“येतो मी, पोरी…”
“थांबा…हे घेऊन जा..”
एका पिशवीत वानोळा भरलेला असतो..
मामांना पुन्हा गलबलून आलं..मामांची बहीण सुदधा कधीच रिकाम्या हाताने पाठवायची नाही.
वृषाली चा नवरा तारा च्या नवऱ्याला, म्हणजेच लहान भावाला फोन करतो..
“पाणीपट्टी भरलीये बरं का मी..”
“बरं दादा..आता काय, लंच ब्रेक असेल ना?”
“हो ना..”
“काय दिलंय मग वहिनीने?”
“पालक..”
“अरेवा, आज मलाही पालक..”
“अरे म्हणजे वेगळीच भाजी आहे, छान लागतेय पण..बटाटा घातलाय..”
“काय? आपल्याला एकच भाजी दिलीये..कसकाय? तीळ घातलाय का त्यात?”
“हो रे…यांनी एकत्र स्वयंपाक केलेला दिसतोय..”
“आजवर असं कधी झालं नाही रे..पण जाऊदे, चांगलंय ना…एकत्र येताय तिघी..”
“दादा तुझ्या लक्षात येतय का? करुणा वहिनी आल्यापासून घर बदललं आहे..आपल्या बायका आता कुरकुर करत नाहीये..”
“खरंय…”
तिघे भाऊ शांत स्वभावाचे, त्यांच्यात कसलाही वाद नव्हता…पण मोकळेपणाने ते कधीच आपलं प्रेम व्यक्त करत नव्हते..आपापल्या संसारात रमले होते. घरात एकत्र राहण्याबद्दल त्यांना कसलीही अडचण नव्हती, पण वृषाली अन तारा च्या हट्टापुढे त्यांचं काहीही चालायचं नाही..
संध्याकाळी तिघे भाऊ घरी आले, एकत्र बसून चहा पीत होते…वृषाली चा नवरा म्हणाला,
“दादा, मी पाणीपट्टी भरलीये बरं का..”
ते बोलणं मनालीच्या नवऱ्याच्या, म्हणजेच विशाल च्या जिव्हारी लागलं..खरं तर वृषालीच्या नवऱ्याच्या- महेश च्या ध्यानीमनी नसताना विशाल ने त्याचा चुकीचा अर्थ घेतला..
कारणही तसंच होतं, विशाल ने बरीच मोठी रक्कम शेयर बाजारात अडकवून स्वतःचं नुकसान करून घेतलं होतं.. सासरेबुवांनी याचमुळे विशालशी बोलणं सोडून दिलेलं, आई होती तोवर विशाल ला माया लावणारी व्यक्ती घरात होती…पण आता विशाल एकटा पडला होता, दोन्ही लहान भावांनी कसंबसं घराचं कर्ज फेडलं होतं…
विशाल ने खरं तर याच विचारापायी पैसे अडकवले होते की जर भरपूर रक्कम मिळाली तर हफ्ता फिटेल…घरात चार नवीन गोष्टी आणता येतील.. पण त्यालाच काय माहीत की नशीब त्याला साथ देणार नाही आणि नुकसान होईल.
दोन्ही भावांना विशाल बद्दल काहीही राग नव्हता, पण विशाल कायम मनात सल घेऊन वावरायचा… मनात एक न्यूनगंड निर्माण करून ठेवलेला…त्यामुळे कुणी काहीही बोललं तरी रोख आपल्याकडेच आहे असं त्याला वाटायचं…त्यात त्याच्या बायकोला, मनाली ला मूल होत नसल्याची सल…दोघेजण अगदी तुटक तुटक संसार करत होते…ती दोघे आतून विखुरली होती..मग एकमेकांना साथ तरी कितपत देणार..
सर्व भाऊ बसलेले असता करुणा भावांचा लहानपणीचा फोटो अलबम घेऊन आली..
तिघे भाऊ कौतुकाने पाहतात…
“वहिनी, कुठे मिळाला हा अलबम?”
“सासूबाईंची खोली आवरली आज..तिथे मिळाला..”
महेश आणि प्रताप ने अलबम बघायला सुरवात केली..त्यांचे अगदी लहानपणीचे फोटो होते, पहिल्या वाढदिवसाचे, ट्रिप ला गेलेले असतानाचे, जेजुरी दर्शनाचे, शाळेत मिळालेल्या बक्षिसाचे..
“ए प्रताप, तुला हे बक्षीस कसलं मिळालं होतं?”
“चित्रकलेचं…”
आवाज ऐकून मनाली, वृषाली अन तारा सुद्धा बाहेर येतात..
“चित्रकला? काय हो? तुम्हाला चित्रही काढता येतं? सांगितलं नाही कधी..” तारा म्हणाली..
“कसलं चित्र काढलं होतं भाऊजी?” – मनाली…
“जाऊद्या ना वहिनी, आता काय करायचं आहे..”
“सांगा हो…”
“फुगा..”
सर्वांमध्ये एकच हशा पिकतो..
“फुगा काढला होता भाऊजी?”
“बालवाडीत होतो, तेव्हा दुसरे काय विषय असतील?”
“आणि या फोटोत हा कोण आहे? नाक किती गळतय त्या मुलाचं… फोटो काढताना तरी पुसून घ्यायचं..”
महेश तोंड लपवतो..
विशाल म्हणतो, “हा आपला महेश..”
“अरे देवा..तरी बरं, लग्न आधी फोटो पहिला नव्हता…” – वृषाली
“तुला माहितीये का वृषाली, महेश कायम मार खायचा पप्पांचा…एकदा त्याने काय केलेलं माहितीये? लपाछपी खेळताना कपाटात जाऊन लपून बसला, आणि नेमके बाबा त्या खोलीत गेले…महेश घाबरला, बाबा रागावतील म्हणून बाहेर आलाच नाही, त्याला जोराची सु लागली….बाबांचं लक्ष गेलं, कपाटातून कसलं पाणी येतंय म्हणून कपाट उघडलं तर महेश आतमध्ये…बाबांनी जो बदडलं जो बदडलं….”
सर्वजण खळखळून हसायला लागतात..
खुर्चीवर बसलेले सासरे सुद्धा जुन्या आठवणी आठवून हसू लागतात..
खूप दिवसांनी घरात असं खळखळून हसण्याचा आवाज येऊ लागला होता…
इतक्यात वृषाली ला एक फोन येतो अन ती बोलायला बाहेर जाते..
“2 bhk चालेल…एरिया चांगला हवा फक्त…”
करुणा च्या कानावर ते पडतं अन तिच्या काळजात धस्स होतं…
क्रमशः
1 thought on “रामराज्य (भाग 7) ©संजना इंगळे”