सूनबाईचा मित्र (भाग 9)

“तात्या…आईला काय झालं? अशी काय येड्यागत करतेय??”

“काही नाही, बरं नाही आईला…पळ तू..”

सकाळीच पिंट्या मामाच्या गावाहून आला होता अन आल्या आल्या हे सगळं त्याला दिसलं. श्वेताताईला भेटायला तो जातो अन वाटेत त्याला प्रभा भेटते.

“तू परत आलीस??”

“हो मग.. करमत नाही मला तिकडे..”

“एक काम कर, तू इथेच रहा…”

“बरं इथेच राहील…पण श्वेता चा नवरा??”

“तो नालायक आहे म्हणे, दुसरी बायको करणार आहे..”

“तुला कसं कळलं??”

“आजी सांगत होती, श्रीधर सोबत लग्न केलं असतं तर चांगलं झालं असतं पोरीचं असं म्हणत होती..”

मोहनकडून आजीला ही गोष्ट समजली होती, पण आजी घरी सांगू शकत नव्हती…

“याचा अर्थ सर्वांची ईच्छा होती की श्वेताने श्रीधर सोबत लग्न करावं.”

“हो प्रभा…ताईचं लग्न श्रीधर सोबत झालं असतं तर किती बरं झालं असतं ना??”

त्यांचं बोलणं ऐकत क्रांतीही तिथे येते..

“पिंट्या, काहीही काय बोलतो रे…तुम्ही लक्ष देऊ नका हा, लहान आहे तो..”

*****

क्रांती श्वेताला जाऊन भेटते..

“डोकं जड झालंय का गं?”

“हो गं, अजून दुखतंय…”

“काल तू काय काय बोलत होतीस..”

“काय बोललेली मी??”

“श्रीधर बद्दल..”

“मला आठवत नाहीये, ए पण विसरून जा हा, नशेत काहीही बरळत असेन मी..”

“बरं ते जाऊदे, ऐक ना…मी प्रेमात पडलीये..”

“काय सांगतेस??”

“हो..”

“कोण तो??”

“ओळख बघू..”

“मी ओळखते त्याला??”

“हो…”

“अगं बाई, कोण ए असा?”

“आठव..गावातला सर्वात देखणा मुलगा, सर्वात हुशार, कर्तबगार..”

“असा तर फक्त माझा श्रीधर…म्हणजे, आपला श्रीधर आहे..”

“बरोबर ओळखलंस..”

“काय?? श्रीधर??”

“हो…”

श्वेता हे ऐकून पार भांबावून जाते..तिला खुश व्हायला हवं होतं, पण तिलाच समजेना, तिला वाईट वाटत होतं..”

“काय गं?? तुला या आनंद नाही झाला??”

“झाला की…”

“तुझ्या चेहऱ्यावर दिसत तर नाहीये..”

“अगं तू असा धक्का दिला की मला काही सुचलंच नाही..”

“बरं ऐक, मला तो आवडतो..पण त्याला मी आवडते की नाही माहीत नाही, पण तू आमची सेटिंग लावशील..”

“मी?”

“हो..तूच..कारण तू त्याला चांगलं ओळखतेस, तुझं ऐकेल तो..”

“अगं ऐकेल म्हणून असं बळजबरीने प्रेम करायला लावायचं का??”

“बळजबरीने कशाला? त्याला मी आवडणार नाही का??”

“त्याचं दुसरीवर प्रेम असेल तर??”

“इतका विचार का करतेय तेच समजत नाही मला, बाकी मला माहीत नाही, तू त्याच्याकडे जाणार आणि माझ्या बद्दल विचारणार.. ठरलं..”

श्वेता अडचणीत सापडली, एकीकडे तिला श्रीधर आवडत होता, पण लग्न झालेलं असल्याने असा विचार मनात आणायलाही ती घाबरायची, पण क्रांतीसाठी श्रीधरला पटवायचं हे तिला जरा अवघडच होतं..

“ऐक, आज संध्याकाळी त्याला भेटायला जायचं..”

“अगं माझ्यासारख्या लग्न झालेल्या बाईने असं त्याला भेटायला जाणं चांगलं वाटतं का??”

“आणि माझ्यासारख्या कुवाऱ्या मुलीने त्याला जाऊन भेटलं तर गावात किती बोभाटा होईल??”

“एक काम करू, त्याला घरीच बोलवू, मोहनचा मित्र आहे तो, घरी आला म्हणजे काळजी नाही..”

“चालेल, बरं मी एक पत्र लिहिलं आहे त्याच्यासाठी, तू फक्त त्याला वाचून दाखव..माझी हिम्मत नाही गं त्याला वाचून दाखवायची…हे बघ, मी त्याला सांगितलं आहे की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, आणि पत्रातून श्वेता तुला सांगेन असं..”

“एवढं सगळं बोललीस त्याच्याशी?? मग हे पत्राचं खूळ कशाला??”

“पत्रात कसं जरा रोमँटिक लिहिलेलं असेल, ते आपल्या भाषेत बोलणं म्हणजे, आपल्यालाच हसू येतं आपलं ऐकून..”

“आणि मी बोललेलं??”

“तू तिऱ्हाईत व्यक्तीचं वाचून दाखवणार आहेस, तुला काही नाही वाटणार..”

“बरं बाई करते तुझ्यासाठी..” श्वेता हात जोडून क्रांतीसमोर अखेर नमते..संध्याकाळी श्रीधरला बोलावण्यात येतं, मोहन सोबत गप्पा झाल्यावर श्वेता त्याला मळ्यात जाण्याचा इशारा करते, कुणाचं लक्ष नाही बघत तीही मागोमाग जाते. तिच्या हातात क्रांतीने दिलेलं भलंमोठं पत्र असतं.

“मला का बोलावलं असं अचानक??”

“क्रांतीने सांगितलं ना तुला??”

क्रांतीच्या एका कॉलेज प्रोजेक्ट साठी माती परिक्षणाबद्दल तिने विचारलेलं श्रीधरला आठवतं..त्या संदर्भातच हिने बोलावलं असं त्याला वाटलं…

“बरं मी वाचून दाखवते पटापट, मला जास्त वेळ नाही थांबता येणार..”

“हे काय आता..पटकन सांगून मोकळी हो की..”

“तू झालास मोकळा??”

“म्हणजे??”

“आपण कितीवेळा भेटायचो, दरवेळी एकमेकांचा निरोप घेतला, पाठ वळली की पुन्हा एक हाक मारायचास, म्हणायचा की तुला एक सांगायचं आहे..”

“हं..”

“शेवटपर्यंत सांगितलं नाहीस तू..बरं जाऊदे, तो मुद्दा नाहीये, मी वाचून दाखवते..”

“प्रिय श्रीधर, तुला प्रिय म्हणण्याची हिम्मत करतेय, कारण खरंच तू मला प्रिय आहेस. तुला पाहिलं आणि वाटलं की हाच तो, ज्याची आपण कित्येक जन्म वाट बघत होतो..तू समोर आलास की हृदय धडधडायला लागतं, का असं?? तुझ्या हृदयात मला स्थान हवंय..देशील??”

श्रीधर हे ऐकून एकदम गार पडतो, श्वेता असं कसं बोलू शकते? श्वेता हे बोलली यावर त्याचा विश्वासच बसेना..त्याला माहित नव्हतं की ही क्रांतीचं पत्र वाचून दाखवत आहे, आणि श्वेताला माहीत नव्हतं की श्रीधर हे क्रांतीचं नव्हे तर माझंच पत्र समजतोय..

श्रीधर श्वेताकडे बघतच राहिला..

“असं काय बघतोय? याचं उत्तर हवंय, उद्या येईल मी परत तेव्हा सांग काय ते..”

श्रीधर चक्रावून जातो, खाली बसून घेतो…श्वेताने वाचलेले शब्द त्याच्या कानात घुमत असतात आणि त्या क्षणाला त्याच्या चेहऱ्यावर एकदम हसू फुटतं. आयुष्यभर जी गोष्ट ऐकण्यासाठी तो झुरत होता ती गोष्ट श्वेताने आज बोलून दाखवली. त्या क्षणी त्याला भूतकाळ भविष्यकाळ कशाशीही घेणं नव्हतं, त्याला फक्त वर्तमान प्रिय होता..श्वेताचं लग्न झालंय वगैरे सगळं तो विसरून गेला होता. पत्राचं उत्तर काय देणार याचा विचार करत तो घरी गेला…

श्वेता घरी येताच क्रांती तिला घेरते,

“काय म्हणाला तो??”

“उद्या देणारे उत्तर..” श्वेता वैतागून म्हणाली..

“देवा…कृपा कर अन त्याचा होकार असू दे..”

“होकार मिळाला तर ठीक, नाहीतर जास्त लगट करू नकोस…”

“का नाही देणार होकार?? काय कमी आहे माझ्यात??”

“तसं नाही गं, त्याच्या मनात कुणी दुसरी कुणी असेल तर??”

“काय चाललंय तुझं केव्हाचं..दुसरं कुणी असेल तर दुसरं कुणी असेल तर..कोण आहे त्याच्या मनात..”

“अगं ए चिडू नकोस, मी करते तुझ्यासाठी प्रयत्न..”

“आता कशी माझी मैत्रीण शोभतेस..”

श्वेताने मोठ्या मुश्किलीने बनावट हसू चेहऱ्यावर आणलं..

त्या रात्री तिला झोप लागेना…ती आकाशातल्या चंद्राकडे बघू लागली..त्याला सांगू लागली..

“क्रांती सारखं मलाही हिम्मत का नाही दिलीस?? हिम्मत दिली असतीस तर कदाचित…नाही नाही, हे काय, काय बोलतेय मी..लग्न झालंय माझं..असा विचार करणं व्यभिचार आहे..नाही..”

ती परत बेडकडे वळणार तोच तिला घराजवळच्या नदीकाठच्या ठिकाणी श्रीधर दिसला..तोही चंद्राशीच बोलत होता..

“काय बोलत असेल हा?? क्रांती चा विचार करत नसेल ना?? पण मग त्या चंद्राला कशाला सांगायचं त्याने? चंद्र फक्त आमच्या दोघांची गुपितं जपून ठेवायला आहे, त्यात तिसरं कुणी नको ..”

दुसऱ्या दिवशी श्वेता महान सोबत शेतात त्याला मदत करायला जाते, शेतात 2 नवीनच बुजगावणी तिला दिसतात,

“दादा, अरे हे कधी ठेवले? किती गमतीशीर दिसताय..”

“हे कुणी केलं?? मी तर नाही केलेलं..”

“मग दुसरं कोण करणार??”

दोघेही त्या बुजगावण्यांजवळ जातात, एक उंच आणि एक बुटकं बुजगावणं लांब लांब लावलेले असतात..श्वेता त्या बुटक्या बुजगावण्याजवळ जाऊन त्याला कुरवाळते..

“किती गोंडस आहे नाही का?”

असं म्हणताच ते बुजगावनं हात पाय हलवायला लागतं आणि वेड्यासारखं नाचायला लागतं..श्वेता जोरात किंचाळते… सैरावैरा पळत सुटते..मोहन धीर धरून त्या बुजगावण्याला पकडतो आणि त्यातल्या पिंट्याला बाहेर काढतो.

“काय रे..अभ्यास नाही का तुला…काय उद्योग चाललेत..”

मोहन पिंट्याच्या पाठीवर धपाटा टाकत त्याला हाकलून लावतो..अन त्वेषाने त्या मोठ्या बुजगावण्याजवळ जातो..बुजगावनं स्थिर असतं पण जसा मोहन जवळ जात असतो तसं ते पळायला लागतं.. मोहन मागे अन बुजगावनं पुढे… आपली इज्जत वाचवायला ते बुजगावनं सैरावैरा पळत सुटतं..

तुम्हाला कळलंच असेल त्यात कोण असेल…🤣

क्रमशः

1 thought on “सूनबाईचा मित्र (भाग 9)”

Leave a Comment