चॅट जीपीटी काय आहे? (Chat gpt)

 चॅट जीपीटी काय आहे? What is chat gpt?

शाळेमध्ये आम्हाला निबंध लिहायला सांगायचे. त्यावेळी इंटरनेट वैगरे भारतात फारसं वापरात नव्हतं. त्यामुळे डोक्याचा भुगा करून तोडक्या मोडक्या शब्दात काहीतरी खरडायचो. वर्तमानपत्र चाळायचो आणि मोठ्यांनाही छळायचो. तेव्हा कुठे एखादा निबंध तयार व्हायचा, त्यातही असंख्य चुका निघायच्या. 

(Chat gpt)

ही जुनी आठवण अचानक कशी डोक्यात आली बरं? तर त्याला कारण म्हणजे chat gpt. नाव ऐकलेच असेल. नसेल ऐकलं तर आता ऐका. 

आर्टिफिशल इंटेलिजन्स , AI हे शब्द तुम्ही ऐकले असणारच. थोडक्यात मानवी बुद्धी जशी चालते तसं एखादं सॉफ्टवेअर चालवायचं ही साधी व्याख्या. 

#chat gpt

अजून सोपं करून सांगते, मला सांगा माणूस जन्माला येतो तेव्हा तो परिपूर्ण असतो का? नाही, त्याच्या बुद्धीचा विकास झालेला नसतो, त्याला गोष्टी कळत नाही. मग तो कसं शिकतो? तर जसजसा मोठा होतो तसं घरातील वातावरण बघतो, आई वडिलांचं वागणं बोलणं बघतो आणि त्याचं अनुकरण करू पाहतो. शब्द कानावर पडतात, तो भाषा शिकतो. आगीजवळ जाऊ नये चटका बसतो, काचेच्या वस्तू आपटू नये, त्या फुटतात या गोष्टी अनुभवाने शिकतो. आणि बऱ्यापैकी वय झालं की अनुभवाने, ज्ञानाने समृद्ध होतो. 

अगदी सेम टू सेम आर्टिफिशल इंटेलिजन्स बद्दल लागू होतं. त्या सॉफ्टवेअर मध्ये खूप पॅटर्न टाकले जातात, मोठी माहिती- डेटाबेस टाकला जातो. त्यात असं कोडिंग केलं जातं की ज्याने सॉफ्टवेअर “काय झालं की काय होतं”, “असं केलं तर तसं होतं” हे स्वतः शिकतो आणि नंतर अमलात आणतो. “अच्छा असं होतं तर..” याप्रमाणे सॉफ्टवेअर शिकत जातं.  उदाहरणार्थ, तुम्ही सॉफ्टवेअर ला सांगा, की 1 नंतर 2 येतो, 3 नंतर 4 येतो, 4 नंतर 5 येतो. सॉफ्टवेअर पॅटर्न बघतो, “अरेच्या, म्हणजे पुढचा नंबर दाखवायचा आहे तर..” मग तुम्ही त्याला विचारा, “पाच नंतर काय येतो सांग बघू?” मग तो सहा हे बरोबर उत्तर देईल.

तर हे आहे आर्टिफिशल इंटेलिजन्स, AI टेक्नॉलॉजी. परत वळू chat gpt कडे. तर वरीलप्रमाणे AI तंत्रज्ञानाचा वापर करून OpenAI कंपनीने हे फिचर लाँच केले आणि अवघ्या पाच दिवसात मिलियन मध्ये ग्राहक खेचले गेले. हे सॉफ्टवेअर इतके प्रभावी आहे की तुम्ही त्याला काहीही विचारा, अगदी सुयोग्य उत्तर देतो. 

म्हटलं चला, chat gpt ला एखादा अवघड प्रश्न विचारू. मी त्याला म्हटलं, 

“Write a story of mother in law and daughter in law’s fighting” (सासू सुनेच्या भांडणावर एखादी कथा लिही).

म्हटलं याला काय माहीत असणार घरच्या भानगडी, असा प्रश्न विचारून मी माझी पाठ थोपटून घेतली. म्हटलं कितीही झालं तरी माझ्या बुद्धिशी याची तुलना होऊ शकते का..chat gpt हाय हाय. 

आणि अवघ्या सेकंदात त्याने कथा लिहून दाखवली..

चमत्कार..!!!

अन मी हरले. 

आपल्यासाठी चमत्कारच. शाळा, कॉलेजमधली मुलं तर निबंधासाठी गुगल कडेही आता जाणार नाहीत. कारण गुगलकडे एखादी माहिती विचारली ते तो भरमसाठ लिंक आपल्याला देतो, त्यात शोधून शोधून वैताग येऊ लागतो.  जेव्हापासून हे chat gpt आलंय ना, गुगल फिके वाटायला लागले. अगदी गुगलने सुद्धा याचा धसका घेतलाय म्हणे, त्यांच्या AI टीम सोबत मिटिंग वर मिटिंग सुरू आहेत. #chatgpt

पण एलोन मस्क सारख्या मोठ्या माणसाने यावर एक वक्तव्य केलं आहे, की AI जितका सोयीस्कर आहे तितकाच भविष्यात घातक ठरेल. मोठ्या माणसांचे विचार खरे असतात म्हणा !

आज हे आपल्याला निबंध लिहून देतंय, उद्या ऑफिसातली कामं करून देईल, माणसांची गरज काय मग? कंपन्या कशाला माणसांना कामावर ठेऊन पगार देईल? मुलं निबंध वगैरे साठी स्वतःच्या डोक्याचा कशाला वापर करतील? #चॅटजीपीटी 

आज आयटी मध्ये गर्दीच गर्दी आहे, या लोकांकडून AI बनवून घेतलं जाणार आणि उद्या त्याच AI चा वापर करून त्यांच्याच नोकरीवर गदा येणार ही शक्यता नाकारता येणार नाही. 

आपल्यासाठी हे भन्नाटच आहे बुवा, गमतीशीर म्हणायला हरकत नाही. एकदा अनुभव घ्या तुम्हीही, link खाली देतेय. Chat gpt – चॅट जीपीटी

https://openai.com/blog/chatgpt/

Leave a Comment