“आत्ताच्या आत्ता माझ्या आईची माफी माग…”
सुयश आपल्या बायकोवर, राधिकावर चिडला होता…
“माफी कसली? काय चूक आहे माझी? आईंनी त्यांची जपमाळ स्वतःच हरवली आणि मला बोलताय की मी कुठेतरी ठेऊन दिली…मी तर पाहिलंही नाही ते…”
“तरीही माफी माग… रोहन ला शाळेत टाकायला सांगतेय आई….तेही का ऐकत नाही?”
“वय आहे का त्याचं शाळेत जायचं? अजून 2 वर्षाचाही झालेला नाही तो…आणि काय रे…सतत येता जाता अपमान…मला काही respect आहे की नाही घरात?”
आज सुयश आणि राधिका मध्ये चांगलीच जुंपली होती..
त्यात सासूबाई मध्ये पडल्या आणि आगीत तेल ओतायला कारणच झालं…
“तुझ्या वडिलांना आत्ताच्या आत्ता कॉल कर…त्यांना विचारते ना…हे संस्कार केलेत का तुम्ही?”
“ठीक आहे…मीच बोलावते…”
तिचा पवित्रा पाहून हे दोघे घाबरले…
थोड्याच वेळात राधिका चे वडील हजर…
“तुमच्या मुलीला काही संस्कार दिलेत की नाही तुम्ही? उलट उत्तर देते…आमच्याशी वाद घालते…”
“नक्की काय झालं?”
वडिलांना सर्व हकीकत समजते…
“हे संस्कार तर आम्हीच केलेत तिच्यावर…”
“कुठले? उलट उत्तर द्यायचे??”
“नाही…शाळेत असताना तिच्याकडून लोकमान्य टिळकांचं भाषण पाठ करून घेतलं होतं…मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलनार नाही..नंतर तिला फॅन्सी ड्रेस मध्ये झाशीची राणी बनवलेलं.. मुलाला पाठीवर घेऊन तिने युद्ध लढलं… स्वातंत्र्यसाठी… अन्यायाचा प्रतिकार करणं, सत्यासाठी लढा देणं आणि खऱ्याला खरं व खोट्याला खोटं म्हणण्याचे संस्कार आम्हीच तिला दिलेत…आता हे संस्कार चुकीचे असतील तर मी माझ्या मुलीला घेऊन जातो…”
राधिका वडिलांचा हात धरत जायला निघते…
आईला आपण हेच संस्कार आपल्या मुलावर केलेले आठवतात…पण संस्कार उचलले कोणी? मुलीने…मुलाने फक्त घोकंपट्टी केलेली, स्त्री बद्दल आदर आपण शिकवला का? आपण स्वतः दुसऱ्या स्त्री बद्दल आदर करायला चुकलो, मग मुलगा कुठून करणार? संस्कार हा शब्द वारंवार निघत होता, तेव्हा त्यांचा डोळ्यासमोरून राधिका ने जपलेला कुळाचार, मोठ्यांचा ठेवलेला आदर डोळ्यासमोरून गेला…मुलीच्या वडिलांना आपण केलेल्या संस्कारांवर गर्व आहे…पण मी केलेल्या संस्कारांचा गर्व वाटावा असं मुलाने काय केलं होतं? त्यावेळी सासू सून नव्हे, तर दोन पालकांचं द्वंद्व सुरू होतं…
सुयश आणि त्याच्या आईला राधिका दूर जाताना पाहवत नाही, त्यांना चूक समजली… त्यांनी तिला मागे ओढलं…
आणि हात जोडून मूकपणे वडिलांनी निरोप घेतला…