सुख

 हिमालायतल्या उंच ठिकाणी एका तरुण ध्यानस्थाला विचारलं..

“तुम्ही सुखी आहात का?”

त्याचं तोंड पडलं, तो म्हणाला..

“पिढीजात आमच्याकडे इथे येऊन संन्यास घ्यावा लागतो, माझी ईच्छा नव्हती पण यावं लागलं..खरं तर मला तुम्हा माणसांसारखं आयुष्य जगायचं आहे, संसार करायचा आहे, आनंद उपभोगायचा आहे..” असं म्हणत तो समोरच्या एका संसारी पुरुषाकडे पाहू लागला.

त्या संसारी पुरुषाकडे जाताच त्याला विचारलं,

“भाऊ तू सुखी आहेस का?”

“नाही बुवा..समोर ती चारचाकी दिसतेय ना, तसा पैसा कमवायचा आहे मला..”

त्या चारचाकी वाल्याकडे गेलो, त्याला विचारलं,

“भाऊ तू सुखी आहेस का?”

“कसलं काय..मला त्या समोरच्या माणसासारखी सुंदर बायको हवी..”

त्या माणसाकडे जाताच त्याला विचारलं,

“भाऊ तू सुखी आहेस का?”

“कसलं काय, सुंदर बायको असून काय ऊपयोग.. तिला मूल होत नाही..समोर तो माणूस दिसतोय ना, 2 मुलं आहेत त्याला, तसं मला हवंय.”

त्या माणसालाही तेच विचारलं..

“भाऊ तू सुखी आहेस का?”

“कसलं काय, स्वतःचा बंगला पाहिजे मोठा त्याच्यासारखा.. अजूनही फ्लॅट मधेच राहतोय..”

बंगल्यात राहणाऱ्या माणसालाही विचारलं..तो म्हणाला..

“कसलं काय, माझा व्यवसाय अजून दहा करोड च्या घरात गेला नाही, त्या बिझनेसमन सारखं मिलियन मध्ये मला कमवायचं आहे..”

मिलेनियर कडे जाताच तो म्हणाला..

“कसलं काय, इतकं कमवूनही दहा उच्च श्रीमंतांच्या यादीत माझं नाव नाही..”

टॉप ला असणाऱ्या माणसाकडे जाताच तो म्हणाला..

“इतका व्याप आहे की जीवाला शांती नाही..सतत पळापळ.. जगायला वेळच मिळत नाही..समोर तो ध्यानस्थ बसलाय ना, त्याच्यासारखी मनःशांती हवीय मला..”

त्या ध्यानस्थाकडे जाताच तो म्हणाला..

“काय रे? पुन्हा कशाला आलास इथे हिमालयात??”

मी हसलो, म्हणालो..

“काही नाही, दुनिया गोल आहे हेच खरं..”

Leave a Comment