तिच्यातली कला जपायला हवी…

respect your wife, marathi story, must read marathi story,
Respect your wife

“अगं ते चित्र काय काढत बसलीये? आज आई येणारे गावाहून…ती तयारी सोडून हे काय धरून बसलीस..”

“अहो चिडू नका, झालीये सर्व तयारी… पण माझं चित्र तर बघा एकदा…”

“नंतर…मला आईसाठी मिठाई आणायला जायचं आहे…”

“बरं या जाऊन..”

नेहमीप्रमाणे सपना च्या कलेला डावलून मंगेश निघून गेला…सपना म्हणजे गुणांचं भांडार, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, भरतकाम, नृत्य, अभिनय…काय काय येत नसे तिला…आणि म्हणूनच आपला जास्तीत जास्त वेळ ती या कलांना जोपासायला वापरत असे..घर तर इतकं छान सजवलं होतं की एखाद्या इंटेरियर वाल्याने सुद्धा हिच्याकडून धडे घ्यावे…

इतके सारे गुण अंगी असल्याने सपना खूप active असायची…कॉलनीत गणपती च्या दिवसात सपना शिवाय कुणाचं पान हलत नसे…कॉलनीतील लहान मुलं कसलीही स्पर्धा असली की सपना ला येऊन विचारत…सपना त्यांना अगदी फॅन्सी ड्रेस पासून ते भाषण लिहून देण्याचं काम करे…

या सगळ्यात व्यस्त असलेल्या सपना ला मात्र मंगेशची हवी तशी साथ नव्हती… त्याला आपल्या बायकोने इतकी कामं अंगावर घेतलेली आवडत नसे…तिच्या कलागुणांना त्याच्या मते फारसं महत्व नव्हतं… ती असं काही करताना दिसली की त्याची हमखास चिडचिड व्हायची…

इतक्यात दारावरची बेल वाजली, सपना च्या सासूबाईं दारात उभ्या…

“या या आई..” असं म्हणत सपना ने त्यांच्या हातातली बॅग घेतली….

मागून मंगेश आला,

“आई केव्हा आलीस?”

“आत्ताच….”

“बस मी आलोच..” मंगेश मिठाई आत ठेवायला निघून गेला…

सपना ने सासूबाईंसोबत गप्पा मारल्या, त्याना चहा नाष्टा दिला…सासूबाई आराम करायला खोलीत गेल्या…. त्या गेल्या तसं सपना ने परत ब्रश हातात घेतला आणि चित्रात रंगून गेली..

मंगेश बाहेर आला, सपना च्या हातात ब्रश पाहून तो चिडला..

“झालं का तुझं परत सुरू, आई आली आहे…आता उठली की लगेच जेवायला वाढावं लागेल…ती तयारी सोडून तू हा टाईमपास करत बसलीये..”

“टाईमपास नाहीये हा…कला आहे ही एक…तुम्हाला यातलं माहीत नाही मग बोलू नका..”

“कसली कला? हे नसते उद्योग करायला काय मजा येते तुला कुणास ठाऊक…”

त्यांचं भांडण ऐकून सासूबाईं बाहेर येतात…

“काय रे? का भांडताय?”

“काही नाही.”

“तुम्हा नवरा बायकोत मी पडत नाही, पण गरज वाटली तर मला सांगा..”

“आई…ही सपना घरातलं काम सोडून इतके उद्योग करत बसते ना…मला अजिबात नाही आवडत…ते बघ, कसलं चित्र काढत बसलीये…त्या कोपऱ्यात बघ, सगळा पसारा… कधी फुलं काय आणते, कधी भिंतीच काय रंगवते…मला वीट आलाय याचा…”

“मंगेश….सुनबाईला तू नको ते बोललास…आधी माफी माग तिची…”

“माफी? आई काय झालं तुला?”

“अरे ज्या मुलीने तुझं घर, तुझी माणसं, तुझा वंश आणि तुझं सगळंच जपलं….जिने स्वतःचं सर्वस्व सोडून तुझ्यासाठी स्वतःला झोकून दिलं… मग तुझं काम नाही तिच्यातली कलाकार जपण्याचं? अरे बाकीच्या बायका बघ,…ना कसलं नावीन्य ना कसला उत्साह…अन मग नको ते आजार डोकं वर काढून बसतात..पण सपना कडे नीट बघितलस? एकतर्फी तिच्या कला जोपासतेय…तुझ्याकडून साथ मिळत नसली तरी एकट्या वाटेने तिचं आयुष्य रंगवतेय…कायम उत्साही असते ती…कॉलनीतली लोकं आणि आपले नातेवाईक यांच्यात सपना चा खूप आदराने उल्लेख केला जातो..तिची कला हीच तिची ओळख आहे…पुन्हा एकदा सांगते….तिने तुला जपलंय…तू तिला जप…तिच्या कलेला जप…तेवढं केलंस की तुझ्या आयुष्यात इंद्रधनू चितारेल ती…आणि मी येण्या आधीच तिने स्वयंपाक बनवून ठेवलाय…बायकांना संसार शिकवायचा नसतो…”

मंगेश खजील होतो, सपना ला खूप बरं वाटतं… तिचं चित्र पूर्ण होतं आणि ती सासूबाईंना ते देते..

“आई हे घ्या, मी हे खास आपल्या गावच्या घरी लावण्यासाठी काढलंय…”

ते चित्र बघून सासूबाईंच्या डोळ्यात अश्रू येतात…मंगेश आईजवळ येऊन ते चित्र पाहतो.. अन नकळत त्याचेही डोळे पाणावतात….

त्या चित्रात मंगेश, सपना, लहान दिर, सासूबाईं आणि सासरे यांचा फॅमिली फोटो चितारलेला असतो….अगदी हुबेहूब व्यक्तिरेखा सपना ने साकारल्या होत्या….क्षणभर असं वाटलेलं की हा एखादा कॅमेऱ्यातील फोटोच आहे की काय…

सासूबाई मंगेश कडे बघून म्हणतात…

“बघितलं? तिच्या कलेलाही सांसारिक किनार आहे….”

समाप्त

(आवडल्यास लाईक कमेन्ट जरूर करा)

2 thoughts on “तिच्यातली कला जपायला हवी…”

Leave a Comment