सूनबाईचा मित्र (भाग 7)

 

“कशी वाटते म्हणजे??”

“म्हणजे…तू बालपणीचा मित्र ना तिचा?? मैत्रीण म्हणून कशी आहे असं विचारतेय..”

“श्वेता…लहानपणी आम्ही कायम एकत्र असायचो, सोबतच खेळणं, खाणं, पिणं… ती लग्न करून गेली अन मी एकटा पडलो…श्वेता म्हणजे माझी प्रेरणा होती..कायम माझ्या पाठीशी उभी असायची. श्वेताला समजणं फार कठीण नव्हतं, अगदी नितळ मनाची, कोरं पुस्तक जसं असतं ना तशी होती, दुसऱ्याला आनंद देणच तिच्या लेखी असायचं..”

“खूप छान ओळखतोस श्वेताला..”

“सॉरी..म्हणजे मी जरा जास्तच बोललो…फक्त एक मैत्रीण म्हणून..”

“अरे नाही..मी शंका घेणाऱ्यातली नाही, बरीच आधुनिक विचारांची आहे…माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोल..अन मला एक सांग, या ठिकाणी चंद्राकडे असा काय बघत बसलाय??”

“श्वेता आणि माझं एक गुपित आहे…तुम्हाला सांगतो फक्त..”

“काय सांग सांग..”

“आम्ही कायम आमच्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो, वयात आलो तशी आम्ही थोडं लांब राहू लागलो, कारण गावात लहानपणी खेळणं वेगळं आणि तरुणपणात भेटणं वेगळं..पण तरीही एकमेकांच्या घरी आमची भेट होत असे, श्वेता त्यांचा मळा दाखवायला नेई, तेव्हा आमच्या गप्पा होत असत. आम्ही ठरवलं, एकमेकांना काही सांगायचं असेल, मन मोकळं करायचं असेल, तर त्या चंद्राशी बोलायचं…कारण तो एकमेव आहे जो तुलाही पाहतो अन मलाही…”

“How romantic..”

“नाही, म्हणजे मित्र म्हणूनच…” श्रीधर पुन्हा पुन्हा हे सांगत होता…

“तिचा लग्नासाठी विचार नाही केलास??”

श्रीधर अवाक होऊन बघतच राहिला, त्याला समजेना काय बोलावं..त्याने फक्त हसून उत्तर दिलं. प्रभाला जे समजायचं ते समजलं.

श्वेताच्या चुलतबहिणीला बघायला पाहुणे आले आणि लागलीच तिचं लग्न ठरलं.. श्वेताला आता अजून काही दिवस थांबणं भाग होतं, श्वेताचं एकत्र कुटुंब असल्याने काका, चुलत भावंड एकत्रच असायचे. प्रभाला तर गावाकडंच लग्न म्हणजे आयती पर्वणीच…हे लग्न म्हणजे शहरातल्या सारखं दुसऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन कामं करून घेणाऱ्यातलं नव्हतं, इथे गावातला प्रत्येकजण आपापलं योगदान देत असे. कुणी मंडप बांधे, कुणी जेवणाची सोय बघे, कुणी पंगतींकडे लक्ष घाले..

“श्वेता, श्रीधरला बोलवून घ्यावं म्हणते..त्याला सजावट खूप छान येते, लग्नात मदत होईल त्याची..”

“चालेल, बोलवूया…त्याचा नंबर देतेस??”

“कशाला?? दुसरी माणसं आहेत की बरीच..”
श्वेताचा चुलतभाऊ एकदम ओरडला…त्याचं आणि श्रीधरचं बऱ्याच वर्षांपासून वाकडं होतं, श्रीधर आणि मोहन एकाच शाळेत. श्रीधर पुढे निघून गेला, मोहन जास्त शिकला नाही..मनात ईर्षा निर्माण झाली असावी कदाचित… कुणी विचारायचं धाडसही केलं नाही…

“बरं दादा..तू म्हणशील तसं..”

मोहनने एकदम डोळ्यात पाणी आणून श्वेताच्या डोक्यावर हात ठेवला अन निघून गेला. या त्याच्या वागण्यामागे काहीतरी खूप मोठी गोष्ट होती, एक गुपित होतं.. श्वेताचं, श्रीधरचं आणि त्याचं…

मोहन म्हणजे चुलत नव्हे तर श्वेतासाठी सख्ख्या भावाहून जास्त, वडिलांची जागा भरून काढलेली त्याने…श्वेताच्या लग्नावेळी बऱ्याच घडामोडी झालेल्या, ज्या फक्त मोहनला माहीत होत्या…आणि त्याची सल त्याला आजही होतीच, पण श्वेताचा संसार सुरळीत पाहून त्याला काहीसा दिलासा मिळालेला…असो..

तर, मंगलाचं लग्न, प्रचंड उत्साह, धावपळ, तयारी..या सर्वात काहीतरी आगाऊपणा करणार नाही ती प्रभा कसली? मंगला साठी मुलाकडचे एकेक पाहुणे येत जात असायचे.

“संगीता, आज 5 जण येणारेत मुलाकडचे…त्यांना नाश्त्याला समोसे बनवू…2-2 पुरेसे आहेत प्रत्येकी..”

संगीता, मंगलाची आई आणि श्वेताची काकू…स्वयंपाकात अगदी सुगरण..बाहेरून काही मागवायची गरजच पडत नाही…

पाहुणे आले, संगीता एकेक समोसे ताटात वाढू लागली…चौथ्या माणसापर्यन्त दोन समोसे वाढून होताच पाचव्या माणसासाठी हाताशी समोसेच आले नाही, काकू घाबरली…आत पाहायला गेली, 10 समोसे केलेले..मग असं कसं झालं??

श्वेता सगळं बघत होती, चटकन प्रभाच्या खोलीत जाऊन पर्स मधून पेपर मध्ये गुंडालेले दोन समोसे घेऊन आली अन पाहुण्यांना वाढले..नंतर हळूच 2 समोसे बनवून परत पर्स मध्ये ठेऊन आली..

रात्रीच्या वेळी प्रभाने नवऱ्याला फोन केला..ती गच्चीत उभी होती..

“हॅलो..”

“हॅलो…मिस्टर.”

“अरेवा, आज कुठला मूड??”

“ऐका ना, टेरेस मध्ये जा ना..”

“मी बाहेर आलोय अगं..”

“मग पटकन घरी जा अन टेरेस मध्ये जा..”

“बरं..गेलो की फोन करतो..”

थोड्या वेळाने..

“पोचलो..आता बोल..”

“तुम्हाला माझी आठवण नाही येत??”

“हे विचारायला फोन केला?? आणि या वयात काय हे..”

“सांगा ना..”

“येते आठवण..”

“मग एक काम करा…आकाशातल्या चंद्राकडे बघा..त्याच्याकडे बघून माझी आठवण काढा..तो चंद्र म्हणजे मीच आहे असं समजून त्याच्याशी गप्पा मारा..”

“हे काय भलतंच..”

“सांगितलं तेवढं करा..”

“बरं….2 मिनिट थांब…हं..बोललो..आता तू बोल त्याच्याशी..”

“बरं थांबा मी जरा गच्चीत जाते..अगं बाई, चंद्र कुठे गेला??”

“काय गं, तुला बघुन घाबरला वाटतं..”

“तुम्हाला कसाकाय दिसला??”

“इकडे पुण्यात तर दिसतोय..बहुतेक तिकडे उगवला नसावा..”

“असेल..”

“असेल काय असेल…अमावस्या आहे आज..ठेव फोन..”

प्रभा जीभ चावत स्वतःच्या ‘ढ’ पणासाठी डोक्यावर हात मारून घेते..मागून हसायचा आवाज येतो, श्रीधर आलेला असतो..

“श्रीधर मला एक सांग, अमावास्येला तुम्ही कसे बोलायचे एकमेकांशी??”

“अमावस्येला आम्ही मौन असायचो..”

“अरे मग मला आधीच सांगायचं ना..”

“का?? काही प्रॉब्लेम झाला का??”

“आं?? नाही..काही नाही..”

“बरं ते जाऊद्या, खाली या..”

“एक मिनिट, मोहनने तुला यायला मनाई केलेली, तू कसा आलास??”

“मित्र आहे माझा, जास्त दिवस रागावणार नाही माझ्यावर..”

“बरं.. कुठे जायचंय आणि काय कार्यक्रम आहे??”

“इथे लग्नावेळी 2 दिवस आधी एक कार्यक्रम केला जातो..बायका इथे अंगणात आणि माणसं तिकडे शेतात जमतात..”

“एकत्र का नाही जमत??”

श्रीधर फक्त हसतो..प्रभाला समजतं…

प्रभा मोहनला शोधायला जाते..तो फ्रिजमधून काही बॉक्स काढून गाडीत ठेवत असतो..

“आ..आई गं..”

“आत्या, काय झालं??”

“पाय मुरगळला रे…zandu बाम आन पटकन..”

“हो हो आणतो..”

मोहन जाताच प्रभा त्या बॉक्स मधल्या बाटल्यांमधली दारू एका मोठ्या भांड्यात ओतते..बायकांसाठी बनवत असलेलं कोकम सरबत बाटल्यांमध्ये भरते…एवढ्या गर्दीत झंडू बाम शोधायला मोहनला वेळ लागेलच हे ओळखून प्रभा असला आगाऊपणा करते..

कार्यक्रम सुरू होतो…बायका सरबत पितात…हळूहळू पेंगु लागतात, काही अचानक उठून नाचायला लागतात..काहीजण शेजारी बसलेल्या सासूला जाम शिव्या घालू लागतात, काहीजणी नागीण डान्स सुरू करतात..एकंदरीत वातावरण तंग होऊन जातं…तिकडे माणसं दारू म्हणून कोकम सरबत पितात, चव कळताच मोहनला जाम शिव्या पडतात…पण दारू गेली कुठे??? सर्वजण ते शोधायला अंगणात येतात…येऊन पाहतो तर काय, तांडव सुरू असतो..

क्रमशः

 
 

2 thoughts on “सूनबाईचा मित्र (भाग 7)”

Leave a Comment