रोज संध्याकाळी श्रद्धा एका बॉक्स मधून पैसे मोजत असायची…सुरवातीला केतन ने दुर्लक्ष केलं…पण त्याला आता वाटू लागलं की ही रोज इतके पैसे कुठून आणते?
“श्रद्धा…काय प्रकार आहे हा??”
“लोकं आपली पापं धुताय..”
“म्हणजे??”
“सोड रे…नको लोड घेऊ तू…”
केतन ने मात्र या गोष्टीची धास्ती घेतली…दरवेळी तो ऑफिस मधून उशिरा घरी यायचा. त्या आधीच सासूबाई आणि श्रध्दा सत्संगाचा कार्यक्रम उरकून घेत असत.
एक दिवशी केतन लवकर घरी आला..या बायकांचा सत्संग सुरू होता…तो लपून बसला..आणि काय प्रकार आहे ते पाहू लागला..
“तर…अशा प्रकारे समिधा बाईंनी सुनेची पूजा चालू केली अन घरात धनवर्षाव झाला…”
सर्वजण टाळ्या वाजवतात… दिशा एक बॉक्स त्यांचामसोर ठेवते…नेहमीप्रमाणे..
“तर…तुम्हाला तर माहितीये की मी अनासक्त आहे…पण तुमच्या माथी पाप लागायला नको म्हणून ही पेटी… फुकटचे ज्ञान घेणे हे सर्वात मोठं पाप..ते तुमच्या पदरी मला पाडायचं नाही…म्हणून आपापल्या परीने दक्षिणा इथे टाकत जायची…”
“ताई नक्की किती टाकू? अकरा रुपये की एकवीस…”
“आ गये ना अपनी औकात पे…”
“औकात?? काय म्हणालात??”
“औकात?? तुम्ही काय ऐकलं…चौकात म्हणाले मी…त्या पलीकडच्या चौकात मंदिर आहे तिथे जाऊन नारळ फोडा आज सर्वांनी….आणि हो, देवाचा आदेश लक्षात असू द्या…जितकी दक्षिणा तितकी पापं धुतली जातील…11 रुपयाला 11 पापं…21 रुपयाला 21 पापं..”
“हॅय… असं कधी असतं का..”
एक बाई शंका घेते..
“माझ्यावर शंका??? जा…तुम्हाला तुमचा नवरा आज घालून पाडून बोलेल…श्राप आहे माझा…”
बायका गपचूप चळतीच्या चळती पेटित टाकत होत्या…काय करणार, पापक्षालन करायचं होतं ना त्यांना…आणि स्वस्तात करता येत होतं…एक रुपयाला एक पाप…
बायका निघून जात होत्या…त्या तोंड उचकटलेल्या बाईला श्रद्धा ने बसवून ठेवलं…बोलण्यात तिला अडकवलं… आणि मग घरी जाऊ दिलं…
केतन हे सर्व पाहतो…अन कपाळावर हात मारून घेतो..
दुसऱ्या दिवशी ती बाई रडत कुढत श्रद्धा कडे…
“पोरी माफ कर ग…तुझा श्राप खरा ठरला…तू खरंच अंतर्यामी आहेस…माझा नवरा मला काल खूप बोलला..”
“घरी उशिरा गेल्यावर बोलणार नाही तर काय…काल उगाच नाही तुला बोलण्यात गुंतवून ठेवलं..बात करती है…” श्रद्धा मनाशीच पुटपुटली. .
केतन श्रद्धा ला म्हणतो..
“लोकांना तू फसवतेय असं नाही वाटत तुला? त्यांच्या अंधभक्तीचा फायदा घेत आहेस तू…”
“टेन्शन नको… हे पैसे त्यांनाच परत मिळणार…त्यांच्या भल्यासाठीच करतेय सगळं..”
“AS you wish…”
केतन हसून खोलीतून निघून जातो…
श्रद्धा ला आईचा फोन येतो..
“ए गधडे”
“सासूबाई…आई मला गधडी म्हणाली..”
“ए गप…गप…मला तुझ्या सासूचा धाक दाखवतेस…त्यांना खरं माहीत नाहीये म्हणून, सगळं एकदा समजलं ना की मग बघ तुझे कसे हाल होतील… व्हयलाच पाहिजे…इथे आम्हाला गुंडाळलं… आणि आता तिथे सासूला….चांगला सासुरवास मिळो तुला…”
“काय आई आहे…पोरीला सासुरवास मिळावा म्हणून साकडं घालतीये…”
“हे बघ बाळ…आई म्हणून सांगते…तुझी सासू खूप प्रेमळ आहे..”
“अगं आई..मला माहितीये त्या खूप चांगल्या आहेत..पण त्यांच्या डोळ्यावरची पट्टी मला उतरावयची आहे…म्हणून हे सगळं करतेय मी..नाहीतर तुला माहितीये ना की मला हे असल्या गोष्टीचा किती राग आहे ते…”
श्रद्धा चं लक्ष समोरच्या आरशाकडे जातं…बघतो तर काय…सासूबाई उभ्या…त्यांनी ऐकलं का माझं बोलणं?? अरे देवा..आता वाट..आता कन्फर्म आपला वांदा होणार…
“झालं का गं बोलून? चल जेवायला, बोलवायला आलीये मी..”
“हुश्श…चला…सासूबाईंनी काही ऐकलं नाही…”
दुसऱ्या दिवशी सासूबाई नेहमीप्रमाणे श्रद्धा ने सांगितलेल्या सर्व गोष्टी करत असतात.. दारात एक लहान मुलगा भिक्षा मागायला येतो..त्याला पाहुन सासूबाईंना अचानक रडू फुटतं…
“सासूबाईंना काय झालं??”
केतन चटकन आईची समजूत घालायला जातो…श्रद्धा ला कळेना हा काय प्रकार चाललाय..
केतन खोलीत आल्यावर..
“केतन काय झालं? आई अश्या अचानक त्या मुलाला पाहून??”
“तुला एक गोष्ट सांगायची राहिली…आईला दोन भाऊ होते, एक हा सर मामा आणि दुसरा लहान भाऊ होता. एके दिवशी अचानक तो घरातुन गायब झाला…खूप शोध घेऊन सापडेना…एक तर आई नव्हती आणि त्यात एक भाऊ गेल्याने आईला धक्का बसला…गावातल्या एकाने सांगितलं की घरावर कुणीतरी करणी केलीये…आणि त्या दिवसापासून आई खूप घाबरायला लागली अन अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढली गेली..”
“भाऊ असा कसा गायब झाला?”
“माहीत नाही गं…”
“आपण शोधुया त्यांना…”
“खूप शोधलं… सगळं व्यर्थ..”
क्रमशः