सूनबाईचा मित्र (भाग 3)

श्वेताची सकाळपासून धावपळ सुरू होती, माहेरी जायचं पण इथे सर्वांची सोय तिने करून दिलेली,

“बाबा, मी चिवडा, शंकरपाळे वर काढून ठेवलेत..नाश्त्याला लागले तर वरतीच दिसतील..आणि काकतकर काकूंना डबा सांगितलं आहे 2 वेळचा. बाहेरून काही मागवू नका. “

प्रभा तर केव्हाच तयार होऊन बसलेली, गावाकडची बोरं तिच्या डोळ्यासमोर येत होती. श्वेताची घराबाबत काळजी बघून प्रभाला खूप कौतुक वाटलं तिचं, पण कालच केदारशी झालेलं बोलणं तिला आठवलं अन श्वेताबद्दल काळजी वाटू लागली..गावाहून आलो की बघू त्याच्याकडे असं प्रभा ठरवते..

दोघीजणी टॅक्सीत बसतात, सासरेबुवा दोघींना निरोप देतात. श्वेताच्या मनात एकीकडे माहेरी जायचा आनंद अन दुसरीकडे प्रभाचं टेन्शन…एक तर गावी असला आगाऊपणा आणि तेही बाईच्या जातीने केलेला चालत नाही.

“हॅलो श्वेता, कुठपर्यंत आले?? आम्ही वाट बघतोय.”

“आबा इथे गावातच आहोत, मळ्यात यायला 20 मिनिटं लागतील..”

(एक तासाने)

“श्वेता एक तास झाला , कुठे आहात??”

श्वेता डोक्याला हात लावून खुर्चीवर बसलेली असते..समोर प्रभा उसाचा रस काढायच्या मशीनवर लाकडाचा तो दांडा गोल फिरवत असते..

“आई बस आता, निघायचं का?”

“थांब गं, असा अनुभव शहरात कुठे..”

उसाचा रस प्यायला थांबले असता प्रभाच्या डोक्यात ते खूळ घुसतं.. मग काय, टॅक्सी थांबवून तासभर हा खेळ चालतो…

प्रभा दमते अन टॅक्सीत येऊन बसते, श्वेता अन टॅक्सीवाला सुटकेचा निश्वास टाकतात अन दोघीजणी गावी पोचतात…

श्वेताचं गाव म्हणजे हिरव्या वनराईने नटलेले खेडे. गहू, बाजरी अशी पिकं, चिंचा, बोरं, जांभूळ अशी मोठमोठी झाडं, दुधदुभती जनावरं, शेतीच्या मध्यावर असलेले टुमदार घर, शेणाने सारवलेलं अंगण…

श्वेता आणि प्रभा गाडीतून उतरतात, श्वेताचे आई, वडील, काका, काकू स्वागताला उभेच असतात. काकांचा मोठा मुलगा प्रभा अन श्वेताच्या बॅग हातात घेतो, मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत होतं..

दोन पावलं चालत नाही तोच प्रभाची नजर समोर गायीचं दूध काढत असलेल्या शिरप्यावर पडते.. त्या तिथेच थांबतात. श्वेताच्या लक्षात येतं, अरे देवा, आता हे खूळ डोक्यात जायला नको म्हणजे झालं…
ती विषय बदलते, “आई तुम्हाला बोरं वेचायची का??”
प्रभा तिच्या बोलण्यात अडकते, तोच शिरप्या म्हणतो…

“या या ताई, तुमची फार आठवण यायची या वाड्याला…लहानपणी मी गायीचं दूध काढायचो तेव्हा कश्या शेजारी येऊन बसायच्या..मला नेहमी आठवण यायची..”

शिरप्याकडे बघून श्वेताला हसावं की रडावं कळत नव्हतं.. प्रभा पटकन त्याच्याजवळ जाऊन बसली, शिरप्या घाबरलाच..श्वेताचे आई वडील एकमेकांकडे पाहू लागले..

“आई बाबा, चला ना वाड्यात..आई तुम्ही या हा लवकर..”

“श्वेता बळजबरीने सर्वांना आत नेते..”

आता शिरप्या अन ती भोळीभाबडी गाय प्रभाच्या ताब्यात सापडलेली असते..

“ए तू काय करतोय..”

“ताईसाहेब नोकर माणूस मी..गायीचं दूध काढतोय..”

“मला शिकव की..”

प्रभाच्या या प्रश्नाने शिरप्या गोंधळलाच..

“घाबरू नको…काही होत नाही, सरक…मी करते..”

“नको ताई नको नको..”

“तू सरक रे..”

शिरप्याला बाजूला करून प्रभा दूध काढायला घेते..तिच्या हाताला गुदगुल्या होत होत्या…फार मजा वाटत होती प्रभाला.. पण गायीला हा स्पर्श वेगळा वाटला…तिने धाडदिशी लाथ मारली अन प्रभा धक्का लागून बाजूला पडली…शिरप्या घामेघूम झाला..

आत श्वेताला विचारत होते,

“सासूबाई का थांबल्या बाहेर? कसला राग आलाय का त्यांना?? काही कमी जास्त झालं का आमच्याकडून?? तसं असेल तर सांग..”

“अगं गायीचं दूध कसं काढावं हे त्या शिरप्याला सांगताय त्या..बाकी काही नाही.”

श्वेताने असं सांगत वेळ मारून नेली..

प्रभा जशी बाजूला पडली तसा शेजारचा पिंट्या जोरजोराने हसायला लागला. पिंट्या हा श्वेताच्या घराशेजारी राहणारा लहान मुलगा..लहानपणापासून श्वेताच्या अंगाखांद्यावर वाढलेला..श्वेताचं लग्न झालं तेव्हा बिदाईच्या वेळी त्याला लपवून ठेवलं होतं, कारण आपली ताई जाणार हे त्याला सहनच होणार नव्हतं, ती गेल्यावर त्याला कसं सांभाळलं हे त्याच्या आई वडिलांनाच माहीत.त्याच्या आजीने त्याला समजावलं होतं, “तुझ्या ताईला तिची सासू घेऊन गेली काम करायला..”

तेव्हापासून ताईची सासू पिंट्याच्या आयुष्यातील व्हिलन बनली होती..ती जेव्हा समोर येईल तेव्हा तिला धडा शिकवायचा असं त्याचं ध्येय होतं…

पिंट्याला हसताना पाहून प्रभाला फार अपमान वाटला,

“ए पोरा. काय हसतोय..”

“कशी पडलीस तू..”

“ए..काकू म्हण, ताईच्या सासूबाईं आहेत त्या..”

पिंट्याचे डोळे एकदम लाल झाले, त्वेषाने तो प्रभाच्या जवळ आला..

प्रभा घाबरलीच..

“ए..हे बघ…माझ्याकडे मोठी बंदूक आहे…मारिन हं तुला..”

पिंट्या बाजूला जातो अन मोठी कुऱ्हाड घेऊन येतो..

“काढ तुझी बंदूक..”

प्रभा या पिंट्यासमोर हतबल झाली..तिने पटकन नजर चुकवत घराकडे धाव घेतली..

“विहिनबाई.. या या, फार दमलेल्या दिसताय..तुम्ही हात पाय धुवा मी चहा टाकते..”

प्रभा फ्रेश होऊन बाहेर येते, आजूबाजूला कुणी नाही बघत श्वेता त्यांना सांगते…

“आई..इथे प्लिज काही खोड्या करू नका.”

“नको टेन्शन घेऊ..मी एकदम शहाणी वागणार..मला फक्त सांग, आपल्याकडे कुऱ्हाडी आहेत का..”

“कशाला??”

“तू सांग फक्त .”

“हो ते शिरप्याला माहीत असेल.”

प्रभा शिरप्याला पकडते…त्याच्याकडून 2 कुऱ्हाडी घेते…पिंट्याला आवाज देते..प्रभा पिंट्यासमोर 2 कुऱ्हाडी घेऊन उभी राहते…पिंट्या आत जातो, 3 कुऱ्हाडी अन एक कोयता घेऊन येतो..दोघेही समोरासमोर एकमेकाला खुन्नस देत उभे असतात..

दोघांकडे एव्हाना बरीच हत्यारं जमलेली असतात, इतक्यात श्वेताचे बाबा बाहेरून येतात..सासूबाईंच्या हातात हे सगळं पाहून ते विचारतात..

“ताई काय हे??”

तेवढ्यात श्वेता आतून येते.

“काही नाही बाबा, आईंना कामाची सवय, रिकामं बसून राहायला त्यांना आवडतच नाही…आता म्हणे शेतात जाते जरा कामं करायला..त्यासाठी हे सगळं घेऊन बसल्या. “

संध्याकाळी सर्वजण जेवायला बसले..पिंट्या श्वेताच्या मांडीवरच बसून होता..प्रभा आणि त्याची नजरानजर होत होती.

“पिंट्या, ताईला जेवू दे नीट..इकडे ये बरं..” त्याची आई त्याला रागवत होती..तिने स्वतः येऊन पिंट्याला ओढून नेलं..पिंट्याचा अपमान झाला, हे बघत प्रभा त्याला हसायला लागली..आणि मुद्दाम अजून श्वेताजवळ सरकून बसली..पिंट्या इकडे नुसता धुसफूसत होता..

जेवताना श्वेताची आई म्हणाली

“पोरीला अगदी फुलासारखं जपलं हो तुम्ही, कधी काही तक्रार केली नाहीत..”

“हो ना आई, मला वाटतच नाही मी सासरी आहे..खूप जीव लावतात सगळे मला..”

“आणि केदार कसे आहेत?? ते तर जीव लावतच असतील..

या प्रश्नाला श्वेता काहीशी हळवी झाली, प्रभाच्या नजरेतून ते काही सुटलं नाही…

रात्रीच्या वेळी प्रभा अंगणात खुर्ची टाकून बसलेली असतानाच पिंट्या प्रभासमोर बोरांची ओंजळ धरून उभा राहतो..यात काही कारस्थान तर नाही ना या शंकेने प्रभा संशयित नजरेने त्याच्याकडे बघते..

“काकू, तू माझ्या ताईला त्रास देत नाही ना, म्हणून हे..”

“मी कशाला त्रास देऊ तुझ्या ताईला??”

“आजी म्हणत होती, ताईला खूप सासुरवास असेल म्हणून..”

“बरं.. मग आता बट्टी ना आपली??”

“नाही, त्यासाठी तुला आमच्या टीम मध्ये यावं लागेल…”

“कुठली टीम??”

“आमची एक टीम आहे, गावातल्या सर्व मुला मुलींची..आम्ही वेगवेगळे उद्योग करत असतो.”

“जसे की??”

“पेरूच्या बागेत जाऊन पेरू तोडणे, झाडावर चढून कैऱ्या पाडणे, दिवाळीत दुसऱ्याच्या दारापुढे फटाका लावून पळून जाणे, शेळ्या बकऱ्यांच्या मागे फिरणे..”

प्रभाच्या डोळ्यात वेगळीच चमक आली, त्यासाठी ती गावात आलेली ते तर या पिंट्याकडे होतं..

“आमच्या बॉस ला पण भेटवतो..”

“कोण आहे तुमचा बॉस??”

“श्रीधर दादा..”

“श्रीधर दादा??”

“हो..”

क्रमशः

1 thought on “सूनबाईचा मित्र (भाग 3)”

Leave a Comment