हिरवा संघर्ष (भाग 1)

 

“काय? दिशा येतेय?”

“दिशा येणारे??”

“दिशा??”

गण्या रस्त्याने पळत सुटला होता…

“दिशा येणारे..दिशा येणारे..” म्हणत अख्या गावभर त्याने दवंडी पिटली होती. गावातल्या एकेकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. गेले कितीतरी वर्ष ती शिक्षणासाठी बाहेरगावी होती..आणि परत येतेय ती मोठी डिग्री घेऊनच…गावाची मान तिच्यामुळे उंचावली होती…पेपर मध्ये तिने मिळवलेल्या गोल्ड मेडल चा फोटो प्रत्येक गावकऱ्याने जपून ठेवलेला… तिने शाळेत असताना गावात केलेल्या वॉटर सेन्सर प्रयोगाने गावभरात कौतुक झालं होतं…तिच दिशा आज येतेय..इतक्या वर्षांनी…

जातेगाव मध्ये दिशा लहानाची मोठी झाली.तिच्या हुषारीचा प्रत्यय गावभर पोचलाच होता…आता ती परत येणार म्हणून प्रत्येकजण तिला भेटायला उत्सुक होता.


“आज छान गुलाबजाम बनवा बरं… दिशा पण येतेय..”

“काकू दिशा दीदी माझ्या खोलीत झोपेल..”

“नाही..दिशा दीदी माझी..”

“माझी..”

“माझी..”

12 जणांच्या एकत्र कुटुंबातील दिशा…घरात काका, काकू, आजी, आजोबा, त्यांची मुलं… असा गोतावळा..

“सुलेखा ला पाहायलाही नेमके आजच पाहुणे येणारेत… आणि दिशा च्या स्वागताचीही तयारी…चला आवरा पटापट…”

सुलेखा…दिशा ची चुलतबहिण… दिशा च्याच वयाची, शिक्षण गावातच झालं…आणि आता लग्नासाठी पाहायला येणं सुरू झालं होतं…

“सुलेखा आहे कुठे??”

“ती गेलीये दिशा ला घ्यायला…”

“Hey… दिशुडी…”

“सुलू..”


दोघी बहिणी बस स्टॉप वर एकमेकांना भेटतात…

“किती दिवसांनी पाहतेय तुला…तुला माहितीये तुझ्या स्वागताची किती तयारी झालीये ते..”

“हम्मम…तू तर माझ्या स्वागताला जिजूच आणतेय की..”

“चल..काहीतरी…संध्याकाळी येणारेत पाहुणे…”

“कसा आहे गं मुलगा??”

“काहीच माहीत नाही बघ…अचानक बघण्याचा कार्यक्रम ठरला…आता बघू काय होतंय…घरी जायला रिक्षा शोधावी लागेल..आज रिक्षा संपावर गेल्यात की काय..”

दोघीजणी रिक्षा ची वाट पाहू लागतात..

तेवढ्यात मागून एका ट्रॅक्टर चा भला मोठा आवाज येतो…धूळ उडवत ट्रॅक्टर दोघींसमोर थांबतो..
जिम मध्ये बॉडी बनवलेल्या तरुणालाही लाजवेल अशी अंगकाठी…आजकाल बिअर्ड म्हणतात तशी दाढी…गोरापान रंग..हिरोलाही लाजवेल असा चेहरा…अंगात शुभ्र कुर्ता आणि निळ्याशार रंगाची जीन्स…माधव ट्रॅक्टर थांबवत दोघींना चांगल्या उद्देशाने विचारतो…


“मॅडम…मी त्याच रस्त्याने जातोय…सोडून देऊ का..”

सुलेखा नाक मुरडते..

“आम्हाला सवय नाही अश्या गाड्यांची..फोर व्हीलर लागते आम्हाला..”

“अहो हिला पण आहेत की चार चाकं..”

“काही नको..”

सुलेखा दिशा चा हात पकडत बाजूला नेते..माधव निघून जातो…तो जाईपर्यंत दिशा त्याचकडे बघत असते…असं ग्रामीण देखणेपण तिला शहरात कुठेही दिसलं नव्हतं…

बराच वेळ होऊनही गाडी मिळत नाही…

“चल..पायीच जावं लागणार आता..”

तेवढ्यात नामदेव काका बैलगाडीने जाताना दिसतात..

“काका…आम्हाला सोडता का??” दिशा म्हणते…

“अगं…”

“पायी जाण्यापेक्षा बरंय की..”

“बरं.. चल..”


दोघीही बैलगाडीत बसतात…पुढे जाताच माधव चा ट्रॅक्टर मागून येतो..नामदेव काका बैलगाडी बाजूला घेतात…माधव बैलगाडी शेजारी आपला ट्रॅक्टर नेतो…आणि या दोघींकडे पाहून हसतो..

“आधी सांगायचं की..तुम्हला फोर व्हीलर नाही, eight व्हीलर हवी होती ते…हा हा हा..”

नामदेव काका माधव ला म्हणतात..

“माधवा…बरंय का रे..”

“हो काका..”

सुलेखा चा संताप होतो..ती मान झटकते..दिशा ला हसू येतं… सुलेखा तिच्याकडे रागाने बघते अन दिशा तोंडावर बोट ठेवून इशारा करते…

गावात पोचताच रस्त्याने दिशा ला पाहायला गावकरी येतात…ती सर्वांना नमस्कार करून घरी पोचते…

घरी येताच आई दिशा ला ओवाळते…सर्व किलबिल दिशा भोवती गराडा घालतात. सर्वांना भेटून अखेर दिशा आपल्या खोलीत जाऊन आराम करते..थकल्यामुळे तिला झोप लागते अन जाग येते ती डायरेक्ट संध्याकाळीच…

बाहेरून पाहुण्यांचा आवाज येत असतो..

“अरेच्या..आज सुलेखा ला पाहायला येणारेत..मला जाग कशी आली नाही??”

दिशा हळूच बाहेर येते…जसजशी नजर पुढे सरकते तसतसा आलेले एक एक जण स्पष्ट दिसू लागतो…

तिची नजर मुलाकडे जाते..डोळे विस्फारले जातात…तव हसू आवरेना…सुलेखा चा चेहरा बघितला… इतके भांबावलेले हावभाव सुलेखाच्या चेहऱ्यावर ती पहिल्यांदा पाहत होती..

क्रमशः

________________

part 2

https://www.irablogging.in/2020/11/2.html

part 3

https://www.irablogging.in/2020/11/3.html

Part 4

https://www.irablogging.in/2020/11/blog-post_5.html

part 5

https://www.irablogging.in/2020/11/5.html

part 6

https://www.irablogging.in/2020/11/6.html

part 7

https://www.irablogging.in/2020/11/7.html

part 8

https://www.irablogging.in/2020/11/8.html

part 9

https://www.irablogging.in/2020/11/9.html

part 10

https://www.irablogging.in/2020/11/10.html

Leave a Comment