सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 9

 

श्रद्धा ला समजलं, मी माणूस कुठल्यातरी भीतीनेच अंधश्रद्धेकडे ओढला जातो… छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायला लागतो… आणि मग आधार घेतो या तंत्र मंत्राचा…

एके दिवशी सासूबाईंच्या माहेरची मंडळी घरी येतात. श्रद्धा ऑफिस ला गेलेली असते..त्यात सासूबाईंचा भाचा होता..रमेश….वयाने बराच मोठा होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फारच दीडशहाणा होता…त्याने लग्नात श्रद्धा चं वागणं पाहिलं होतं… त्याला ती जरा विचित्रच वाटलेली…

सासूबाईंनी श्रद्धा च्या सगळ्या करामती सांगितल्या तेव्हा इतरांना पटलं पण रमेशला ते खटकत होतं…ही मुलगी सर्वांना वेड्यात तर काढत नाहीये ना??

श्रद्धा ऑफिस मधून घरी येते…घरात इतके सगळे पाहुणे बघून तोंडातलं च्युइंगम पटकन थुकते..

“अरेवा… कधी आलात??”

“आत्ताच..”


सर्वजण श्रद्धा कडे मोठ्या आदराने पाहत असतात..कारण सासूबाईंनी सांगितल्या प्रमाणे ती एक “दैवी” मुलगी असते…

“काय मावशी…बरंय ना? साक्षी चं कसं चाललंय? शेवटच्या वर्षाला होती ना ती??”

“स्थळ आलं एक..मग म्हटलं पाहून लवकर उरकून घेऊ…शिक्षण करून काय करेल…स्थळ चांगलं आहे…मुलगा याच शहरातला आहे…म्हटलं चला जाऊन चौकशी करून येऊ..हा बघ मुलगा…”

श्रद्धा मुलाचा फोटो बघते…

“याला कुठेतरी पाहिलेलं दिसतंय…आठवत नाहीये पण..”

“निवांत आठव…आत्ताच आली आहेस ना..जा फ्रेश होऊन ये..”

दुसऱ्या दिवशी श्रद्धा ऑफिस ला जायला निघते…रस्त्यावरच एक कॉलेज लागायचं…आज तिथे काही टवाळकी मुलं मुलींची छेड काढत होती…. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर कमेंट करणं…त्यांच्यावर गाणी म्हणणं असे उद्योग चालले होते…श्रद्धा त्यांचासमोरूनच गाडीवरून जात होती…

“ओ मेरी मेहबुबा..”

मुलांमधून एक आवाज आला….हा तोच, साक्षी साठी जो फोटो दाखवला होता तो…

श्रद्धा कचकन ब्रेक दाबते…एक पाय टेकवून गाडीला एकच झटका देते आणि गर्रकन गाडी गोलाकार घुमवत त्या मुलांकडे परत नेते…पर्स मध्ये हात घालून काहीतरी चुळबुळ करते…


“कुणाची मेहबुबा मी??”

“किसींकी भी चलेगी जानेमन…”

ते पोरं बोलली आणि श्रद्धा ने सनकन त्याचा थोबाडीत लगावली…
तो मुलगा चिडला आणि आसपासच्या आपल्या 5-6 मित्रांना हाक देऊन बोलावून घेतलं…

श्रद्धा समोर 7-8 मुलं होती…आणि श्रद्धा एकटीच…

“आता तू गेलीस….”

मुलं तिच्यावर हल्ला करतात…पण जोपण तिच्या जवळ जायचा तो कळवळत लांब पाळायचा….श्रद्धा फक्त त्यांना हलकासा ठोसा मारायची…

सगळी मुलं श्रद्धा ला मारायला धावली पण एकालाही श्रद्धा च्या अंगावर एक ओरखडा सुद्धा मारता आला नाही…

सगळी मुलं जखमी झालीत हे पाहून श्रद्धा ने आपल्या मुठीतल्या बोटात अडकवलेल्या टाचण पिना काढल्या अन परत पर्स मध्ये ठेऊन दिल्या…

“पुन्हा जर इथे कुणाची छेड काढताना दिसलात तर याद राखा….”.

ती मुलं लांब पाळली…आणि गर्दी फक्त बघतच राहिली…

“तो मुलगा साक्षी साठी चांगला नाहीये…”

श्रद्धा ने घरी येऊन सर्व हकीकत सांगितली…

“बरं झालं वेळीच कळलं..”

“कळणार नाही तर काय…माझ्या सुनेला सगळं दिसतं…”

“सांग बाई आता…साक्षी साठी कसा अन कुठे मुलगा बघू??”

श्रद्धा च्या लक्षात आलं…साक्षी हुशार असूनही तिचं शिक्षण पूर्ण न करता तिच्या लग्नाची घाई चाललीये…

“ओम ह्रिम हट ढी की नं स्वाहा…” श्रद्धा डोळे मिटून पुटपुटते…

“अं???”

“शांत बसा…तिला दैवी संदेश येतोय…शांत बसा…”

“अपराध…. घोर अपराध…घोर अपराध घडलाय तुमच्या हातून…”

“कसला अपराध??”

“तुम्ही नवस केला होता अन आता विसरला..आता एकच उपाय… साक्षी ला पुढील 1 वर्ष जवळ ठेवायचं आणि पुढील 2 वर्ष शहरात..तेही बिनलग्नाचं….ग्रामदैवत आणि शहरातील दैवत असं दोघांना प्रसन्न केलं की सगळी पापं धुतली जातील…”

गावाकडची लोकं चालू चालू नवस करतात हे तिला माहीत होतं…त्यातलाच एखादा सुटला असेल असं साक्षी च्या आईला वाटलं…

“तू म्हणशील तसं करू…”

वर्षभर जवळ ठेवायचं म्हणजे तिला शिक्षण पूर्ण करता येईल…आणि पुढील 2 वर्ष शहरात म्हणजे तिला नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असा तिचा हेतू होता…

रमेश लांबून हे सगळं पाहत होता…त्याला श्रद्धा वर दाट संशय आलेला…

“हे सगळं कसं माहीत तुला?? कुठे शिक्षण घेतलंय तू??”

रमेश तिला विचारतो…श्रद्धा त्याला बाजूला घेऊन जाते…आणि काहीतरी सांगते….

परत येताच रमेश म्हणतो..

“ही मुलगी साक्षात लक्ष्मी…दैवी…अगाध…अगम्य आहे….तू सांगशील तेच आम्ही यापूढे करणार..”

श्रद्धा ने असं काय सांगितलं असेल रमेश ला???

क्रमशः

Leave a Comment