हो…आहे मी Queen

Lockdown मुळे पार्लर बंद असल्याने आयेशाची चांगलीच धांदल उडाली होती, मग तिला असं समजलं की एक महिला सर्व काळजी घेऊन अन घरी येऊन थ्रेडिंग, वॅक्स करून देते..आयेशा ने लगेच तिला सम्पर्क केला अन तिला बोलावून घेतलं…

आयेशा…चांदीच्या चमचा तोंडात घेऊनच जन्मलेली सुंदर मुलगी, अभ्यासात रस नव्हता पण लग्न मात्र एका गडगंज घराण्यात झालं…कशाचीही कमतरता नाही…सुंदर असल्याने स्थळही लगेच मिळालं होतं…पण सुखाची इतकी सवय झालेली की त्याची किंमत काय असते याची तिला जाणीवच नव्हती.

दाराची बेल वाजली,

“ब्युटीशीयन आली वाटतं..”

आयेशा ने पटकन दार उघडलं, मास्क लावून आणि handglows घालून एक मोठी बॅग घेऊन एक महिला आलेली…ती आयेशा कडे बघतच राहिली…

“या ना, आत या…आपण माझ्या बेड मध्ये थ्रेडिंग waxing करूया..”

ती महिला आयेशा च्या मागोमाग गेली..आयेशा ने सॅनिटायझर स्प्रे दोघींवर मारला आणि ती खुर्चीत बसली…ती महिला समोर आली आणि म्हणाली, “आयेशा..मला ओळखलं नाही??” मास्क काढून ती म्हणाली..

“if I am not wrong….समीक्षा???”

“हो…हो…तुझी शाळेतली मैत्रीण..”

“What a pleasant surprise..”

“बरं आपण तुझं काम करू, करता करता गप्पा मारू..”

समीक्षा ने आयेशा चं थ्रेडिंग केलं…मग वॅक्स ला सुरवात केली…ती बोलू लागली..

“शाळे नंतर काय केलंस गं??”

“रडत खडत बारावी केली, मग एफ वाय…लास्ट इयर ला लग्न झालं..”

“सासर छान आहे गं पण तुझं…चांगलच श्रीमंत आहे…घर किती सुंदर आहे आणि सगळ्या कामाला माणसंही आहेत..राणी बनून आहेस या घराची..”

“You mean queen?? हा हा…काहीही..”

“खरंच की…दिसतंय ना…नशीबवान आहेस..”

“कसलं गं.. इतकं बोर होतं तुला सांगू…tv पाहून पाहून कंटाळा आला..वेळ कसा घालवू हाच प्रश्न पडतो बघ मला..”

“अगं मग काहीतरी करायचं की…एखादा जॉब वगैरे..”

“जॉब?? 8 तास दुसऱ्याच्या हाताखाली? No way..”

“मग एखादा व्यवसाय..”

“व्यवसाय म्हटलं की खूप बिझी होतो माणूस…आणि पैसे कमवायची गरजच नाहीये मला..”

समीक्षा ला हसू आलं…हिला हे पण नकोय अन तेपण नकोय…नक्की काय हवंय हिला??

“अगं आयेशा…तुला नक्की काय हवंय म्हणजे तू स्वतःला queen समजशील??”

“मला ना…सगळे डिसीजन स्वतः घ्यायचे आहेत…म्हणजे राजेश ने कोणत्या कार मधून ऑफिस ला जावं…कोणता सूट घालावा…घरात पार्टी असेल तर त्याची थीम काय असावी…हे सगळे डिसीजन मला नाही घेऊ देत गं कुणी..फार असह्य होतं हे..”

समीक्षा हसायला लागली…

“अगं यात असह्य होण्यासारखं काय आहे? आणि हे क्षुल्लक डिसीजन घेता येत नाही म्हणून तू दुःखी आहेस??”

“जाऊदे तुला नाही कळणार, बाकी तुझं कसं चाललंय??”

“मी तर बुवा राणी आहे माझ्या घरची..”

“खरंच?? किती पॅकेज आहे तुझ्या मिस्टरांना??”

“पॅकेज कमीच आहे गं.. दोन खोल्यांच्या घरात राहतो…सासू सासरेही येतात अधून मधून राहायला…पण त्यांची सेवा कशी करायची हा डिसीजन मीच घेते…भाजीला गेल्यावर काय काय भाज्या आणायच्या हा डिसीजन माझाच असतो…रात्री tv किती वेळ पाहायचा हे मीच ठरवते.. बटाट्याची रस्सा भाजी करायची की कोरडी भाजी, हे मीच ठरवते….फारशी पुसताना त्यात डेटॉल टाकायचं की आरोमॅटिक लिक्विड, हे मीच ठरवते….दारात आलेल्या भिक्षेकरूला किती दान द्यायचं याचा डिसीजन मीच घेते…बेडवरचं बेडशीट कधी बदलायचं, मांडणी वरचे डबे कधी घासायला काढायचे, पार्लर साठी किती वेळ द्यायचा, नणंद साठी कोणती साडी घ्यायची, माहेरी कधी जायचं इतकंच नाही तर सणावाराला माझ्या देव्हाऱ्यातल्या देवाला कुठलं फूल ठेवायचं हा डिसीजन सुद्धा मीच घेते…कारण मी राणी आहे माझ्या घरची..”

आयेशाला स्वतःची लाज वाटू लागते…समीक्षा हसत तिला निरोप देते..समीक्षा ची एखाद्या queen सारखी चाल ती पाठमोऱ्या आकृतीत बघतच राहते…

एकीकडे सर्व सुखं असताना तहानलेल्या स्त्रीची व्यथा होती आणि दुसरीकडे डझनभर दुःखं ओंजळीत घेऊन सुखाची ढेकर देणाऱ्या महिलेची कथा होती…

आता आपणच ठरवायचं…आपल्याला तहानलेलं राहायचं आहे की तृप्तीची ढेकर द्यायची आहे…

Leave a Comment