हिरवा संघर्ष (भाग 9)

 

दिशा ने जवळच्याच एका शेतकी महाविद्यालयात जाऊन तिथल्या शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी मैत्री केली होती…

शिक्षकांना तिने सांगितले की..

“सर…आपल्या देशात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक शिकवणं जास्त महत्वाचं आहे…तुमच्या मुलांना माझ्या प्रयोगात सामील करता आलं तर मुलांना खूप गोष्टी शिकायला मिळतील…”

शिक्षकांना शंका होती की विद्यार्थी ऐकतात की नाही…पण दिशा च्या अभिनव प्रयोगात सामील होण्यासाठी खूप विद्यार्थी तयार झाले..


विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक मिळालं आणि दिशा ला शेतीकामात मदत आणि लागवड सुरू झाली, मशागत होऊ लागली.

दिशा ने सेंद्रिय खतांवर भर दिला…स्वतः माहिती जमा केली आणि मुलांनाही तिने शिकवलं.

त्यातला एक विद्यार्थी जरा नाराज राहूनच काम करायचा…अथर्व नाव त्याचं. इतक्या सगळ्या मुलांमध्ये दिशा ने त्याची नाराजी हेरली होती. ती त्याचा जवळ गेली आणि विचारलं…

“काय रे? तुला कंटाळा आलाय का हे काम करून? नाराज का दिसतोय?”

“अं?? काही नाही..”

“मला तुझी मोठी बहीण समज…आणि सांग नक्की काय झालं?”

अथर्व तिला सांगू लागतो..

“मला शेतकी अभ्यासात अजिबात आवड नव्हती, पण आई वडिलांची ईच्छा म्हणून…”

“कशात आवड होती तुला?”

“इंजिनियरिंग…मला electronic इंजिनियर बनायचं होतं… मी वेगवेगळे रोबोट सुद्धा तयार केले होते..”

“खरंच?? ए मलाही सांग की…”

अथर्व मध्ये अचानक एक उत्साह येतो… तो सांगू लागतो..

“ताई तुला माहितीये? मी एक रोबोट बनवलेला…तो रिमोट नुसार ऍक्सेस व्हायचा..घरीच एक छोटंसं vaccum cleaner बनवलेलं…”


दिशा ला वाईट वाटतं… अथर्व ला electronics मध्ये आवड असून त्याला दुसऱ्या ठिकाणी गोवलं गेलं..
आपण काही करू शकतो का? याचा विचार ती करते…

दिशा चं लक्ष समोरच्या एका बुजगावण्याकडे जातं… ती अथर्व ला म्हणते…

“तुला असं बुजगावणं बनवता येईल??”

अथर्व बुजगावण्याकडे निरखून बघतो…त्याचं विचारचक्र वेगाने फिरायला लागतं… दिशा ला सांगतो..

“अगं ताई मी खूप भारी बनवू शकतो… हे बुजगावणं एका ठिकाणी स्थिर आहे…पण मी रोबोटिक्स चा वापर करून चालतं फिरतं बुजगावणं बनवू शकतो…पाखरं पिकाच्या जवळपासही फिरकणार नाही..”

“अरेवा…तुला लागेल ती मदत करेन मी…आणि हे बघ, तुझ्याजवळ इच्छाशक्ती असेल तर आहे त्या परिस्थितीत तू तुझी स्वप्न पूर्ण करू शकतोस..तू शेतकीचा अभ्यास करतोय ना? जरुरी नाही की ती फिल्ड वरच काम केलं पाहिजे…शेतीत आधुनिक तंत्रज्ञान कसं आणता येईल, शेतीसाठी रोबोटिक्स चा वापर कसा करता येईल याचा विचार कर आणि ते बनवण्यामागे लाग..म्हणजे तुझ्या मनातही काही सल राहणार नाही…”

दिशा च्या या नव्या कल्पनेमधून अथर्व खूप खुश होतो..त्याला पुन्हा एकदा रोबोटिक्स मध्ये जाता येणार होतं…तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करण्याची सुरेख संकल्पना दिशा ने अथर्व ला दिली आणि अथर्व ला एक नवीन मार्ग मिळाला. तो जोमाने तयारीला लागला.

शेतमालाचा दलाल शर्मा घरी आला, माधव ने त्याला त्याची फाईल त्याचाकडे आहे असं सांगितलं होतं…शर्मा ने माधव च्या शेतीकडे एक नजर फिरवली…त्याला दिशा च्या शेतात विद्यार्थ्यांची गर्दी दिसली…

“तिकडे काय चालू आहे??”

“माझ्या बायकोची शेती…हा हा..”

“म्हणजे?”

माधव ने त्याला सर्व हकीकत सांगितली…शर्मा ला ते ऐकताच धोक्याची घंटा ऐकू येऊ लागली…ही मुलगी आज आधुनिक शेती करतेय, हुशार आहे, शिकलेली आहे…उद्या आपल्या धंद्यावर गदा येऊ शकते…शेतमाल विकण्याचीही शक्कल हिने लढवलीच असेल..

माधव ला दिशा चं पूर्ण उत्पन्न विकत घेण्यासाठी शर्मा माधव ला विचारतो…

“शेती दिशा ची आहे, निर्णय तिच घेणार..”

शर्मा वेळ न दवडता दिशा ला भेटून येतो असं माधव ला सांगून चालायला लागतो..

शर्मा दिशा च्या शेतात जातो…तिथली हिरवीगार पिकं, आधुनिक पद्धतीने केलेली शेती पाहून शर्मा च्या डोळ्यासमोर पैसा दिसू लागतो..शेतात काम करत असलेल्या मुलांना शर्मा दिशा बद्दल विचारतो…मुलं सांगतात की दिशा ताई पलीकडच्या शेतात मातीचे नमुने घ्यायला गेलीये…शर्मा त्या दिशेने जायला लागतो…अथर्व ते बघतो, त्याला शर्मा मध्ये काहीतरी गडबड वाटली…..

शर्मा मुलांनी सांगितलेल्या दिशेने वेगाने चालू लागतो..
लांबवरच्या शेतात दिशा एकटीच असते…शर्मा तिच्याजवळ जातो आणि बोलतो..

“चांगली लागवड केलेली दिसतेय..”

शर्मा ला पाहून दिशा आश्चर्यचकित होते.. आणि हेही ओळ्खते की शर्मा आपला शेतमाल घेण्यासाठी लालूच दाखवेल…

“होय…नव्या पद्धतीने शेती करतेय..”

“माल कुठे अन कसा विकणार?”


“सगळी सोय केली आहे, काळजी नको..”

“मला द्या, मी ऍडव्हान्स पैसे देतो.”

“धन्यवाद…पण ही ऑफर मी स्वीकारणार नाही..”

“का?”

“शेतमाल आम्हाला सरळसरळ ग्राहकापर्यंत पोचवायचा आहे…मध्ये कुठलाही दलाल नको…जो अर्ध्याहून जास्त पैसे काढून शेतकऱ्याला शेतमालाचा योग्य भाव देत नाही..”

“हा मी टोमणा समजायचा का?”

“तुम्हाला जे समजायचं ते समजा..माझा रस्ता सोडा..जाऊद्या मला..”

दिशा तिथून निघायला लागते…तोच शर्मा तिचा हात पकडून तिला धमकवतो…

“जास्त हुशारी दाखवायची नाही माझ्यासमोर….”

दिशा तिचा हात सोडवायचा प्रयत्न करते आणि म्हणते..

“तुझा खोटेपणा सर्वांसमोर आणते आता थांब..”

“जिवंत राहशील तर ना..”

असं म्हणत शर्मा तिचा गळा आवळतो..

दिशा कळवळू लागते..तिचा आवाज फुटेना…दोन्ही हातांनी शर्मा चा हात सोडवायचा प्रयत्न करते..

इतक्यात शर्मा च्या डोक्यात बांबूने जोरदार प्रहार होतो…

अथर्व आणि काही मुलं आधीच शर्मा च्या वाटेवर होते..हा माणूस चांगला नाही हे अथर्व ने आधीच ओळखलं होतं आणि शर्मा चा त्याने पाठलाग केला होता..

शर्मा बेशुद्ध होऊन खाली पडतो… इतक्यात माधव तिथे येतो अन त्याला सर्व हकीकत समजते…

शर्मा ला पोलिसांच्या हवाली करतो असं माधव म्हणतो…

“काही उपयोग नाही…या माणसाने पोलिसांसकट सर्वांना आपल्या खिशात ठेवलंय..”

शर्मा शुद्धीवर येतो..गावातली माणसं जमा झालेली असतात…पण शर्मा ला कोण बोलणार? त्याच्या जीवावर सर्वजण शेतमाल विकत होते…

आपला असा झालेला अपमान शर्मा ला सहन होत नाही…तो म्हणतो..


“तुमच्यापैकी कुणाकडूनही आता मी माल घेणार नाही..माझा असा अपमान आजवर कुणीही केला नव्हता… तुम्हाला माहीत नाही माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे…सोडणार नाही मी कुणालाच..कुठे विकणार आता तुम्ही तुमचा शेतमाल? मार्केट चा म तरी माहितीये का कुणाला?”

“मार्केट चा म नाही..पण अख्खी मार्केटिंग सुद्धा माहितीये शर्मा..”

मागून एका माणसाचा कणखर आवाज येतो…

सर्वजण पाहू लागतात…शर्मा साठी हा आवाज नवीन असतो…

“सागर भाऊजी? तुम्ही ??आत्ता …इथे?”

Leave a Comment