व्हेंटिलेटर

गोपाळराव व्हेंटिलेटरवर आपले अखेरचे क्षण मोजत होते. 2 दिवस बरं वाटायचं, दोन दिवस परत श्वास घ्यायला त्रास व्हायचा. कधी कधी आजूबाजूचं अगदी स्पष्ट ऐकू यायचं, तर कधी काय चाललंय काहीच कळायचं नाही. मुलं मोठ्या हुद्द्यावर होती, पण आपलं सगळं काम सोडून वडिलांना देशातल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये रवाना केलं. गोपाळरावांना आज जरा बरं वाटत होतं, सलाईन लावलेला हात अलगद बाजूला ठेऊन ते इकडेतिकडे बघू लागले. त्यांचं लक्ष शेजारच्या कॉट वर गेलं..आणि जे पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसेना…देवेश कपूर? 1900 च्या शतकातील, त्यांच्या काळातील सुप्रसिद्ध नट..त्यांच्याच बाजूला..आयुष्यात एकदा तरी त्याला भेटावं असं तरुणपणी त्यांना वाटायचं, पण आज भेट झाली..तेही अश्या परिस्थितीत.

1900 च्या शतकातील सुप्रसिद्ध नट “देवेश कपूर”ला पाहिलं गोपाळराव बैचेन होत. गोपाळराव आणि देवेश कपूर एकाच वयाचे..गोपाळरावांना नाटकाची भारी हौस, त्यांच्यात अभिनय कौशल्य सुद्धा खूप ताकदीचं होतं. शाळेत, कॉलेजात त्यांचा अभिनय पाहून सार्वजण त्यांना म्हणायचे की तू भावी सुपरस्टार होणार. गोपाळराव सुद्धा तशी स्वप्न रंगवत..पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.. वडिलांनी नाटक सोडून शहरात एक नोकरी करायला भाग पाडलं, विरोध करायला संधीच नव्हती, कारण घरातील परिस्थिती बघता बहिणीचं लग्न, भावाचं शिक्षण..सगळं त्यांच्या खांद्यावर येऊन पडलं. आवड सोडून त्यांना नोकरी करावी लागली.अभिनय कायमचा सुटला. त्यांच्याच बरोबरीचा देवेश कुमार मात्र एकेक चित्रपट गाजवत होता, तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता, लोकांनी अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं होतं. देवेश कुमारला बाहेर निघणं मुश्कील व्हायचं, कारण लोकांच्या झुंडीच त्यांना भेटायला गर्दी करायच्या. त्याला पाहून गोपाळराव बैचेन होत, मी अभिनय सोडला नसता तर मलाही अशीच प्रसिद्धी मिळाली असती, मीही आज तरुणांमध्ये ताईत बनलो असतो. आपल्या भूतकाळाला आणि परिस्थितीला कोसत गोपाळराव आयुष्य पुढे ढकलत होते.

पुढे कावेरी सारखी समजूतदार जोडीदार मिळाली. संसार सुखाचा केला तिने, पदरात दोन मुलं टाकली. त्यांना चांगले संस्कार देऊन खूप मोठं केलं. आई वडीलांसाठी जीव ओवाळून टाकतील अशी ती मुलं होती. कावेरीबाईंनी सुद्धा गोपाळरावांना एक शांत, नितळ आणि पवित्र आयुष्य दिलं. सगळं सुख मिळालं होतं, पण ती एक सल सतत मनाला बोचत असायची. वय झालं, एकेक आजार मागे लागले आणि परतीचे दिवस सुरू झाले. मुलांनी अमाप खर्च केला, पण पैशाने वृद्धत्व थोडीच थांबतं?

शेजारच्या कॉट वरील देवेशकडे ते एकटक बघत होते. दोघेही दोन टोकाचे, पण आज एकाच समांतर जागी निपचित पडलेले. याक्षणी त्या देवेश कुमार यांची ना प्रसिद्धी सोबत होती ना प्रसिद्धीचं वलय. गोपाळरावांना आज दोघांमधील अंतर काहीच वाटत नव्हतं.

तिकडे नर्स दोन माणसांशी हुज्जत घालत होती..

“त्यांच्या मुलाने पैसे पाठवले की मिळतीलच ना तुम्हाला, त्यांचं सगळं बघावं लागेल, थोडे दिवस तरी”

देवेश साठी भाडोत्री केयरटेकर आणले गेले होते. त्यांची सेवा करण्यासाठी सुद्धा माणसं विकत घेतली जात होती. देवेश यांची दोन लग्न होऊन मोडलेली, तरुणपणात प्रसिद्धी आणि यश यामुळे सुंदऱ्या त्यांच्याभोवती पिंगा घालत, पण साथ देणारी बायको त्यांना भेटली नाही. आधीच्या दोन बायका प्रॉपर्टी चा हिस्सा घेऊन परदेशी स्थायिक झालेल्या. बापाने 2 लग्न केली म्हणून त्यांची मुलं बापापासून चार हात दूर होती. या वयात प्रसिद्धी, पैसा काहीही कामात आलं नाही.

देवेश यांना जाग आली, हातवारे करून त्यांनी नर्स ला बोलावलं..
नर्स वैतागून म्हणाली,

“नाही येणार तुमचा मुलगा…आम्ही संपर्क केला होता, पण कामात व्यस्त आहे तो”

देवेश शेवटच्या क्षणी त्यांच्या मुलांची वाट बघत होते, पण तोही आला नाही. नर्स गोपाळरावांजवळ आली,

“अहो तुमच्या मुलांना समजवा काहीतरी, एका वेळी एकच जण येऊ शकतो आत..आता दोघे भांडताय, आधी मी जातो म्हणून, तुमची बायको सकाळपासून माळ जपतेय, अन्नाचा कणही घेतला नाही त्यांनी”

हे ऐकून गोपाळरावांना भरून आलं. त्यांनी एकदा देवेश कपूर कडे पाहिलं.. त्या क्षणाला गोपाळराव स्वतःला जगातील सर्वात श्रीमंत आणि नशीबवान समजत होते. देवेश कुमारची लोकप्रियता, प्रसिद्धी, नावलौकिक, ग्लॅमर सगळं काही त्यापुढे फिकं पडलं..

देवेश कुमार मुलाच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले आणि तिकडे मीडिया त्यांचा TRP वाढवण्यासाठी देवेश यांच्या मृत्यूची खबर ऐकण्यासाठी हापापलेली होती. भाडोत्री केयरटेकरला त्यांचा मुलगा पैसे देत नव्हता, म्हणून ती माणसंही वैतागून निघून गेली. ज्या देवेश कुमारच्या लौकिकाचं गोपाळरावांना अप्रूप वाटायचं, आज त्याचीच त्यांना दया येत होती.

देव कुणाचीही ओंजळ रिकामी ठेवत नाही, कुणाला पैसा, प्रसिद्धी देतो तर कुणाला जीव लावणारी माणसं.. माझी ओंजळ बघून आज भरून पावलो मी..

शेजारी असलेल्या देवेश कुमार यांनी प्राण सोडला, नर्स डॉक्टर ची धावपळ सुरु झाली. मुलगा पैसे देत नाही हे ऐकताच त्यांनी शेवटची आशा सोडून दिली होती. खरं पाहता देवेश यांच्यापेक्षा गोपाळरावांचे अवयव जास्त निकामी झाले होते, पण कदाचित आपल्या माणसांच्या उबेमुळे त्यांना जीवन सुसह्य वाटत होतं.. चार श्वास जास्त घेता आले त्यांना…आणि शेजारच्या पार्थिवाला… असह्य !!!

438 thoughts on “व्हेंटिलेटर”

Leave a Comment