सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 4

 

लग्नाची तयारी सुरू होते…जेवणाचा मेनू ठरतो…श्रद्धा चे वडील ऍडव्हान्स देऊन मोकळे होतात…

“ओ थांबा…कुठे चाललात? लग्न माझं आहे…सरका बाजूला…हं… तर काय काय देणार तुम्ही??”

“भात, वरण, दोन भाज्या, कोशिंबीर, पापड..”

“एव्हढ्याचे 70 हजार रुपये??”

“हो म्हणजे तेवढी क्राऊड पण आहे ना..”

“ताट मोजायला कोण आहे?”

“आम्हीच मोजतो…”

“बरं….”


“अर्धे पैसे लग्नानंतर घेऊन जा…”

“हो तसंच ठरलंय..”

केटरर्स निघून जातात…

“श्रद्धा…”

आतून आवाज येतो….आई मोठ्याने ओरडते…

“काय गं आई ओरडतेय का??”

“अगं… तू सासरी जातेय की काळी जादू शिकायला?? हे काय भरलंय बॅग मध्ये? लिंबू, ही कसली रक्षा, ती पांढरी पावडर, हे दोरे, सुपाऱ्या…”.

“ठेव ते…माझ्या बॅगेला हात लावू नकोस…”

“अगं ए…”

श्रद्धा बॅग उचलून दुसरीकडे ठेऊन देते…

लग्नाची लगबग सुरू असते…

श्रद्धा च्या मनात अचानक काय येतं कुणास ठाऊक…गाडी काढून तडक केतन च्या घरी….

“श्रद्धा?? ये ये…कशी चालुये तयारी?? अगं लग्नाआधी सासरी जायचं नसतं म्हणे…”

“हो…माहीत आहे..पण काय करणार…मला काल स्वप्न पडलं… देवाने स्वप्नात येऊन सांगितलं की तुझ्या नव्या घरात जाऊन सासूबाईंना मी जे सांगतोय ते सांग..”

“खरंच देवाचा हात आहे गं पोरी तुझ्यावर..काय म्हणाला देव?”


“देव म्हणाला की कन्यादान सर्वात श्रेष्ठ दान आहे…तो जे करेल त्याला सर्व पापातून मुक्ती मिळेल..”

“मला मुलगी असती तर केलं असतं गं मीही..”

“तेच तर…देवाला तुमची दया आली…देव म्हणाला…तुम्हीही कन्यादानात अर्धा अर्धा वाटा केला तर तुमच्या पदरात पुण्य पडेल….”

एवढं बोलून श्रद्धा निघून जाते…

सासू विचारात पडते…

“देवाने श्रध्दाच्या स्वप्नात येऊन मला संकेत दिलाय…पण काय करावं नेमकं??”

श्रद्धा घरी जाते…गेल्या गेल्या श्रद्धा ची आई…

“श्रद्धे….सासूबाईंकडे काय बरळून आलीस गं??? त्यांचा फोन आला होता..”

“लग्नाचा अर्धा खर्च ते करणारेत ना??”

“तुला कसं कळलं? काय बोलून आलीस तू?”

“ही ही हा हा..”


“अगं सासरच्या लोकांना तरी सोड….”

अखेर श्रद्धा आणि केतन चं लग्न होतं…

कितीही म्हटलं तरी आता घर बदलणार…माहेर सुटणार…नवीन घर…नव्याची नवलाई…नवीन लोकं… ते फुलणं… बहरनं…..नव्या नवरीचं भांबावून जाणं… हे सगळं…श्रद्धा च्या बाबतीत झालं?? घंटा…

लग्नाच्या दिवशी…

“त्या खुर्च्या नीट मांडा रे…ओ भटजी…जास्त तानायचं नाही …आणि इज्जतीत वेळेवर लग्न लावायचं….केतन आणि त्याच्या पंटर लोकांनी वेळ लावला तर सरळ एकेकाला उचलायचं आणि त्या वऱ्हाडाच्या बस मध्ये कोंबायचं….”

लग्न मंडपातले सर्व कारागीर श्रद्धा ची धास्ती घेतात…

“कोण आहे रे ही? नवरीची बहीण की चुलती??”

“नवरी आहे ती…”

“ही??????????”

“हो…ज्याच्याशी लग्न करेल त्याचं कल्याण…हे हे हे…”

“श्रद्धा…अगं ते काम बाबांचं…ते कुठे आहेत…?”

“त्यांना सलून मध्ये पाठवलंय… मस्त फेशियल करून या म्हटलं..”

“कपाळ माझं….बाप पार्लर मध्ये आणि नवरी मंडपात धावपळ करतेय…चल लवकर मेकअप ला..”

श्रद्धा मेकअप ला जाते..

“पांचटपणा करायचा नाही…एकच गोष्ट चार चार वेळा फासायची नाही…समजलं??”

अखेर श्रद्धा तयार होऊन लग्नमंडपात पोचते…मंगलाष्टक होतात… माळा टाकायच्या वेळी केतन चा एक आगाऊ भाऊ केतन ला उचलून घेतो…श्रद्धा चिडते… त्या भावाजवळ जाते…

“केतन वर आहे…तू खाली आहे…ते तुझ्याच गळ्यात माळ टाकते…”

भाऊ घाबरतो…सॉरी म्हणत केतन ला खाली ठेवतो….

“श्रद्धा आज आपलं लग्न आहे…आज तरी जरा..”

“बरं बरं…”

स्टेजवरील केतन चे काही नातेवाईक श्रद्धा चं हे वागणं बघून सासूला म्हणतात..

“अगं अशी कशी सून तुझी?? कशी वागतेय??”

“गप गं तू…तुला नाही माहीत…तिच्या स्वप्नात देव येतो…आणि हे असं ती नाही वागत…तिच्या अंगात देवी येते ती वागते…काही बोलू नकोस देवी ला…नाहीतर कोप होईल..”

सगळी पूजा, विधी आटोपतं… साग्रसंगीत वधूचं सासरी आगमन होतं….

पाहुणे मंडळी निघून जातात, आता खऱ्या अर्थाने श्रद्धा चा संसार चालू होतो…संसार कसला…येड्यांचा बाजार होता… अन श्रद्धा एकेकाला गुंडाळत होती…कशासाठी? चांगल्यासाठी…. तिचं केतन वर प्रेम तर होतंच… पण त्याच्या घरातल्या चुकीच्या गोष्टी, चुकीची विचारसरणी तिला बदलायची होती…

श्रद्धा ला नोकरीवर परतायचं होतं, पण त्या आधी सासूबाईंची परवानगी आणि इतर सर्व व्यवस्था लावायची होती..श्रद्धा ची बराच वेळ पूजा चालली…सासुबाई मनोमन सुखावल्या… अगदी माझ्यासारखी सून मिळाली म्हणून…

नंतर श्रद्धा हळूच सासूबाईंना म्हणते..

“आई…मी तुमचं दुःखं समजू शकते..”

“कसलं दुःखं??”

“किती केलंत तुम्ही घरासाठी… नातेवाईकांसाठी… पण कुणालाही किंमत नाही….सतत राबत राहिल्या दुसऱ्यांसाठी….पण नवरा असो वा मुलं…तुमची किंमतच नाही त्यांना…मी समजू शकते..”

प्रत्येक बाईचं दुखणं काय असतं हे माहीत होतं श्रद्धा ला..

सासूबाई डोळ्याला पदर लावून रडू लागल्या…

“पोरी…कुणी किंमत केली नाही गं.. पण तू समजून घेतलंस मला..”

“माझ्याकडे एक उपाय आहे…ज्याने तुमची सर्वजण किंमत करायला लागतील…”

“सांग सांग..”

“सकाळी सूर्य उगण्याच्या आत 8 मुठा तांदूळ घ्यायचे…ते गरम पाण्यात भिजत घालून एक मंत्र म्हणायचा…मग तेच कुकर मध्ये शिजवून तो प्रसाद सर्वांना खाऊ घालायचा…कुठलीही भाजी 7 नंतर चिरायची नाही… कणकेचा दिवा बनवून रोज तुळशीजवल ठेवायचा..आणि घरातल्या लोकांना उत्तर दिशेला पाठवावं….”

“नक्की करेन उद्यापासून..”

दुसऱ्या दिवशी सासूबाई सकाळी लवकर उठून तांदूळ धुवून कुकर मध्ये लावतात…भाजी चिरून ठेवतात…कणकेच्या दिव्यासाठी कणिक मळून ठेवतात…यात त्यांचं चांगलं मन रमतं आणि त्या वेळात इतर विचार मनात आणत नाहीत..

श्रद्धा सकाळी उठते… चिरलेल्या भाजीला फोडणी देते, मळलेल्या कणिक च्या पोळ्या बनवते…अर्ध्या तासात आवरून डबा घेऊन ऑफिस साठी तयार होते….

“कुठे चाललीस?”

सासूबाई डोळे मोठे करून विचारतात..

“उत्तर दिशेला माझं ऑफिस आहे..”

“अच्छा अच्छा…किती गं माझी काळजी….”

क्रमशः

Leave a Comment