू बाळ…आईला झोपू दे…चल तू…मी तुझं आवरून देते….”
“मोठी आई….”
“छोटू धावत मोठ्या आईकडे गेला..”
वृषाली ला हायसं वाटलं…तिची झोप पूर्ण होत नव्हती… मनाली ने सकाळ पासून छोटू चं आवरण्याची तयारी दाखवल्याने वृषाली निर्धास्त झाली.
मनाली ने छोटू ला अगदी प्रेमाने जवळ घेतलं…त्याला ब्रश करून दिला, त्याची अंघोळ घालून इस्त्री करून युनिफॉर्म घालून दिला. केसांना तेल लावून छान भांग पाडून दिला. वृषाली ब्रश करत होती अन छानपैकी तयार झालेला छोटू तिच्या समोर आला…तिला आज खूप छान वाटत होतं.
वृषाली ने डबा बनवायला घेतला..अर्धा किलो भेंडी होती…त्यातली अर्धी काढली, ती धुतली…नंतर तिच्या मनात काय आलं…पूर्णच भेंडी घेतली..त्याची भाजी बनवली. कणिक जरा जास्त मळून घेतलं.
छोटू ला सोडायला ती निघाली. तिचा आणि छोटू चा डबा ठेवला अन ते दोघे निघून गेले. मनाली ने आता स्वतःचं आवरायला घेतलं, तिचा डबा ओट्यावर दिसला, जरा जड लागला म्हणून तिने उघडून पाहिला….डबा तयार होता…वृषाली ने तिघांचा डबा बनवून ठेवला होता.तिचं फार मोठं काम वाचलं. इतक्यात तारा तिथे आली…
“वहिनी, तुमचं झालं की सांगा…मला डबा बनवावा लागेल..”
मनाली ने विचार केला..आपल्याकडे आहे अजून वेळ…तारा ला surprise देऊ…जसं वृषाली ने आपल्याला दिलं तसं..तिने पटापट डबा बनवून तयार ठेवला…आणि ती निघून गेली.
तारा आली, तिने पाहिलं की आपला डबा तयार आहे…ती मनाशीच हसली..
या तिघींचं हसणं करुणा गपचूप बघत होती…करुणा ला खूप बरं वाटलं…सासूबाईंच्या फोटो समोर जाऊन तिने नमस्कार केला…सासरेबुवा खुर्चीतून बघत होते..त्यांनी दोन्ही हात दाखवून जागेवरूनच करुणा ला आशीर्वाद दिला…न सांगताच त्यांना सर्व समजलं होतं…
तारा ला या दोघींचं वागणं दिसत होतं…आपण एकटे पडतोय का असं तिला वाटू लागलं. आपणही आपल्या कुटुंबात एकमेकात मिसळावं असं तिला वाटू लागलं. तारा सर्वात लहान सून, त्यामुळे फारशी जबाबदारी तिच्यावर नव्हती ..तिचं वयही कमी…माहेरी लाडात वाढलेली…अकाउंटंट म्हणून नोकरी होती अन पगारही भरपूर होता…त्यामुळे बाकी काही कमी नव्हती…कमी एकच..एकटेपणा….
तिचं माहेर खूप दूरचं… तिच्या मैत्रिणी, आई वडील सर्वजण लांब….इथे या कुटुंबात सर्वजण तटस्थ.. त्यामुळे ती फारशी सहभागी झाली नाही. ती तयारी करत असताना करुणा तिथे आली…
“काय गं… जायचं नाहीये का ?”
“जायचंय…तेच आवरतेय…”
“हे काय? इतकी मोठी नोकरी करतेस अन असे साधे कपडे? हे बघ, मी तुला काय आणलंय..”
तारा लहान मुलीसारखी जवळ जाते…
“जीन्स?”
“होय…तुला आधी तीच सवय होती ना?”
“हो पण…इथे सर्वांमध्ये चांगलं नाही वाटत ते..”
“किती गं गुणाची तू..लहान असूनही किती समजूतदार…पण काही हरकत नाहीये घरात असं घालायला…”
तारा ला सासूबाई आठवल्या, त्या सुद्धा असंच सांगत असायच्या… पण मनाली अन वृषाली ला वाटेल की हिला जास्त डोक्यावर चढवताय.. काही वाद नको म्हणून मी नाही म्हणायची…
“काहीही विचार करू नकोस , वृषाली अन मनाली काहीही म्हणणार नाही ..”
क्रमशः
Ramrajya |
I like this weblog very much, Its a real nice position to read and incur info.Raise range