स्त्रीधन – 3 अंतिम

 हे ऐकून त्यांना प्रचंड अभिमान वाटायला लागतो..

पार्लर मधली गर्दी दिवसेंदिवस वाढत असते,

आहे ती जागा आणि उपकरणं कमी पडू लागतात..

एके दिवशी कविता आपल्या नवऱ्याशी बोलत असताना रंजना काकू ऐकतात..

“अहो मी काय म्हणते, थोडं लोन काढून पार्लर ची जागा वाढवूयात का? आणि काही नवीन कॉस्मेटिक पण घ्यायचेत.. बाजारात बरेच नवीन प्रोडक्ट आलेत, ग्राहक मागणी करतात पण आपल्याकडे नवीन काहीच नाही..”

“कशाला उगाच एवढं? आहे त्यात कर की..जेवढे ग्राहक आले तेवढे आले… नाही आले तर नाही आले…कुठे नुकसान होणार आहे?”

नवऱ्याला कविताची तळमळ समजली नाही, तरी ती म्हणाली,

“बरं लोन नको, माझ्या लग्नाचे काही दागिने आहेत माझ्या आई वडिलांनी मला केलेले…त्यातलं एक मोडून करायचं का?”

“तुझे दागिने, स्त्रीधन असतं ते…बघ बाई तूच आता”

कविताने ठरवलं, एक दागिना मोडून पार्लर वाढवायचं..

शुक्रवारी तिने संध्याकाळी काही वेळ काढला, सासूबाईंकडे ती गेली आणि घाबरत म्हणाली..

“आई, मी हा एक दागिना मोडून…”

“कशाला मोडायला हवाय दागिना? स्त्रीधन आहे ते..असं मोडतात का?”

सासूबाई गरजल्या तशी ती हिरमुसली, मागे फिरली..

“थांब…”

सासूबाईंनी तिला थांबवलं, 

कपाट उघडलं,

त्यांच्या आईचा सोन्याचा हार काढून तिच्या हातात दिला..

हे मोड आणि कर पार्लर मोठं..

रंजना काकूंनी सुनेचं आणि मुलाचं बोलणं ऐकलेलं असतं..

कविता बघतच राहिली..तिचे डोळे भरून आले..

सासूबाई म्हणाल्या,

“मला वाटायचं माझ्याकडे इतकं सोनं आहे, पैसा आहे..मी खूप धनवान आहे…पण खरी संपत्ती तुझ्याकडे आहे मुली..माणसांची संपत्ती..तू इतकी माणसं कमावली आहेस की या गावात असं एकही ठिकाण नाही जिथे तुझी ओळख नाही..आज तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे बायका तुझ्यापाशी येतात…फक्त पार्लर साठी नाही तर तुझ्यासोबत बोलायला…

इतकी माणसं तू जमवली आहेस..हेच खरं स्त्रीधन आहे…एखाद्या बाईने अंगावर कितीही सोनं लपेटलं तरी तिला तुझ्या संपत्तीची सर येणार नाही…हे घे माझ्या आईचा हार.. स्त्रीधन म्हणून हा धातू किती दिवस सांभाळत होते, पण खरं सोनं तर माझी सून आहे आणि जगाला हेवा वाटेल अशी संपत्ती तिच्याकडे आहे..माझ्या आईच्या या हारातून तुझं काम वाढव…अजून बायका येतील..त्यांच्या हसण्याचे आवाज येतील… आणि त्या आवाजाला माझ्या आईच्या समाधानाची सौम्य किनार दिसून येईल…”

कविताच्या मनात त्याक्षणी काय भाव उठले हे शब्दात सांगणं कठीण आहे, पण त्या क्षणी खऱ्या अर्थाने कविताला स्त्रीधन मिळालं..

आणि रंजना काकूंचं सुनेच्या रुपात असलेलं सोनं आज अजून झळाळून निघालं..

समाप्त

14 thoughts on “स्त्रीधन – 3 अंतिम”

 1. अप्रतिम लेख आवडला.असेचं असावं सासू सून प्रेम.👌👌👌👌👌👍👍

  Reply
 2. खूप सुरेख विषय अलगद हाताळून संवेदनशील शेवट केला आहे जो इतरांनाही बरंच काही शिकवून जातो

  Reply
 3. कथा छान आहे!…..
  पण तिची एवढे तुकडे तुकडे कशाला?

  Reply

Leave a Comment