दैवलेख (भाग 6)

#दैवलेख (भाग 6)

वैदेही आणि तिची आई, चाळीत रहात होते तोवर ओळख होती. पण आता कसं शोधणार त्यांना हा मोठा प्रश्न त्यांना पडला. तिकडे देवांगच्या डोक्याचा विचार करून करून पार भुगा झालेला. केलेला सगळा प्लॅन फिस्कटला तर होताच, वर सईचं घरात इम्प्रेशन सुद्धा फारसं चांगलं पडलं नव्हतं. त्यात आजीने सईला वैदेही मानलं तर नाहीच, वर तिला कानाखाली देऊन बसली. वर “मला फसवतात का” म्हणून आजी इकडे रुसून बसली, आणि “माझा अपमान केला” म्हणून सई बोलत नव्हती. देवांगला आता काहीच सुचत नव्हतं. तो खोलीत गेला आणि दार लावून घेतलं. बसून राहिलं तर विचार करून करून डोकं फुटायची वेळ येईल, म्हणून त्याने त्याचा कॅनव्हास काढला आणि रोजच्याप्रमाणे चित्र काढायला सुरवात केली. चित्र काढायला लागला की तो भोवतालचं जग विसरून जाई. त्याच्या सुप्त मनाचं प्रतिबिंब त्या कागदावर उमटत असे, आणि चित्र पूर्ण झाल्यावर त्यालाच समजत नसायचं हे कसं चितारलं गेलं ते.

आजही त्याने बराच वेळ घालवला, अडीच तास तो चित्र काढत बसला होता. वेळेचं भान त्याला नव्हतं, मन शांत झालं होतं. भरती ओसरल्यानंतर काहीकाळ जशी शांतता पसरते तसं देवांग काही काळ झालेलं विसरून गेला होता. चित्र पूर्ण झालं..तो चित्रापासून दूर गेला आणि चित्राकडे पाहू लागला. झालेल्या घटनांची चलबिचल पुन्हा त्याच्यावर आरूढ झाली. पण चित्र पाहून तो चक्रावला.

चित्रात एक मुलगा आणि एक मुलगी काही अंतरावर उभे होते. प्रचंड वारा सुटलेला, वादळच अगदी ! तो मुलगा या वादळापासून स्वतःला वाचवण्यासाठी दूर जाऊ पाहत होता..पण समोरची मुलगी तटस्थ उभी होती. तिची लाल ओढणी हवेने त्या मुलाच्या चेहऱ्यावर उडाली होती आणि म्हणून त्या मुलाला तिचा चेहरा दिसत नव्हता. वादळ सुद्धा विचित्र चित्रित झालेलं..सोसाट्याचा वारा, पण पक्षी आनंदी होते, हवेत स्वतःला झोकून देऊन वाऱ्याचे पंख उसने घेऊन विहरत होती..मोर झाडाच्या आडून मोर नाचत होता..शेजारून एक ट्रेन जात होती, ट्रेनचं रूळ ते रूळ नव्हतं, हार्मोनियमची बटणं होती ती..ट्रेनचाकर्कश आवाज न येता सुमधुर संगीत निनादत होतं..

देवांग प्रचंड चकित झाला. हे काय चाललंय आपल्या मनात? वादळ..तेही इतकं सुंदर? सुखाच्या क्षणांची वार्ता घेऊन येणारं? या निसर्गचत्रात ती ट्रेन कशाला यावी..आणि समोरची ती मुलगी कोण?
“म्हणजे..घरात जे झालं ते चांगल्या साठी झालं असं तर नाही ना? आणि ती मुलगी म्हणजे वैदेही तर…देवांग आवर स्वतःला.. सई सोबत तू प्रामाणिक असतांना असा विचार येऊच कसा शकतो तुझ्या मनात..” देवांग स्वतःशीच बोलत होता.

_____

(दुसऱ्या दिवशी)

देवांगच्या ऑफिसमध्ये राजेश आणि सईचं काहीतरी बोलणं सुरू असतानाच आदेश समोर आला (आदेश देवांगचा चुलतभाऊ, देवांगच्याच ऑफिसमध्ये काम करणारा). सई सोबत तो कधीच सरळ बोलत नसे, फटकळ होता. देवांगने सईला मैत्रीण केलेलं त्याला आवडलं नव्हतं, पण उगाच दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात कशाला हस्तक्षेप, म्हणून तो गप होता. राजेश आणि सई मध्ये देवांगने दिलेल्या आयडियाची डील झाली होती याची भणक आदेशाला बाकीच्या एम्प्लॉयीज कडून लागली होती, पण बक्कळ पुरावा नसल्याने आदेश गप होता. तरी त्याने सईला तिरक्यात विचारलंच..

“देवांग नसतांना अशी creative प्रोजेक्ट्स झालेत, strange..”

“Strange काय त्यात, बाकीचे डिझाइनर पण आहेत कंपनीत, त्यांच्याकडेही स्किल आहे” राजेश मध्ये पडला..

यांच्याशी डोकं लावण्यात अर्थ नाही असा विचार करत आदेश त्याच्या टेबलवर जाऊन बसला आणि त्याचं काम सुरू केलं. राजेश हळूच सईजवळ जाऊन म्हणाला..

“काही दिवस हा नव्हता कंपनीत नव्हता तेच बरं होतं, एक याचा भाऊ..देवांग, दुनियादारी माहीतच नाही त्याला..आणि एक हा, तोंडावरून मनात काय चाललंय ते ओळखतो. लांबच राहावं लागेल याच्यापासून जरा”

“नाहीतर काय, देवांगचा भाऊ आहे म्हणून, नाहीतर कधीच याला याची जागा दाखवली असती”

देवांगच्या स्वभावामुळे कुणीही त्याला सहज वेड्यात काढू शकत होतं, पण आदेशचं सतत लक्ष असल्याने देवांगचा वापर करून घेण्याचे मनसुबे बऱ्याचदा मातीत गेलेले.

****
“अगं मी काय म्हणते, आत्या सांगतेय तो मुलगा एकदा बघून तरी घे”

“पाहिलाय मी..छान आहे”

“कुठे पाहिला?”

“आजकाल बायोडाटा फेसबुकवर बघितला जातो. छान आहे तो मुलगा.. बोलूया आपण मी आल्यावर”

असं म्हणत वैदेही ऑफिससाठी निघून गेली. इकडे आईच्या डोळ्यात पाणी आलं..पोरीने कशाला कधी नकार दिला नाही, ना कसले आढेवेढे घेतले..वडील असते तर हट्ट करू शकली असती..पण परिस्थितीने इतकं समजूतदार बनवलं की…खूप लहानपणीच तिला प्रौढ वागावं लागलं. आईने डोळे पुसले, आत्याला फोन करून पुढचा कार्यक्रम कधी करायचा याबद्दल विचारलं.

” वाहिनी मी मूलकडच्यांना नंबर दिलाय तुझा..येईल तुला फोन..मी आता यात्रेला जातेय चार दिवस, माझा फोन कदाचित बंद येऊ शकतो, पण तुम्ही उशीर करू नका, कार्यक्रम आटोपून घ्या”

“ताई पण तुम्ही मध्यस्थी, तुम्ही हव्या होतात”

“मी नंतर असेनच की..तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल”

******
देवांगचे आई बाबा वैदेहीच्या घरचा नंबर सकाळपासून शोधण्यात व्यस्त होते. वैदेही आणि तिच्या आईने काही वर्षांनी चाळ सोडली होती, नंतर चाळीत बरीच नवीन लोकं आलेले..त्यामुळे कॉमन असं दोन्ही कुटुंबात कुणीही नव्हतं.

“मी काय म्हणते, एकदा चाळीत जाऊन येऊया का?”

“अगं आपल्यानंतर कितीतरी लोकं येऊन गेले तिथे, त्यांना कसं माहीत असणार?”

“एकदा जाऊन पाहायला काय हरकत आहे?”

“देवांगलाही घेऊन जाऊया..”

“विचार त्याला तूच..”

देवांगला त्याची आई त्याच्या खोलीत जाऊन विचारून येते.

“आई माझं डोकं फिरवू नकोस आता, आजीने सईला नाकारलं म्हणून लगेच वैदेहीला आणून तिच्याशी लग्न करू?”

“अरे तुला लगेच लग्न करायला कोण सांगतंय? आजीची इच्छा आहे वैदेहीला भेटायची..ती एकदा भेटून गेली की पुढचं पुढे पाहू..अरे चल की, तुझं बालपण गेलंय त्या चाळीत..जुन्या आठवणी आहेत तिथे..छान वाटेल तुला तिथे”

देवांग असंही घरी कंटाळलेला असतो, तो जायला तयार होतो.

आई, बाबा आणि देवांग.. तिघेही चाळीत पोचतात. चाळीचं स्वरूप बरंच बदललं होतं. पण काही गोष्टी अजूनही जशाच्या तश्या होत्या. गेट समोर असलेलं निंबाचं मोठं झाड, चाळिमागे असलेली झाडं, भिंतीवर रंगवलेल्या जुन्या जाहिराती. देवांगला बऱ्याच जुन्या गोष्टी आठवू लागल्या. समोरच्या घरातून त्याला अचानक एक हाक आली..

“देवा…!!”

देवांगने चमकून पाहिलं..त्याला पुसटसं काहितरी आठवलं. राजू दादा, अजूनही तिथेच रहात होता. लहान असताना राजू दादाच्या अंगा खांद्यावर खेळलेला देवांग, त्याला पाहून हृदयात वेगळीच स्पंदनं उमटू लागली. जुनी माणसं भेटली की काहितरी उलटून येतं, काहीतरी गवसल्यासारखं वाटतं, असं वाटतं की काळाच्या ओघात आपण किती पुढे निघून आलोय, पण काही माणसं अगदी तिथेच आहेत..तशीच्या तशी…

दोघांनी गळाभेट घेतली.

“देवा अरे तुला बघून किती छान वाटतंय काय सांगू.. इकडे कसा? आणि मला ओळखलं ना?”

“दादा तुला कसा विसरेन रे !”

राजू ने पुन्हा त्याला छातीशी धरलं.

क्रमशः

 

4 thoughts on “दैवलेख (भाग 6)”

Leave a Comment