तिने आधी सासरेबुवांची भेट घेतली.
“काय सांगू सुनबाई तुला…हिची इतकी धडपड असायची की एकमेकींना तिने एकत्र आनावं म्हणून खूप प्रयत्न केले..पण सगळं व्यर्थ..”
करुणा ने नीट विचार केला…प्रत्येकाचा स्वभाव, त्यांचे चांगले वाईट गुण ओळखून घेतले. मनाली स्वभावाने तशी शांत..शिक्षिका होती ना ती..मुलांना घडवण्याचं काम उत्तम करे…
एकदा वृषाली च्या खोलीतून तिच्या मुलाला रागवताना तिचा आवाज आला तशी करुणा तिकडे धावत गेली..
“नको गं बोलू त्याला…”
“बोलू नको काय, किती कमी गुण आहेत माहितीये का त्याला..”
“अगं मग त्याला असं रागावून कसं चालेल? मनाली शिक्षिका आहे, तिची मदत घे…”
“सांगून पाहिलं मी वहिनी..पण त्यांना तरी वेळ मिळतो का..”
करुणा ने विचार केला…संध्याकाळी मनाली शाळेतून आल्यावर तिने मनाली ला सांगितलं..
“तुझ्या वाटचं काम मी करत जाईल यापुढे… पण माझं एक काम करशील?”
“बोला ना वहिनी..”
“छोटू चा अभ्यास घेशील?”
मनाली विचार करते, आजवर मनाली आणि वृषाली दोघीही तुटक तुटकच वागत होत्या..पण छोटू बद्दल मनाली ला अपार माया…देवाने तिची कूस काही उजवली नव्हती..वृषाली तिच्या नंतर येऊनही तिला मूल झालं..पण मनाली अजूनही….
वृषाली जेव्हा बाळंतपणानंतर घरी आलेली तेव्हा तिच्या हातातलं बाळ पाहून मनालीला अपार माया दाटून आलेली, छोटू ला तिने लळा लावायचा प्रयत्न केला पण…वृषाली च्या मनात कुणीतरी भरवलं की वांझ स्त्री ची नजर बळावर नको..आईचं हृदय, तिने मनाली ला दूर ठेवायचा प्रयत्न केला…मनाली पार कोसळली होती…घरात तिला काही अंशी का होईना, आईपण मिळालं होतं पण तेही हिरावलं गेलं….चूक दोघींचीही नव्हती..पण यामुळे दोघींच्या मनात विष पेरलं गेलं…
मनाली छोटू चं बालपण डोळ्याने बघतच राहिली, वाटायचं छोटू ला कडेवर घ्यावं, त्याचे मुके घ्यावे…पण वृषाली ची नजर तिला दूर करे…
आणि आज इतक्या वर्षांनी छोटू जवळ येणार म्हणून..मनाली सुखावली होती…
“चालेल वहिनी…पण…”
“पण बिन काही नाही..मी वृषाली ला बोलावते..”
दोघांना समोरासमोर घेऊन…
“वृषाली, तुझी मोठी जाऊ मनाली शाळेत शिक्षिका आहे…तिला चांगलं माहीत आहे की मुलांना कसं शिकवावं….तिच्याकडे आता छोटू ची जबाबदारी दे..”
“चालेल वहिनी…छोटू ने फक्त अभ्यास करायला हवा..”
इतक्यात छोटू तिथे येतो..
“बाळा…हे बघ…तुला आता मोठी आई अभ्यास शिकवणार आहे..”
“मोठी आई?”
“हो…काकू म्हणजे मोठी आई….आजपासून तिला मोठी आई म्हणायचं..”
छोटू ला गम्मत वाटली…तो दिवसभर मोठी आई मोठी आई म्हणून काकूला हाक मारत होता..
मनाली ला त्या दिवशी काय वाटलं हे शब्दात सांगणं अवघड आहे…कुणीतरी आपल्याला आई म्हणतंय याचं सुख तिला मिळत होत…विशेष म्हणजे वृषाली ने याला परवानगी दिली होती… इतक्या वर्षांनी का होईना, वृषाली आपल्या मुलाला माझ्या जबाबदारीत देतेय यासाठी वृषाली बद्दल मनाली चा राग निवळला…
वृषाली ला सुद्धा खुप हायसं वाटलं…एक फार मोठं ओझं कमी झालं होतं…वांझ वगैरे सगळं झूठ आहे हे कळायला तिला अनेक वर्षे मोजावी लागली होती…
करुणा वृषाली जवळ येते…
“आता काळजी करू नकोस..असं एकमेकांचं सहकार्य लाभलं ना तर तिघांचे संसार सुखाचे होतील…”
वृषाली ला ते पटत गेलं…आणि करुणाचा रामराज्य घडवून आणण्याचा पहिला पाया रचला गेला…
क्रमशः
Ramrajya |
1 thought on “रामराज्य (भाग 4) ©संजना इंगळे”