“वैदेही..तुझी बायको, तिला तुझी बायको होतांना मला बघूदे.. म्हणजे मी माझ्या मार्गाला मोकळी”
आजी धाप टाकत बोलत होती,
“आजी शांत हो..तू झोप बघू, बाकी बघू नंतर”
देवांगने आजीला शांत केलं आणि तो आई बाबांना घेऊन बाहेर आला.
“आई, बाबा..आजीच्या मेंदूवर परिणाम झालाय, काहीही बोलतेय बघ ना..”
आई बाबांनी एकमेकांकडे पाहिले. आई धीर एकटवत म्हणाली,
“आजी बरळत नाहीये, खरं बोलतेय..”
“काय?? वेड लागलंय का सर्वांना? आत्ता काही वेळा पूर्वी सई सोबत माझं लग्न लावायचंय याची चर्चा आपण करत होतो, आणि आता हे काय, माझं लग्न झालंय? आणि ही वैदेही कोण?”
आई बाबांना कळत नव्हतं काय बोलावं, कसं समजवावं..दोघे अजूनही मौन होते.
“आता तुम्ही सांगणार आहात की मी जाऊ?”
“सांगते..वैदेही आपल्या जुन्या घरी आपल्या चाळीत रहात होती. तुम्ही 5-6 वर्षाचे असेपर्यंत एकत्र वाढलात, तुला आठवत नाही का ती?”
”
मला चाळीतलं खूप पुसटसं आठवतंय..वैदेही नावाची कोणी सोबत होती खरंच नाही आठवत मला, पण एक मिनिट, आम्ही 5-6 वर्ष एकत्र होतो बालमित्र म्हणून असं तू म्हणालीस, मग आमचं लग्न?”
“सांगते, त्यावेळी चाळीत सर्वजण मिळून मिसळून रहात. वैदेहीची आई आणि मी सोबतच प्रेग्नंट झालेलो. वैदेहीची आई तुझ्या आजीच्या खूप जवळ होती, खूप जीव लावायच्या त्या तिला. कारण वैदेही पोटात असताना तिचे वडील तिला सोडून गेले आणि तिची आई एकटी पडली, त्याकाळी घरातली आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताचीच असायची. वैदेहीची आई आधीच गर्भार आणि त्यात नवरा नाही, मानसिकरित्या ती ढासळत चालली होती. पोटच्या बाळाला कसं वाढवायचं हा प्रश्न तिला सतवायचा. आजी तिला धीर द्यायची..”
“मग, पुढे?”
“आजीच्या डोक्यात त्यावेळी काहीतरी आलं..आजी लहान असताना त्यांच्या गावात ही प्रथा असायची.. पोटातच लग्न लावलं जायचं”
“पोटात? अरे काय मजाक चाललीये?”
“तू मजाक वाटेल, पण पूर्वी असं नाही व्हायचं..दोन गर्भार स्त्रियांना एकमेकांसमोर उभं करून पोटाला कुंकू लावला जायचा. अर्थात एकीला मुलगा आणि एकीला मुलगी झाली तरच तो विवाह पुढे चालवला जायचा. दोघांना समानलिंगी अपत्य झालं तर तर ग्राह्य धरलं जात नसे”
“म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी तुझ्या पोटात असताना आणि वैदेही तिच्या आईच्या पोटात असतांना आमचं लग्न झालंय?”
“हो..”
देवांग डोक्यावर हात मारून घेतो.
“आजकाल ज्या मुलीला ओळखत नाही तिच्याशी पूर्ण ओळख झाल्याशिवाय लग्न करत नाही आणि इथे तुम्ही पोटात असतांना??? एकवेळ बालविवाह समजलो असतो, पण हे काय?”
वडील इतका वेळ सगळं शांतपणे ऐकत होते, पण आता त्यांनी पुढे येऊन देवांगला समजावलं.
“जे आहे ते असं आहे. ही गोष्ट आजीला आठवेल आणि ती हट्ट धरेल अशी आम्हाला कल्पनाही नव्हती”
“बाबा, आजीचे आता थोडे दिवस राहिलेत.. सॉरी पण मी प्रॅक्टिकली बोलतोय…आजीच्या हट्टापायी मी कुणा अनोळखी मुलीसोबत लग्न करणार नाही, त्यातच मी सईला सुद्धा शब्द देऊन आलोय. त्यामुळे आजीला काहीतरी समजवा आता…म्हणे लग्न झालंय तुझं..”
असं म्हणत देवांग त्याच्या खोलीत निघून गेला. इकडे देवांगचे आई आणि वडील आपापसात बोलू लागले.
“अहो ऐका, पोटात लग्न लावणं वगैरे आता कोण मानतो? आजी आहेत तोवर देवांगचा विवाह आपण थांबवूया”
“असं कसं म्हणतेस तू? देवांगचं लग्न बघण्यासाठी तिचा जीव तुटतोय.. आणि माझ्या आईला मी असं फसवणार नाही”
“देवांग काय म्हणाला ऐकलं ना तुम्ही? तो घर सोडून निघून जाईल आपण हट्ट केला तर..”
दोघेही विचारात पडले. काय करावं काही सुचेना..इतक्यात देवांग बाहेर येतो.
“आई, बाबा..मला एक आयडिया आलीये डोक्यात. आजीने वैदेहीला पाहिलंय इतक्या वर्षात?”
“नाही…”
“मग मी सईला समोर आणतो…वैदेही म्हणून, आजीला कुठे समजणार आहे…आजीही खुश आणि मीही..”
आई बाबा एकमेकांकडे बघतात.
“कल्पना वाईट नाहीये, आजीला फक्त कळायला नको”
“ठरलं तर मग, मी उद्याच सईला बोलवून घेतो”
*****
(देवांगचं ऑफिस)
“देवांग सर leave वर काय गेले तुम्ही तर सगळं काम चुकवून ठेवलं..सोडा ते, हे काम त्यांनाच द्यावं लागणार”
देवांगचे बॉस डिजाईन टीम वर चिडले होते. टीम ला केवळ एक book कव्हर डिजाईन करायला लावलं होतं. त्यात असंख्य चुका होत्या. नाविन्यपूर्ण असं काहीही नव्हतं, इंटरनेट वरून इकडचे तिकडचे ग्राफिक बघून फक्त कॉपी केलेलं होतं. देवांगचं काम तसं नव्हतं, प्रत्येक कन्सेप्ट वर तो स्वतः विचार करायचा आणि स्वतःला सुचेल तसं ग्राफिक डिजाईन करायचा. त्यामुळे त्याची सर्व चित्रे युनिक असायची.
बॉसचे बोलणे ऐकून राजेश धुसफूस करत बाहेर आला. राजेश म्हणजे देवांगच्या टीम मधला एक सिनियर. सिनियर असून आपल्याला देवांगच्या हाताखाली काम करावं लागतंय हे त्याला पटायचं नाही. टीम ला मी लीड करावं असं त्याला वाटे. देवांगला तो प्रतिस्पर्धी समजे..पण देवांगच्या मनाच्या सातव्या पडद्यातही असा विचार नव्हता. अतिशय सरळ माणूस होता देवांग.
राजेश त्याच्या डेस्कवर येऊन बसतो.शेजारीच सई तिचं काम करत बसलेली असते. तो खोचक भाषेत विचारतो..
“तुमचे ‘खास मित्र’ कधी येणारेत कळेल का?”
“का हो? फार आठवण येतेय त्यांची” सईनेही संधी सोडली नाही..
“हे डिजाईन देवांग सर पूर्ण करत नाहीत तोवर काम थांबून राहणार”
सईच्या डोक्यात एक विचार येतो..ती उठते आणि हळूच राजेशकडे जाते..
“डिजाईन नाही, पण देवांगच्या आयडियाज मी देऊ शकते, त्यावरून डिझाइन काढायला सोपं जाईल तुम्हाला”
“तू कशाला सांगशील मला त्याच्या आयडियाज?”
“काय आहे ना, मला माझा पगार पुरतच नाहीये सध्या..पार्लरमध्येच अर्धा खर्च होऊन जातो…मग मलाही खर्चाला जरा…”
“किती पाहिजे..”
असं करत दोघांमध्ये गुप्त करार होतो, त्यानुसार सई देवांगकडून आयडियाज विचारून राजेश ला सांगणार होती आणि त्याबदल्यात सई ला पैसे मिळणार होते आणि राजेशला शाबासकी.
“ही गोष्ट आपल्यातच राहील…आदेश ला कळता कामा नये, बंधुप्रेम उतू जातं त्याचं”
आदेश हा देवांगचा चुलत भाऊ..देवांगच्याच ऑफिसमध्ये तो इंजिनिअर म्हणून कामाला होता. आजच तो चेंन्नईचा प्रोजेक्ट संपवून 2 महिन्यांनी कंपनीत आला होता. त्यामुळे देवांग सोबत त्याला आजीला भेटायला जायला जमलं नाही. दोघे भाऊ कामात हुशार.. ऑफिसमध्ये दोघांना एकमेकांचा आधार असायचा.
**********
“उद्याच?”
“हो , उद्याच बोलावतो सई ला”
“पण येईल का ती?”
“का नाही येणार?”
(बोलणं सुरू असताना आतून आवाज आला…आजीच्या हातून दाराजवळ असलेली एक वस्तू चुकून पडते..आजी घाबरून दारापासून पळत बेडकडे जाते आणि कॉटवर टुणकन उडी मारत पांघरूण ओढून घेते)
Waiting for next part
Very nice