ही वाट वेगळी (एक भावस्पर्शी कथा)

वसुधा ट्रेन मध्ये घाईघाईत चढली…आजूबाजूला कुणी पाहत तर नाहीये ना हे तपासलं.. कपाळावरचा घाम पुसला..शेजारी साधारण 50 एक वयाची स्त्री बसली होती…फिक्कट रंगाची साडी, चेहऱ्यावर एक हास्य, अत्यंत शांत भाव..डोळ्यावरून अर्धवट खाली आलेल्या चष्म्यातून ती स्त्री वर्तमानपत्र वाचत होती…
त्यांनी वर्तमानपत्र घडी करून बाजूला ठेवलं..वसुधा कडे बघितलं आणि एक स्मितहास्य केलं…
त्यांचा चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव पाहून वसुधा जरा शांत झाली…त्या स्त्री ला तिच्या डोळ्यात लपलेलं पाणी दिसलं…वसुधा कडे त्यांनी निरखून पाहिलं…आणि त्यांचे हावभाव बदलले…
साधारण 20 वर्षांपूर्वी ती स्त्री सुद्धा अशीच आलेली…घर सोडून..सासरच्यांनी मारहाण केली….माहेरी स्थान राहिलं नव्हतं… मग ती स्त्री रिकाम्या हाताने जी ट्रेन मिळेल त्यात बसून पुढच्या प्रवासाला निघालेली…त्यांचं मन भूतकाळात गेलं…आणि तेच भाव त्यांना वसुधा च्या चेहऱ्यावर दिसले..

“पोरी…अडचणीत दिसतेय..”
“अं?? नाही…काही नाही..”
त्यांनी वसुधा च्या डोक्यावरून हात फिरवला तसा तिला बांध फुटला…
“मी नाही जाणार परत… सासरची लोकं माहेराहून पैसे आणायला लावताय….माझ्या माहेरी आधीच आई बाप कर्जबाजारी झालेत…मी गेले तर त्यांच्याकडे द्यायला पैसेही नाहीत…आणि मला पोसायला ते समर्थही नाही… सोडून आले सगळं….कुणीच नको आता…”
“बाळ शांत हो…कुठे जाणारेस आता?”
“माहीत नाही….फक्त त्या लोकांपासून दूर जायचंय…”
त्या स्त्री ने तिला शांत केलं..आणि सांगितलं…
“बाळ…20 वर्षांपूर्वी मीही अशीच घर सोडून आलेली..ट्रेन खाली जीव द्यायला म्हणून ट्रेन जवळ आली…पण हिम्मत काही होईना.. अखेर ट्रेन थांबली आणि मी त्यात बसून घेतलं….”
वसुधा ने डोळे पुसले..आणि आश्चर्याने ती पाहू लागली..
“काय??? मग कुठे गेला तुम्ही? काय केलं??”

“मी ट्रेन मध्ये बसले…पुढे काय करायचं काहीच माहीत नव्हतं…पण एक विचार आला मनात…आज आपल्यावर जी वेळ आली तीच अनेक महिलांवर येऊ शकते….मग त्यांनी जायचं कुठे? मग मी एका गावी उतरले…तिथे एका एकट्या राहणाऱ्या वृद्ध स्त्री ने आधार दिला…येईल ते काम करत गेले…हळूहळू काही कोर्स केले…चांगली नोकरी केली…मग पैसे जमवून एक संस्था सुरू केली…ज्यांना माहेर नाही…ज्यांनी सासर सोडलं आहे त्यांना आसरा देण्यासाठी…आपल्या माणसांनी जरी पाठ फिरवली तरी या जगात आपलं कुणीतरी वाट बघणारं आहे या जाणिवेने स्त्रिया तिथे येतात…त्यांच्यासाठी आम्ही खूप काही करतो, त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवतो…त्यांची काळजी घेतो….त्यांना माहेराचं सुख अनुभवायला मिळतं…”
“खूप कौतुकास्पद आहे हे…”
“आता तू कुठेही जायचं नाहीस…तुझं माहेर तुझी वाट पाहतंय…”
वसुधा ला भरून आलं…त्या स्त्री बद्दल अपार आदर वाटू लागला…

आपल्या वाट्याला जे आलं ते इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून त्याच वाटेवर एक त्या स्त्री ने आश्रय उभारला होता… जिथे आज कित्येक स्त्रिया सन्मानाने जगताय..

2 thoughts on “ही वाट वेगळी (एक भावस्पर्शी कथा)”

  1. खरच आहे काही स्त्रियांना कुठलाच आधार नसतो. तयाचयसाठि अशा संस्था खूप काही आधार देऊन जातात

    Reply

Leave a Comment