सूनबाईचा मित्र (भाग 2)

सकाळचे 11 वाजले तरी सासूबाई उठल्या नव्हत्या, श्वेताला काळजी वाटू लागली, तिने केदारला सांगितलं, पण मला आज मिटिंग आहे म्हणत त्याने घाईतघाईत घर सोडलं…श्वेता त्यांच्या खोलीत गेली..

“सासूबाई… ओ सासूबाईं…”

तरीही सासूबाईंचा काही प्रतिसाद नाही, श्वेता अजून घाबरली, तिने सासऱ्यांना सांगितलं, ते म्हणाले..

“काल सकाळी 6 पर्यन्त मिर्झापुर सिझन 2 पाहत होती, कशी उठणार ती?”

“मला वाटलं काय झालं सासूबाईंना..”

“काही होत नाही तिला इतक्यात..”

सुनबाई हसायला लागली,

“काय गं हसायला काय झालं.”.

“मी विचार करतेय, सासूबाई किती वेगळ्या आहेत….मला तर कधी कधी वाटतं मी सासू अन त्या सून आहेत…एरवी ठीक आहे, पण तुम्हाला त्यांच्या अश्या स्वभावाचा त्रास नाही झाला??”

“हे खरंय की ती वेगळी आहे, पण त्यामुळेच आमचा संसार सुखाचा झाला बघ, तिच्या बरोबरच्या बायका पहिल्या मी…सतत नवऱ्याकडे भुणभुण, कटकट, कुरकुर…पण हिचा आनंद मात्र छोट्या छोट्या गोष्टीत असायचा, एकदा अशी वेळ आलेली की सलग 4 दिवस आम्हाला वडापाव खायची वेळ आलेली, तेव्हा ही काय म्हणाली माहितीये? म्हणे, किती नशीबवान आहे मी, रोज रोज वडापाव ची पार्टी आपल्या घरात…शेवटी तिलाही काम सुरू करावं लागलं, तिने मुलांच्या शिकवण्या सुरू केल्या. बघता बघता 5 चे 30, 30 चे 100 आणि 300 मुलांपर्यंत संख्या वाढली…”

“बापरे, इतकं छान शिकवायच्या सासूबाई??”

“कसलं काय, मुलांना जमा करायची, 15 मिनिटं शिकवायची अन बाकीचा वेळ मुलांसोबत गोट्या खेळायची…का नाही येणार मुलं??”

“अरे देवा, पालकांना समजलं असतं तर?”

“नाही समजलं, कारण तिने अट टाकली होती, ज्याला जास्त मार्क्स त्याला जास्त गोट्या मिळणार, मग मुलं घरी जोमाने अभ्यास करायची, चांगले गुण आणायची…पालक खुश, आणि प्रभाही खुश..”

“किती आनंदाने संसार केला सासूबाईंनी…खरंच, हसत खेळत सगळ्या अडचणींवर मात केली…बरं त्यांना आता उठवते, खूप उशीर झालाय, मला मशीन ला कपडेही लावायचेत, सासूबाईंसाठी थांबलीये..”

“प्रभा…प्रभा म्हणायचं आजपासून..”

“आई तुम्ही उठल्या?”

“होय, अगं आपल्या वयात फारसा फरक नाही…. मला प्रभा म्हणत जा..”

“काहीही काय आई, तुमचा मान मोठा..अन कुणी ऐकलं तर?? “

“जर तू मला प्रभा म्हणाली नाहीस तर…तर…मी हे घर सोडून जाईल..”

“ऐक बाई तुझ्या सासुचं… नवीन खूळ घुसलंय आता..”

“बरं… प..प्र..प्रभा…तुम्हाला चहा करते..”

“प्रभा तुला चहा करते म्हण..”

“प्रभा तुला चहा करते..बस??”

“हा…आत्ता कसं..बरं केदार गेला काय ऑफिसला??”

“हो..”

“आज रविवार आहे, तरी??”

“काम आहे ऑफिसमध्ये असं म्हणाले..”

प्रभाला राग आला, श्वेता दिवसभर घरात राब राब राबते, अन या केदार ला सुट्टीचा एक दिवसही बायकोला बाहेर नेता येत नाही..?

“बरं आई, मी काय म्हणते, मला जरा माहेरी जायचं आहे..कधीही आई बाबांना भेटलेली नाहीये मी…तर..जाऊ का मी??”

“नाही..”

“का??”

“तू नीट विचारलं नाहीस..”

“ओह…बरं प्रभा, मी आई बाबांकडे जाऊ का??”

“परवानगी कशाला लागते आई बाबांना भेटायला?? जा खुशाल..”

“हो..फार आठवण येतेय मला गावाची, लहानपणी आम्ही या ऋतूत मस्त बोरं वेचायला जायचो, पारंब्यांना लटकून झोका घ्यायचो, आम्ही सगळ्या मैत्रिणी लंगडीपळी, तळ्यात मळ्यात खेळ खेळायचो.. फार मज्जा यायची..”

हे ऐकताच सासऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला..सूनबाईकडे “कशाला सांगितलंस” असा कटाक्ष टाकला..

“श्वेता खरंच तिकडे इतकी मज्जा करायचे??”

“हो..पण आता कुठे हे सगळं… आता नाही होत असं काही..”

“असं कसं, बोरं लागत नाही काय झाडाला..ऐक ना, मलाही यायचं तुझ्यासोबत..”

“प्रभा ती माहेरी जातेय, सासरपासून सुटका म्हणून, पण तुही तिच्या मागे गेलीस तर तिला कसलं माहेरपण अनुभवता येईल..”

“मी काही नाही करणार..मला येऊ दे श्वेता..प्लिज..”

आता काही खरं नव्हतं, प्रभा ऐकणाऱ्यातली नव्हती..लग्नात कसंबसं सासऱ्यांनी तिला कंट्रोल मध्ये ठेवलेलं..त्यामुळे प्रभाचा स्वभाव श्वेताच्या माहेरकडच्यांना फारसा परिचित नव्हता..आणि श्वेताला फोन केला तेव्हा श्वेताही खोटं सांगायची..

“सासूबाई देवपूजा करताय, सासूबाई पारायण करताय..”

प्रत्यक्षात सासूबाई खालच्या गार्डन मध्ये लहान मुलांसोबत क्रिकेट खेळायला अन नवीन मुव्हीज च्या DVD आणायला गेलेल्या असायच्या..

दुसऱ्या दिवशी निघायचं म्हणून सासूबाईंनी बॅग भरून ठेवली, सासरे अन श्वेता मात्र संकटात सापडले..

“बरं श्वेता, एक काम कर, प्रभाला मोबाईलवर एखादा मुव्ही लावून दे, म्हणजे दिवसभर बघत बसेल आणि बाकीचे उद्योग करणार नाही..”

“हा, ही आयडिया चांगली आहे..”

सासूबाई रात्री 1 पर्यन्त मुव्ही बघत बसतात, दरवाजाचा आवाज येतो, केदार आलेला असतो. त्याच्या तोंडातून नशेचा वास येत असतो,

“केदार..हे काय आहे..”

“सॉरी आई, आज ते जरा..”

“काय जरा..”

“तुला हेच शिकवलं आहे का मी?”

“सॉरी आई..”

“कितीदा सांगितलं, मलाही एक क्वार्टर आणत जा..आलास रिकाम्या हाताने..”

“आई..काय तू पण..”

“बरं बस, तुझ्याशी जरा बोलायचे आहे..”

“बोल..”

“श्वेता दिवसभर घरासाठी राबते, इतकी गुणी मुलगी आहे ती, पण तू बायको म्हणून तिला कुठे फिरायला नेत नाही की तिच्याशी नीट बोलत नाहीस..”

केदार नशेतच होता, तो बरळू लागला..

“आई काय बायको माझ्या गळ्यात बांधून दिलीस, मला शहरातली स्मार्ट मुलगी हवी होती ,ही इतकी टिपिकल, मला हिला कुठे घेऊन जायची ईच्छा होत नाही..”

“केदार…काय बरळतोय..”

केदारच्या तोंडून खरं बाहेर पडलं..

“केदार तुझी सहमती घेऊनच हे लग्न केलेलं ना? तुझी लग्नाला हरकत नव्हती म्हणून लग्न लावलं तुझं अन आता असं बोलतोय??”

“तेव्हा समजत नव्हतं आई मला..”

“अरे लग्न म्हणजे काही खेळ आहे का…आज पटलं, उद्या नाही…”

“आई नंतर बोलू यावर, मला झोप येतेय..”

असं म्हणत केदार निघून तर गेला, पण प्रभाला मात्र हुरहूर लागली..त्यांच्या लेकीसमान सुनेबद्दल त्यांना खूप वाईट वाटलं..

“उद्या बघू केदार कडे, अरे देवा..उद्या तर श्वेताच्या माहेरी जायचं आहे..तिकडून आलं की बघू यांच्याकडे…”

(गावी आता प्रभाची भेट कुणाशी होते, गावी सासूबाई काय काय उद्योग करतात, सूनबाईचा मित्र कोण असतो, वाचा पुढील भागात)

क्रमशः

1 thought on “सूनबाईचा मित्र (भाग 2)”

Leave a Comment