हिरवा संघर्ष (भाग 4)

  

माधव पुस्तक वाचण्यात दंग झालेला..पण दिशाचं मात्र पूर्ण लक्ष माधव कडे…त्याचे पुस्तकात भिरभिरणारे डोळे…अंगातील शुभ्र कुर्त्यात शोभणारं त्याचं रूप…त्याचे किंचितसे भुरकट दाट केस…दिशा त्याच्यात हरवून गेलेली….दिशा ची नजर त्याचकडे, पण तो मात्र पुस्तकात गुंग…जणू काही घडलंच नाही असं…लायब्ररीयन दिशा कडे पाहायचा… माधव कडे पाहायचा…काय चाललंय त्याला काही कळेना….

माधव दुसरं पुस्तक घ्यायला उठला तसं त्याचं लक्ष दिशा कडे गेलं..ती माझ्याकडेच पाहतेय हे पाहून तो भांबावला…त्याला प्रकरण लक्षात आलं…त्याने दिशा ला इशारा केला बाहेर येण्याचा…तो बाहेर निघाला आणि ती त्याच्या मागोमाग गेली…

माधव पाठमोरा उभा होता..दिशाला त्याच्याकडे पाहतच राहावंसं वाटलं..माधव वळला…त्याची वळून बघण्याची अदा तर…अहाहा…

“मॅडम…”

“दिशा…दिशा नाव आहे माझं..”

“माझ्यासाठी मॅडमच…मोठ्या शहरातून शिकून आल्या आहात… मॉडर्न मुलगी आहात तुम्ही…मी साधा शेतकरी… तुच्छ नजरेची सवय झालीये मला…”

“मनातून हा न्यूनगंड काढून टाक..मी स्पष्टच बोलते…मला तू आवडतोस आणि तुझ्याशी लग्न करायचं आहे मला..”

माधव गांगरून जातो…कितीतरी वेळ शांतच बसून असतो..

“बोल की काहीतरी..”

“काय बोलू? तुम्ही कुठे मी कुठे…आपल्यात जराही साम्य नाही…”

“कशाला हवंय साम्य?”

“तेही सोडा…उद्या माझ्यासोबत शेतात यावं लागेल…गावात टिपिकल बाईसारखं राहावं लागेल..डोक्यावर पदर घेऊन फिरावं लागेल…बरं तेही करू नका म्हणतो मी…पण तुमच्या मैत्रिणींना काय सांगणार? माझा नवरा शेतकरी आहे, शेतात ट्रॅक्टर चालवतो, ढेकळ फोडतो?? आपली तुलना तरी आहे का?”

“म्हणजे इतक्यात माझा नवरा बनवून पण टाकलं तू स्वतःला..”

“वेडेपणा करू नको…माझ्यासोबत तुझं काहीच भविष्य नाहीये…”

“उद्या जर कुणी माझ्या नवऱ्याबद्दल विचारलं तर सांगेन…माझा नवरा फक्त माझाच नाही तर जगाचा पोशिंदा आहे….कष्ट करून कमावतो…आणि हुशारही आहे…वाचनाची आवड आहे…”

माधव कडे आता उत्तर नसतं…

“मग मी तुझा होकार समजू??”

“हो..अं?? काय?? मी ऐकलं नाही नीट..”

“हो??? येएएएए….”

दिशा हसत चटकन तिथून पळून जाते…

“ओ मॅडम…ऐका ना…अहो तुम्ही हे काय केलंत??”

माधव घरी येतो…विचारात पडतो…. कसं सांगावं हिला?? कसं समजवावं??

माधव ची आई माधव जवळ येते..

माधव तिला सर्व हकीकत सांगतो..

आईला आनंद होतो…

“अरे मग हो म्हण की तिला..”

“काय?? आई?? अगं…”

“तिच्याशिवाय कुणी ओळखलं आहे का रे तुला जास्त? तुझ्याकडे फक्त एक लाचार शेतकरी म्हणून बघत मुली नकार द्यायच्या…दिशा सारखी शिकली सवरलेली मुलगी तुझ्यावर प्रेम करते…फक्त तुझ्यावर…ना तुझ्या पैशावर ना तुझ्या पेशावर…”

एवढं सांगत आई तिथून निघून जाते…

“काहीही झालं तरी मी दिशा सोबत लग्न करून तिचं आयुष्य खराब करणार नाही..” माधव मनाशी ठरवतो…

दुसऱ्या दिवशी माधव आणि त्याची आई शेतात जातात…शेतात कापूस लावलेला असतो…गावातल्या काही बायका तिथे मजुरीला आलेल्या असतात…डोक्यावर पदर घेऊन कुणी डोक्यावर रुमाल ठेऊन उन्हापासून बचाव करत कापूस वेचत असतात…माधव पाहणी करत करत त्या स्त्रियांजवळ जाऊन मदत करू लागतो..

आई हळूच त्याला विचारते…

“काय रे… काय ठरवलं मग..”

“आता हा कापूस गोणीत भरणार आणि उद्या नेणार मार्केटला….भाव चांगला आलाय यावेळी कापसाला…बघू उद्या काय होतं ते…”

“अरे ते नाही..दिशा चं..”

“आई परत तेच…”

“मला सांग…नेमकी कशी मुलगी हवीय तुला?”

“मला कशी हवी यापेक्षा माझ्यासोबत जिचं भविष्य चांगलं असेल अशी मुलगी…माझ्यासोबत जी अभिमानाने शेतकऱ्याची बायको म्हणून स्वतःला मिरवेल.या बायकांसारखी उन्हा तान्हात घाम गाळण्याची जीची तयारी असेल….अशी मुलगी…”

“मग यातलीच एखादी करूया की…”

“अगं या बायकांना सुद्धा नोकरीवाला मुलगा हवा असतो.. नाहीतर मलाही चाललं असतं…”

“मला चालेल की….”

एक मळका ड्रेस घातलेली, डोक्यावर ओढणी घेऊन तोंड झाकलेली आणि घामाने जिचं शरीर भिजलंय अशी एक मुलगी समोर आली…डोक्यावरच्या ओढणीने तोंडही पूर्ण झाकलं गेलं होतं…तिचा चेहरा काही दिसेना…ती पुढे येऊन म्हणाली…

“मला चालेल…माझ्याशी लग्न कराल??”

क्रमशः

Leave a Comment