हिरवा संघर्ष (भाग 10 अंतिम)

 

“सागर भाऊजी? तुम्ही ??आत्ता …इथे?”

“होय..दैवाचा खेळ बघ ना..नेमकं मी आज माझ्या मार्केटिंग च्या जॉब ला रामराम ठोकला… आणि इथे हे असं घडलं…शर्मा…आता तू गेलास तरी चालेल…मी आलोय आता..”

शर्मा दात विचकावत तिथून निघून जातो…

गावकऱ्यांसमोर सागर घोषणा करतो..

“आता तुमच्या शेतमालाला योग्य भाव द्यायची जबाबदारी माझी…”

“अरे पण तुला काय माहिती आहे यातलं? तुला अनुभव तरी आहे का? कसा भाव देणार तू आमच्या शेतमालाला??”

गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली…

दिशा ने सर्वांना शांत केलं…

“जर तुमच्या शेतमालाला भाव दिला नाही…तर…”

दिशा माधव, सागर, सासूबाई आणि सासऱ्यांकडे एकदा बघून म्हणते..

“तर माझी सगळी जमीन तुम्हाला देईन…”

गावकरी आश्चर्यचकित होतात…इतका आत्मविश्वास??

त्या दिवशी घरी तणावाचं वातावरण असतं.. माधव आणि सागर विचार करत बसलेले असतात..सासरेबुवा येतात..

“काय रे पोरांनो?? टेन्शन आलंय का?”

“अप्पा.. अहो दिशा ने आपली जमीन पणाला लावलीये…”

“अरे ज्या पोरीने शेतकऱ्याच्या सन्मानासाठी अक्ख आयुष्य पणाला लावलं…त्यापुढे ती जमीन काय आहे??माझ्या लेकीवर माझा विश्वास आहे…तुम्ही निश्चिन्त रहा..”

अप्पांचं हे अवसान बघून दोघे आनंदून जातात…

“वहिनी कुठेय? तिला बोलवा..”


दिशा येते…त्या दिवशी घरात एक मोठी चर्चा होते…

“आता प्रश्न फक्त आपला नाही तर गावकऱ्यांचा आहे..सागर भाऊजी…तुम्ही काय प्लॅन केला आहे शेतमाल खपवण्याचा??”

“मार्केटिंग मधला माझा अनुभव सांगतो..लोकांना आपल्या उत्पादनाची केवळ माहिती देऊन उपयोग नाही, तर आपलं उत्पादन म्हणजे मूलभूत गरज आहे हे पटवून द्यावं लागतं…”

“बरोबर भाऊजी…अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जर मूलभूत गरजा असतील तर त्यातील पहिली गरज आपण पुरवणार आहोत..”

“लोकांना मुबलक प्रमाणात भाजीपाला, फळं, धान्य विकत मिळतं… मग त्या स्पर्धेत आपलाच माल लोकांनी घ्यावा यासाठी काय करता येईल?”

“भाऊजी…एक सुचवते…डिजिटल मार्केटिंग ला आपण सुरवात करू…”

“पण ते फक्त शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचेल..”

“Exactly, तेच तर हवंय आपल्याला…शहरातली लोकं गावठी गोष्टींसाठी आसुसलेली असतात…ह्या शर्मा ची पोहोच फक्त आसपासच्या गावांपर्यंत आहे…आपण आपली व्याप्ती वाढवूया…”

“लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे…अशी काहीतरी शक्कल लढवायला हवी..”

“माधव..एक काम करशील?? एक रिसर्च कर…हॉस्पिटलमध्ये जा..लोकांच्या आजाराचं, दुःखण्याचं कारणं शोधून काढ…”

“याचा काय उपयोग?”

“सांगेन..सागर भाऊजी…तुम्ही लॅपटॉप आणलाय ना? थोडे दिवस मला हवाय..”

“घ्या की…आणि तोवर मी भाजी मार्केट चा तपास करतो…आणि बाकी ट्रान्सपोर्ट, विक्रेता लायसन्स याची तजवीज करतो..”

दिशा लॅपटॉप वर आपलं काम सुरू करते…

#towards_the_health या हॅशटॅग खाली काही मथळे लिहते… एक फेसबुक पेज तयार करते…ट्विटर, इन्स्टाग्राम अश्या सर्व सोशल मीडियावर तिच्या शेतमालाची माहिती देण्यासाठी अकाउंट चालू करते..

माधव रिसर्च करतो…त्याला अशी माहिती मिळते की लहान मोठे आजार हे केवळ भेसळयुक्त खाण्याने, अति केमिकल युक्त खतांचा वापर केलेला भाजीपाला आणि फळं खाल्ल्याने आणि ऑरगॅनिक अन्न न मिळाल्याने बहुतांश आजार लोकांना झालेत…

दिशा ने याच गोष्टीला केंद्रस्थानी ठेवून सोशल मीडियावर जागरूकता निर्माण केली..आणि तिथेच तिने पिकवलेल्या शेतमालाचा दर्जा, सेंद्रिय पीक, त्यातील पोषणतत्व याची माहिती दिली..

अल्पावधीत तिच्या पेजला विविध शहरातून लाखाहून अधिक लाईक आले…लोकांच्या enquiries सुरू झाल्या…

दिशा ने एका रजिस्टर मध्ये नोंदणी सुरू केली…

“भाजीपाला आणि फळं हवी असल्यास नोंदणी करून ठेवा..लवकरच आपल्याशी संपर्क केला जाईल..”.

दिशा ने एक गुगल फॉर्म तयार केला आणि बघता बघता हजारो लोकांनी advance बुकिंग केली…काहींनी तर advance पैसे भरण्याचीही तयारी दर्शवली…ग्राहकांनी आपल्याला काय काय हवंय, कुठली भाजी, कुठली फळं आणि धान्य हवंय याची माहिती भरली…सोबतच आपला पत्ताही दिला….

दुसरीकडे दिशा ने गावातल्या लोकांकडून माहिती जमा केली, कुणी कुठलं आणि किती पीक घेतलं याची…

पीक काढण्याच्या काही दिवस आधी दिशा ने सर्व शेतकऱ्यांना बोलवून एक बैठक घेतली..


“हे बघा.. आपल्या शेतमालाला या घडीला ग्राहक तयार झालेले आहेत…आता आपण जुळवाजुळव करू….मोरे…तुमचं पीक काय अन किती?”

“कोबी… 50 किलो…”

“ही 15 ग्राहक आहेत…यांना कोबी हवीय…शिंदे…तुमचं??”

दिशा प्रत्येक शेतकऱ्याचा मालाला ग्राहक नेमून देते…
प्रत्येक शेतकऱ्याला ग्राहक मिळतो..शेवटी दिशा म्हणते…

“कमी पडतंय..”

“काय?? ग्राहक??”

“नाही..सर्व ग्राहकांना भाजीपाला, फळं वाटून दिली..पण हे सगळे नोंदणी केलेले ग्राहक आहेत..नवीन येणाऱ्या ग्राहकांना काय देणार??”

शेतकऱ्यांमध्ये एकच जल्लोष झाला…आपला सर्व शेतमाल विकून दाखवण्याची कमाल दिशा ने करून दाखवली होती…

माधव दिशा ला विचारतो…तू जमिनीचा एक तुकडा मोकळा ठेवलाय… त्याचं काय करणार?

“मला त्यात एखादं भन्नाट पीक घ्यायचं होतं.. पण अजून ठरवलं गेलंच नाही काय घ्यावं..”

“बरं ते नंतर ठरव…काही दिवसांनी गावची जत्रा आहे..छान तयार हो…सर्वजण तुला भेटायला उत्सुक आहेत..”

दिशा तयारीला लागते…एक छानशी साडी काढून ठेवते..लग्नात मिळालेल्या शृंगार पेटीकडे तिचं लक्ष जातं… त्यातली उत्पादन ती बघते…aloevera जेल, aloevera facewhash…

ती त्या उत्पादनावरील कंपन्यांचा पत्ता लिहून घेते आणि त्यांच्याशी संपर्क करते…त्या कंपन्यांना कमीत कमी खर्चात मुबलक प्रमाणात कोरफडीची गरज असते.आणि दिशा ला हेच हवं होतं… अश्याच एका कंपनीला ती आणि माधव भेट द्यायला जातात…डील फायनक होतं आणि दिशा ला कोरफडीच्या लागवडीचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं… घरी जात असताना दिशा माधव ला म्हणते,

“खूप दिवस झाले…पिझ्झा खाल्ला नाही, शहरात आलोच आहे तर मस्त ताव मारू…दिशा माधव ला घेऊन पिझ्झा खायला एका रेस्टरन्ट मध्ये जाते…तिथले सॉस चे पाकीट बघून दिशा च्या डोक्यात वळवळ व्हायला लागते…ती माधव कडे बघते..

माधव हसतो…चला, म्हणजे पुढचं पीक टोमॅटो चं घेणार आता तू…

“मी काय म्हणते..फक्त पिकच का घ्यायचं? आपण केचप तयार केली तर??”

“प्रक्रिया??”

“केचप मशीन…आपले शेतकरी टोमॅटो लागवड करतील आणि त्यांचा माल आपणच विकत घेऊ, मुबलक प्रमाणात केचप तयार होईल….केचप मशीन ची माहिती काढू..”.

एकेक भन्नाट आयडिया दिशा च्या डोक्यात येतात आणि त्या ती यशस्वी करून दाखवते.

आता…


पीक काढायची वेळ आली..

सागर ने शेतमाल ग्राहकापर्यंत पोचवायची जबाबदारी घेतली…

उद्या पीक काढणार आणि उद्याच सगळा माल विकला जाणार

आदल्या दिवशी गावची जत्रा असते…सर्वजण तयारी करून जत्रेत हजर होतात..

इकडे शर्मा चं डोकं थाऱ्यावर नसतं… दिशा ची करामत पाहून शर्मा च्या डोक्यात एकच तिडीक गेलेली असते…तो आपल्या माणसांना आदेश देतो…

“जा…जाळून टाका सर्व….माझ्याशी वैर केल्याचे परिणाम काय होतात हे कळू दे त्यांना..”

गावातली माणसं घरी नसतात…याचाच फायदा घेऊन शर्मा ची माणसं सर्वात आधी दिशा च्या शेतात जातात…ज्या वेगाने जातात त्याच वेगाने वापस पळत येतात…

“भूत….भूत…पळा…”

ती माणसं जीव मुठीत घेऊन पळत सुटतात…

त्यांना पाहून काही लोकं घाबरतात, तेही पळ काढतात.बातमी दिशा पर्यन्त जाते…गावातले शेतकरी जत्रा संपल्यावर जमा होतात…

“काय प्रकार झालाय??”

“काही माणसं भूत म्हणून ओरडत इथून पळाली…दिशा च्या शेतात भूत आहे म्हणून ओरडत होती..”

“भूत??”

“चला पाहू आपण…”

“नको ताई…आम्ही घाबरतो…आम्ही नाही येत..”

“मी जाते..”

“मीपण येतो तुझ्यासोबत…” माधव म्हणाला..

दोघेही शेतात जातात अन भुताला आपल्यासोबत घेऊनच येतात…

“हे बघा… हे भूत आहे…”

सर्व लोकं घाबरून पाहतात…

“हे वेगळंच भूत दिसतंय..”

“याला रोबोट म्हणतात…अथर्व ने कालच रोबोटीक बुजगावणं तयार करून शेतात ठेवलं होतं… आणि तुम्ही याला भूत समजलात..”

“रोबोटीक?”

“होय…इलेक्ट्रॉनिकस चा वापर करून हे चालतं बोलतं बुजगावणं तयार केलंय..”

गावकऱ्यांच्या मनातली भीती दूर झाली, कौतुकाने ते रोबोटशी खेळू लागले…

दुसऱ्या दिवशी सर्व मुलं, माधव, सागर आणि काही शेतकरी दिशा च्या शेतात पीक काढायला सुरवात करतात…
इतक्यात सकू पळत पळत दिशा कडे येते..

“ताई…काल भूत भूत म्हणून आलेली माणसं शर्मा ची होती…शेत जाळायला आलेली, पण भूत बघून पळली..गावातूनच ही माहिती मिळाली…”

“काय??त्या शर्मा ची इतकी हिम्मत?” माधव चिडतो…

“पण चांगल्याचं पारडं नेहमीच जड असतं…. अथर्व, तुझ्यामुळे आज किती मोठं संकट टळलं…तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही…”

“भाऊ मानतेस, मग उपकार कसले?”

सर्व पद्धतीने आता शेतमाल विकायची तयारी होते…
सागरची विशेष धावपळ होते…कारण ग्राहकाचं ठिकाण वेगवेगळं असतं… गावातला तो लायब्ररीयन…तोही सागर च्या मदतीला जातो… अखेर त्यालाही काहीतरी काम हवंच होतं…’समजेल’ असं…

संध्याकाळी सागर दमून घरी येतो…

हातात दोन जड पिशव्या असतात.

“भाऊजी? कुठला माल परत आला?”

“माल नाही ओ वहिनी..पैसे ठेवायला पाकीट छोटं पडलं..शेवटी या दोन पिशव्या घेतल्या…काय करणार, कुणी सुट्टे द्यायचं ते कुणी नोटा द्यायचे…”

घरात आनंदीआनंद…

गावकऱ्यांना बोलवण्यात येतं… त्यांना त्यांचा मोबदला देण्यात येतो…त्या दिवशी गावातला प्रत्येक शेतकरी रडत होता… आपल्या कष्टाचं खरं आणि योग्य ‘मूल्य’ त्यांना त्या दिवशी मिळालं होतं….

काही महिन्यांनी…

मीनाक्षी आणि तिच्या नवऱ्याची गाडी हायवे वर बंद पडलेली असते..मीनाक्षी उतरून लिफ्ट साठी मदत मागत असते..

“म्हणे 10 लाखाची गाडी…पडली ना बंद??”

“अगं मी काय करू आता? लिफ्ट घे अन ज तू..मी येतो मागाहून..”

“कुणी थांबेल तर ना..”

इतक्यात एक BMW तिच्यासमोर येते..

“बघा माझी वट…इतकी मोठी गाडी थांबली माझ्यासाठी… मोठी पार्टी दिसतेय…मोठा बिझनेसमन असेल वाटतं…”

गाडीची काच खाली होते… ड्रायव्हर विचारतो…

“ताई बसा मागे…मालकीण बाईंशेजारी..”

मीनाक्षी गाडीचं मागचं दार उघडते…दिशा तिच्याकडे हसून बघत असते…मीनाक्षी ला चक्कर यायचीच बाकी राहते…

“म्हटलं होतं ना? 3 वर्षांनी सांगेल…बैलगाडीवर फिरते की….आता तूच बघ तुझ्या डोळ्यांनी..”

आणि अशा प्रकारे शेतीच्या क्षेत्रात एक क्रांती घडते…सुलेखा साठी मोठमोठी स्थळ नाकारली जातात… का? तर शेतकरी मुलगाच करायचा…दुसरा कुणीही नाही..

शेतकरी मन सन्मानाने राहू लागतो…agri बिझनेस म्हणून अभिमानाने आपली ओळख सांगू लागतो…
माधव आता दिशा च्याच पद्धतीने शेती करू लागतो..सागर शहरात पुन्हा जाण्याचा विचार सोडून देतो…

आणि, अश्या प्रकारे एक “हिरवा संघर्ष” फळास येतो…

Story by Sanjana Sarojkumar Ingale
call/Whatsapp: 8087201815

(कशी वाटली ही कथामालिका? आवडल्यास नक्की लाईक अन कमेंट करा…आणि हो, आपल्या शेतकरी मित्रांना जरूर पाठवा…सगळं काही, फक्त लेखिकेच्या नावासकट करा हं..)

5 thoughts on “हिरवा संघर्ष (भाग 10 अंतिम)”

Leave a Comment