स्वावलंबी-2

तो गालातल्या गालात हसला,

“बरं, तुला शिकायची ईच्छा आहे का?”

“आता कशाला विचारताय? जेव्हा विचारायचं तेव्हा तर विचारलं नाही.”

“अगं अजून वय तरी आहे का तुझं? कॉलेजला गेलीस तरी चार मुलं प्रपोज करतील तुला..”

या वाक्याने मात्र ती विरघळली, पण पुन्हा आपल्या विषयावर आली..

“मला फूस लावू नका..मी शिकले असते तर आज कमावती झाले असते”

“बरं.. तुला काही कमी पडतंय का? ”

“हेच..हेच चुकतं तुम्हा पुरुषांचं… तुला मी सगळं देतो या गर्वात असतात तुम्ही कायम..”

“बरं… तू शिक..मी सपोर्ट करतो..”

ती गोंधळली, कारण अभ्यास म्हटला की लहानपणापासून झोपच येई..

तिने जांभई देत देत एकेक कारणं दिली..

“मग मुलाला कोण सांभाळेल?”

“मी आईला बोलावून घेतो, असंही तिला यायचंच होतं.. आणि तुलाही माहितीये माझी आई, तुला कशालाही हात लावू देणार नाही.”.

बरोबर बोलत होता तो, सासुबाई तश्याच होत्या अगदी..

“पण..स्वयंपाक तर मलाच करावा लागेल ना?”

“मी स्वयंपाकिण लावतो एक, आणि अजून एक बाई आणतो घरकाम करायला, तू कशालाच हात लावायचा नाही, फक्त अभ्यास एके अभ्यास…”

“पण..”

तिच्याकडे आता काही कारण उरलं नव्हतं,

एकीकडे सपोर्ट बद्दल तुणतुणे वाजवत होती, आणि आता सपोर्ट मिळतोय तर तिला टेन्शन आलं..

तो फॉर्म घेऊन आला, कॉलेजमध्ये बाहेरून परीक्षा देण्यासाठी ऍडमिशन घेतलं. तिला पुस्तकं आणून दिली..

सासुबाई आल्या, आल्या आल्या त्यांनी पदर खोचला आणि तिला अभ्यासाला बसवलं..

खोलीत ती एकटी,

समोर जाडजूड पुस्तकं..

नवरा कॉफी घेऊन आला,

“हे घे, तुला फ्रेश वाटेल…चांगला अभ्यास होईल.”

तिने पुस्तक उघडलं,

दोन अक्षरं वाचत नाही तोच झोप येऊ लागली,

तिला आठवलं,

अशीच दुसऱ्या वर्षाची परीक्षा होती,

अभ्यास अन परीक्षा नको नको झालेलं तिला,

त्यातच एक स्थळ आलं आणि तिला सुटका झाल्यासारखी वाटली,

****

भाग 3

स्वावलंबी-3

1 thought on “स्वावलंबी-2”

Leave a Comment