सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 10 अंतिम

 

श्रद्धा ने असं काय सांगितलं असेल रमेश ला???
तर…श्रद्धा ने रमेश ला बाजूला नेलेलं आणि म्हणाली होती…

“तुम्ही माझ्यावर संशय घेऊ नका…नाहीतर…”

“नाहीतर काय?”

“नाहीतर…तुमची पापं सर्वांना सांगेन बाहेर…”

“क…को…कसली पापं??”

“आठवा… नीट आठवा… अशी पापं ज्याचा तुम्हाला आजही पश्चात्ताप होतोय..”

रमेश च्या डोळ्यासमोरून पूर्ण आयुष्याचा पट दिसू लागला..केलेली पापं आठवू लागली…

“ही खोटं बोलतेय..अन खरं असलं तर? उगाच आपण अतिआत्मविश्वास दाखवायचा…आणि हिने खरंच ओळखलं अन सर्वांना सांगितलं तर?? कशाला उगाच रिस्क?”

म्हणून रमेश सर्वांसमोर श्रद्धा चं कौतुक करतो अन विषय तिथेच संपवतो….

“बम बम बोले..ओम फट ह्रिम चामुंडा…”

मंदिरा बाहेर बसलेला तो माणूस आज अचानक घरी येतो….
श्रद्धा दार उघडते अन हळू आवाजात…

“काय रे आता काय हवं??”


“ताई… मारू नका…”

“मारत नाहीये…काय हवं सांग…”

“काही नाही…म्हटलं बघू काही मदत लागते का माझी..”

“मदत?? बरं ये आत..आई…बघा कोण आलंय..”

सासूबाई बाहेर येतात…बाबा ला बघून फारशी प्रतिक्रिया देत नाही..
बाबा स्वतः बोलायला लागतो..

“करणी…घोर करणी झालीये तुमच्यावर… ते पहा… अदृश्य आत्मा…दिसतोय मला…ए थांब थांब…”

बाबा त्याचे चाळे सुरू करतो…घरभर पळत सुटतो…सासूबाई त्याला थांबवायचा प्रयत्न करतात…पण त्याचा जणू अंगातच आलेलं… श्रद्धा सर्वांची गम्मत बघत होती…

अखेर सासूबाई त्याचा हात पकडतात आणि एक कानाखाली देतात…

श्रद्धा, केतन आणि बाबा ला धक्काच बसतो…चक्क सासूबाईंनी बाबा ला मारलं??

“अजून किती लोकांना वेड्यात काढशील?? बस झालं तुझं आता…अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतोस फक्त…लोकांना घाबरवतो…”

“आई अहो तो श्राप देईल…” श्रद्धा म्हणते…

केतन तिला बाजूला ओढून नेतो…”श्रद्धा आता बस कर… आईला सगळं माहितीये…”

“काय माहितीये?”

“त्या दिवशी आईने तुझं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं…आणि आईला समजलं की तू सर्वांना वेड्यात काढतेय, मनाचं काहीही जोडून तंत्र मंत्र लोकांना देते आहेस..”

“काय?? अरे पण त्याला किती दिवस झाले…आईंना सगळं समजलं असतं तर नंतर त्यांनी मी दिलेले उपाय करणं बंद केलं असतं….”

सासूबाई समोर येतात…

“पोरी…कुणाला जमलं नाही ते काम तू करून दाखवलस…मी अंधश्रद्धेच्या अगदी आहारी गेलेली…आणि त्यात तुही तशी म्हणून अजूनच खुश होते..पण सत्य समजलं अन मी विचार केला..की या पद्धतीला दुसऱ्या कोणी मुलीने कसं हातातलं असतं? मी करतेय ते चुकीचं होतंच, पण दुसऱ्या एखाद्या मुलीने भांडून, चिडून, वाईट साईट बोलून या गोष्टीला प्रतिकार केला असता…पण तुझा swag अन तुझी परिस्थिती हाताळायची पद्धत…खरंच मानलं तुला…माझ्याच पद्धतीने माझ्याकडून अश्या काही गोष्टी करून घेतल्यास की ज्याने या घरात शांतता नांदली, घरात लक्ष्मी येत गेली, तू तुझी नोकरीही केलीस अन मलाही व्यस्त ठेऊन वाईट विचार मनात आणू दिले नाहीत… वडाला फेऱ्या मारायला सांगून माझ्याकडून व्यायाम करवून घेतलास…माझ्या मैत्रिणींना उपदेश देऊन त्यांनाही कामाला लावलं आणि त्यांच्या घरातली भांडणं मिटली…लग्नाचा खर्च दोन्ही पक्षांनी अर्धा अर्धा वाटून घ्यायचा अशी समानतेची प्रथा तू घालून दिलीस….आणि अश्या कितीतरी गोष्टी केल्यास…पण तुझा हेतू चांगला होता….म्हणूनच मी जे चालू होतं ते चालू दिलं..”

श्रद्धा च्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी येतं…


“आई मला माफ करा…”

“नाही गं पोरी…मी तुझे हात जोडते…माझ्या डोळ्यावरची पट्टी तू दूर सारलीस…”

सासूबाई श्रद्धा समोर हात जोडून उभ्या असतात…इतक्यात श्रद्धा ची आई येते..

“श्रद्धे…बास झालं तुझं आता…केतन ची आई…तुम्हाला माहीत नाही…ही मुलगी तुम्हाला वेड्यात काढतेय..”

“खबरदार माझ्या सुनेला एक शब्द बोललात तर..”

सासुबाई पुन्हा धमकी देतात…केतन, श्रद्धा हसू लागतात…आईला नंतर सगळी हकीकत समजते तेव्हा तिच्या मनावरचं ओझं कमी होतं…

या सगळ्यात तो भोंदू बाबा पळ काढायचा प्रयत्न करतो..

सासूबाई त्याचा शर्ट पकडत त्याला खेचतात…”कुठे पळतोस…”

शर्ट जसा खेचला तशी त्याची पाठ उघडी पडते…पाठीवरची जन्मखून बघून सासूबाई एकदम मागे होतात…मन सुन्न होतं… त्यांचा विश्वासच बसेना…

“आई काय झालं??”

“राजू…राजू…माझा भाऊ…”

“काय?”

“हो..लहानपणी याला पळवून नेलेलं… त्याचा पाठीवर ची खून..अजून लक्षात आहे माझ्या…हा राजूच आहे..”

श्रद्धा त्या भोंदू बाबाला विचारते..

“काय म्हणणं आहे तुझं??”

“मला आई वडील आठवत नाही…एका मंत्रिकने मला त्याच्याजवळ नेलं आणि त्यानेच वाढवलं…पण हो, मरताना त्याने मला खरं खरं सांगितलं…पण मी कुठे अन कसा शोधणार ताईला??”

दोघा भावा बहिणीची गळाभेट होते..

सासूबाईं म्हणतात..”श्रद्धा..फक्त तुझ्यामुळे आज मला माझा भाऊ परत मिळाला…”

श्रध्दा त्या बाबाचा पाया पडायला जाते…

“ताई मारू नका..”

“अय्यो…असं कसं…मामसासरे तुम्ही माझे..मी कशाला मारेन..पाया पडते…”

केतन म्हणतो, “माझ्या मामांच्याच मागे लागलीये ही…दळवी मामा ला धारेवर धरलं… आणि आता..”

“काय गं सुनबाई..का माझ्या भावांची नावं घेतेस गं ??”

“शिस्त लावायला नको का सर्वांना? शेवटी…तुमची आई आहे मी…नाही का?”

समाप्त

1 thought on “सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 10 अंतिम”

Leave a Comment