खंबीर

बाळाला बघायला सुलोचनाच्या सासरची मंडळी आली होती. सुलोचनाला बाळंतीण होऊन दोन महिने झाले होते, ती माहेरीच होती. या काळात नातेवाईकांची भेटण्यासाठी रीघ लागलेली. लेकीचं बाळंतपण म्हणजे आईची खरी कसरत. एकीकडे मुलगी आणि बाळ सांभाळायचं, दुसरीकडे येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं बघायचं, घराकडे बघायचं. त्यात बाळ रात्रभर जागरण करणार, मग मुलीला झोप मिळावी म्हणून आई रात्रभर जगणार आणि सकाळी सगळं बळ एकटवून पुन्हा कामाला लागणार. या काळात आईकडे इतकं बळ कुठून येतं कोण जाणे !

आज सुलोचनाच्या सासरच्या काही बायका बाळाला पाहायला आल्या होत्या. बाळाचं कोडकौतुक झालं, गप्पा झाल्या, जेवणं उरकली. त्यांनी बाळाच्या हातात सोन्याची अंगठी चढवली. बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे, बाळाला सोनं चढवलं की लगेच त्या बाईला साडी नेसवायची. हातात 100-200 रुपये दिले तर त्याच रेंज मधली साडी, अंगठी केली तर जरा महागातली.. पद्धतच तशी घालून दिली असल्याने सुलोचनाच्या आईनेही साड्या आणून ठेवलेल्या. पण एकही साडी हलकी आणली नव्हती, कुणी अगदी 50 रुपये जरी हातात दिले तरी तिच्या आईने चांगल्यातली साडी तिला नेसवली. नातवाच्या येण्याच्या आनंदापुढे आईला हा खर्च काहीच वाटत नव्हता.

“चला साड्या नेसून घ्या..या आत”

अंगठी चा कार्यक्रम झाल्यावर सुलोचनाच्या आईने बायकांना आत बोलावलं.

“अहो कशाला, राहुद्या की”

बायकांनी बळेच औपचारिकता म्हणून नको म्हटलं, पण आतून खूप उकळ्या फुटत होत्या.

हो नको हो नको करत बायका आत गेल्या. साड्या खूप छान होत्या, पण त्या बायकांचं काही समाधान झालेलं दिसलं नाही. त्यांनी निमूटपणे साड्या नेसल्या आणि निरोप घेतला.

सुलोचनाची आई खूप दमली होती. बायका गेल्यावर तिने जरा निःश्वास टाकला आणि जरावेळ पडून घेतलं. सुलोचनाने विचारलं,

“आई सर्वांना कशाला साड्या नेसवल्या? अंगठी तर दोनच बायकांनी दिलेली”

“असुदेत गं… माझ्या नातवाच्या कौतुकापुढे सगळं मातीमोल आहे”

सुलोचनाच्या हातातल्या त्या गोंडस बाळाकडे बघत सुलोचनाची आई त्याची दृष्ट काढू लागली.

“आणि हो, सासरच्या मंडळींचा मान ठेवावाच लागतो, तुला उद्या आमच्यामुळे काही बोल लागायला नको, कुणी टोमणे मारायला नको..म्हणून ही धडपड”

दोघीजणी काहीवेळ पडल्या, डोळा लागत नाही तोच सुलोचनाला फोन..नुकत्याच निरोप घेतलेल्या त्या बायकांचा फोन होता..

“हॅलो..सुलोचना साड्या नेसल्या खरं आम्ही, पण आम्हाला काही आवडल्या नाहीत हो साड्या..जरा चांगल्या साड्या नेसवायला हव्या होत्या तुझ्या आईने”
सुलोचनाच्या पोटात खड्डाच पडला..आई जवळच होती, मोबाईल चा आवाज मोठा असल्याने आईला सगळं ऐकू गेलं. या बायकांनी गाडीतून परतत असतांना काय चुगल्या केल्या कोण जाणे, पण उलट फोन करून हे सांगण्याचं मूर्खासारखं धाडसही केलं..

सुलोचनाला कळेना काय बोलावं, आईला सांगितलं तर आई पुन्हा त्यांची टोलतोल करणार, पुन्हा नव्या साड्या आणायला पायपीट करत जाणार..खर्च होईल तो आणखी वेगळाच. किती करावं आईने तरी? सुलोचनाला सासरच्या मंडळींचा राग आला पण आई समोर होती, काही बोलू शकली नाही.

पण आईने तिच्या जवळचा फोन घेतला..

“हॅलो, नमस्कार ताई..पोचलात का?”

“नाही अजून..”

“बरं तुम्हाला साड्या आवडल्या नाहीत तर सांगायचं की लगेच, तुम्ही एक काम करा.. परत या, लगेच”

त्या बायकांची कळी खुलली, नव्या साड्या मिळणार म्हणून अर्ध्या रस्त्यात गाडी मागे फिरवायला लावली.

“आई? अगं काय प्रकार आहे हा? इतकी तोलतोल चांगली नाही…”

आई काहीही बोलली नाही. काही वेळाने त्या बायका मोठ्या मिजाशीत परत आल्या. इकडेतिकडे पाहू लागल्या, नवीन साड्यांचे बॉक्स दिसताय का ते पाहायला.

“या या..तुमचीच वाट बघत होतो”

बायका आतुर झाल्या..

आईने हळूच बाळाच्या हातातील अंगठी काढून त्यांच्या हातात ठेवली आणि म्हणाली..

“तुम्ही बाळाला आशीर्वाद दिलात हेच खूप..सोनं वगैरे काही नको बाळाला. आणि हो, घरी गेलात की अंगावरच्या साड्या जशाच्या तश्या परत करा…जरा सुसंस्कृत लोकांना देता येतील”

सुलोचना आईचं हे रूप बघतच राहिली.. त्या बायका अपमानित होऊन तावातावाने निघून गेल्या.

“आई?”

“हो बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जोपर्यंत समोरचा नम्र असेल तोवर त्याला मानपान द्यायचा..ज्यादिवशी तो स्वतःची पायरी सोडून वागेल त्यादिवशी मात्र त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा. याबद्दल तुला सासरी कुणी बोललं तर त्याची माझ्याशी गाठ असेल”

आईपण आणि त्यातही बाळंतीण लेकीचं मातृत्व..बाईला प्रचंड खंबीर बनवतं हेच खरं!

(सत्य घटनेवर आधारित)

©संजना सरोजकुमार इंगळे

1 thought on “खंबीर”

  1. Ek number ase anubhav aplyala khup yetat, thank you ya lekha madhun chhan shikvan dili tumhi. Karan aaj hi aplye aai baba aplya sasar cha manpan rakhnya sathi khup kahi kartat pan tyachi samor chya mansala kimmat nasate.

    Reply

Leave a Comment