सूनबाईचा मित्र (भाग 8)

श्वेता, क्रांती सकट सर्वांनी कोकम सरबतच्या जागी दारू पिलेली असते, सर्वजणी तररर असतात, काहीबाही बरळत असतात. सर्व माणसं तिथे येऊन आपापल्या बायकांचं निराळंच रूप बघत असतात. ज्याच्या बायकोने आयुष्यात कधी नाच केलेला नसतो ती my name is sheela म्हणत थिरकत असते, एकाची बायको सासूच्या काठीची बंदूक करून झाडामागे लपून वाघाची वाट बघत असते, शिकार करण्यासाठी…आपापल्या नवऱ्यांना बायकांच्या तोंडून काहीबाही निघू लागलं..

“हे पहा आलं आमचं ध्यान…तुला सांगते शितले, यांच्यासारखा भित्रट माणूस आजवर पाहिला नाही मी…घरात उंदीर निघाला तर पदरा आड लपून बसलेलं हे..”

“अगं हे तर काहीच नाही, आमचंवालं तर इतकं घाबरट आहे, रात्री कुत्र भुंकलं तर पोराला चिटकून बसतं..”

“ती बघ कुचकी मेली, कोण काय..माझी थोरली जाव.. दिवसभर मळ्यात जाऊन मोबाइलमध्ये बोटं घालती..घरात एक कामाला हात लावणार नाही..”

“ए भवाने, कुचकी कुणाला म्हणती…मळ्यात जाऊन उन्हाचं कामं करतो आम्ही, तुला ऊन सुद्धा लागू देत नाही ..”

“मी काय घरात बसून झोपा काढती काय??”

“ओ आत्या..काय करू ऱ्हायल्या..”

“पिशवी आन माझी, सगळं समान भर..मला न्यायला येणारे तो..”

“कोण..”

“मिथुन..”

“कोण मिथुन??”

“मिथुन चक्रवर्ती..”

एकंदरीत सगळंच वातावरण मजेशीर झालेलं..इकडे नवरे आपापले गुपितं बायकोच्या तोंडून जगजाहीर होतांना डोक्याला हात मारून घेत होते आणि दुसऱ्यांची गुपितं ऐकतांना मात्र पोट धरून हसत होते, जावा-जावा, सासू-सुना यांच्या मनात दबलेलं आज सगळंच बाहेर पडत होतं…

प्रभाला हीच गम्मत तर अनुभवायची होती, पण आपली लाडकी सून कुठेय? तिची काय अवस्था झाली असेल हे पाहायला प्रभा तिच्या खोलीत गेली..

श्वेता ग्लास पकडून बेडवर उभी होती, आणि क्रांती बेडवर आडवी पडलेली..ती श्वेताला विचारत होती..

“लग्न करावं की नाही.. To be or not to be..” गुंगीत असलेली क्रांती जड झालेल्या जिभेला सावरत बोलायचा प्रयत्न करत होती..

श्वेता तर वेगळ्याच विश्वात गेलेली..

“लग्न..?? मी केलं लग्न…काय मिळालं मला?? केदार सारखा नवरा…त्यापेक्षा बापाने विहिरीत ढकलून दिलं असतं… सगळं आहे गं, पैसा, आई बापासारखे सासू सासरे, पण ज्याच्यासाठी गेले तोच मला नाकारतो?? थू अश्या जिंदगीवर.”

हे ऐकून प्रभा एकदम शांत झाली, कधीही मन मोकळं न करणारी श्वेता मनातली सल आज बोलून दाखवत होती.क्रांती तिला विचारत होती..

“तुझं लग्न एखाद्या चांगल्या मुलाशी व्हायला हवं होतं..”

“खूप स्वप्न रंगवलेली मी ..स्वप्नातला राजकुमार…”

“ए कसा दिसायचा तो राजकुमार??”

“तो ना…हे बघ, मी मोकळ्या अश्या रानात उन्हाची एकटी उभी आहे…कुणी मदतीला येईल म्हणून वाट बघतेय, तोच समोरून घोड्यावरुन एक मुलगा येतो..हवेत उडणारे केस, पांढरा शर्ट, काळी जीन्स, हातात सोनेरी घड्याळ..एकदम देखणा…तो मला पाणी देतो, आणि मी त्याच्याकडे बघतच राहते..”

“पुढे??”

“मग तो मला लग्नाची मागणी घालतो..”

“असं कुणीतरी दिसलं मला..”

“तू वर्णन केलेल्या सारखा एक मुलगा…आठवला मला..”

“कोण??”

“श्रीधर..”

“श्रीधर??”

“हो मग…मित्र ना तुझा..”

“मित्र…लग्नानंतर कसलं मित्र अन कसलं काय, आणि नवरा म्हणून श्रीधर??”

“त्याच्याशी लग्न व्हायला हवं होतं तुझं..”

“त्याला मी कुठे आवडत होते. “

“तुला आवडायचा का तो??”

श्वेता एकदम शांत झाली, काहीच उत्तर देत नव्हती…तिच्या मौनात असलेलं उत्तर प्रभाला समजलं..

“क्रांती…लग्न झालंय माझं, हे असलं बोलणं शोभतं का मला..शिव शिव शिव..”

प्रभा त्या क्षणी पक्कं करते, या दोघांची प्रेमकहाणी घडवून आणायची, श्वेताला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळवून द्यायचा…

प्रभा तिथून निघाली तोच एका खोलीतून आवाज आला..

“का उशीर केलास तू यायला?? तेव्हा वेळेवर आला असतास तर माझ्या बहिणीची फसवणूक नसती झाली..”

“मोहन, मला काहीच कल्पना नव्हती रे, की श्वेताचं लग्न ठरतंय म्हणून…अरे पण तू तरी बोलवायचं मला..”

“कसं?? मला माहित होतं का की तुला श्वेता आवडते?? श्वेताची सगळी बोलणी झाली, पत्रिका छापल्या गेल्या, तुझ्या घरी पत्रिका द्यायला आलो तेव्हा तुझं पाकीट खाली पडलं.. त्यात मला श्वेताचा फोटो दिसला तेव्हा समजलं…”

“नियतीच्या मनात हेच असेल…श्वेता खुश होती, तिच्या आनंदात माझा आनंद..”

“अरे पण तिचा नवरा केदार, बाहेर एका मुलीशी लफडं चालुये त्याचं, बायकोला नाकारतोय तो..”

“काय? तुला कसं समजलं??”

“तो ज्या मित्राकडे राहायला गेलाय ना, तो मंगलाच्या
होणाऱ्या नवऱ्याचाही मित्र…त्याने सांगितलं…”

हे ऐकून श्रीधरचा संताप झाला, तो स्वतःलाच कोसू लागला…

प्रभा हे सगळं ऐकत होती, मोहन आणि श्रीधर मध्ये का वाद होता हे फक्त प्रभाला समजलं…इतकं मोठं गुपित मोहन श्वेतापासून लपवून होता…आणि आपल्या बहिणी सोबत अन्याय झाला म्हणून तो काळजीत होता..

****

तिकडे केदार मायरा च्या घरीच थांबलेला असतो..

“केदार, तू आता जा इथून..माझे आई बाबा येतील, त्यांना समजलं तर..”

“समजू दे ना, आपण लग्न करू लवकरच..”

“पण विवाहित पुरुषाशी लग्न करायला ते ऐकणार नाहीत .”

“मग??”

“मग मला त्यांच्या आज्ञेनुसार वागावं लागेल..”

“वेडबिड लागलं की काय? तुझ्यासाठी मी माझी बायको, आई वडील सोडून आलो, आणि तुझं अजून पक्क नाही??”

“चिल यार…लग्न झालं तर चांगलच आहे, नाहीतर move on..”

“माझ्या घरच्यांनी मला घराबाहेर काढलंय, तुझ्याशिवाय आता मला घरही नाही ..”

“तेवढं कर तू ऍडजस्ट आता..”

सकाळचे 11 वाजले तरी केदारला चहा नाश्ता तिने विचारला नाही, मायरा सकाळीच मैत्रिणींसोबत hangout करून बाहेरूनच खाऊन आलेली, केदारला श्वेताची आठवण झाली…सकाळी अंघोळ करून बाहेर यायचो ते नाश्त्याच्या सुगंध नाकात साठवतच… गेल्या कित्येक दिवसात भूक कशी असते हेच त्याला माहित नव्हतं, कारण भूक लागायच्या आधीच श्वेता समोर गरमागरम नाश्ता तयार ठेवी…मायरा सोबत बाहेरचं खाऊन त्याला त्रास सुरू झालेला..बाह्यसुख सगळं अनुभवून झालेलं पण जे सात्विक सुख होतं, जे श्वेतासोबत संसार करताना मिळत होतं त्याची पोकळी त्याला आज जाणवत होती. कसाबसा एका मित्राला फोन करून त्याच्या घरी राहण्याची सोय त्याने करून घेतली…
****

दुसऱ्या दिवशी काका काकू अंगणातल्या एकेक बायकांना उठवत होते, कुणी अंगणातच झोपून गेलेल्या, कुणी झाडाला साडी बांधून त्यात झोपलेल्या तर कुणी गायींच्या गोठ्यात…

गाईंनी सकाळी सकाळी गोमूत्राने बायकांच्या चेहऱ्यावर अभिषेक केला तश्या त्या जाग्या झाल्या..एकेक करून सर्व बायका जाग्या झाल्या…डोकं जड पडलं होतं सर्वांचं, रात्री काय झालं कुणालाही आठवत नव्हतं, नवरे आपापल्या बायकांना पकडून घरी नेऊ लागले, जाताना जरा घाबरतच चालत होते…कारण बायकोचा रुद्रावतार त्यांनी कालच पाहिलेला..

क्रमशः

3 thoughts on “सूनबाईचा मित्र (भाग 8)”

Leave a Comment