साबुदाण्याची खिचडी

ठिकाण: बेडरूम, वेळ सकाळी 9

(एक लग्न झालेली मुलगी ऑफिस ला जायची तयारी करत असते, तिच्या खोलीत तिची पर्स भरत असते आणि कानाला फोन लावलेला असतो, फोनवर बोलत असते…)

अगं आई हो…मला नसतं आवडलं का माझ्या सख्ख्या बहिणीच्या वाढदिवसाला यायला? पण समजून घे, माझी आज खूप महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिस मध्ये, मला जायलाच हवं…एक तर काल रात्री प्रेझेन्टेशन बनवत बसले आणि सकाळी 15 मिनिटं उठायला उशीर झाला, सगळं वेळापत्रक बिघडलं बघ…बरं चल ठेवते मी फोन…बाय…बाय..”

ती पटापट आवरून हॉल मध्ये येते, हॉल मधला पसारा आवरायला लागते, सासूबाई हॉल मधेच असतात, माळ जपत असतात आणि तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत असतात…

ओम शांती..ओम शांती…सर्वेत्र सुखीन संतु…सकाळी लवकर उठायला नको…सर्वे संतु निरामय….काय तोरा तो ऑफिस चा…सर्वे भद्राणी पश्यन्तु…असं म्हणत डोळे लावतात…ती सासूबाईंच्या गोळ्या एका ट्रे मध्ये काढून त्यांच्या जवळ ठेवते, पाण्याचा ग्लास झाकून जवळ ठेवते…ती पर्स खांद्याला लटकवते आणि सासूबाईंच्या पाया पडून दाराजवळ जाते…

ती दार उघडून बाहेर पडणार इतक्यात सासूबाई…

“अगं बाई…”

“काय झालं आई?”

“आज काय स्वयंपाक केलास?”

“मेथीची भाजी, मुगाची खिचडी.”

“मला तुला सांगायचं लक्षातच नाही बघ, आज उपास आहे माझा..”

ती घड्याळात बघते, खूप उशीर झालेला असतो..

ती सैरभैर होते… काय करू काय नको…कपाळावरचा घाम पुसते..

“आई आज खुप महत्वाचं काम आहे हो मला..आधीच उशीर झालाय..”

“हो हो..निघा…मी राहते उपाशी…माझं कुणाला काय पडलय..”

ती विचार करते, सावकाश आपली बॅग खाली ठेवते आणि किचन मध्ये जाऊन फराळ करायला लागते…

इकडे सासूबाईंचा फोन वाजतो..

“काय गं मेघा? अजून घरीच?? आज interview होता ना तुझा??”

तिकडून रडण्याचा आवाज..

“काय झालं बेटा???”

“अगं आई, मला आज उशिरा जाग आली…8 ला..”

“Interview 9 ला होता ना? मग झालं असतं की आवरून..”

“घरातली कामं होती गं..”

“तुझी सासू काय करत होती?? त्यांना सांगायचं ना..”

“त्यांना आज बरं नाहीये, मला घरीच थांबवलं त्यांनी..”

“काय?? तुझा interview आहे माहीत असून सुद्धा असं केलं त्यांनी???”

“हो ना..”

“काय सासुरवास आहे माझ्या लेकीला…” डोळ्याला पदर लावत त्या म्हणतात…

“ते सगळं जाऊदे, तू आधी आवर आणि निघ interview ला..”

“अगं आई पण… आईंनी साबुदाण्याची खिचडी करून मागितली होती…”

“चुलीत घाल खिचडी, तुझं भविष्य निर्भर आहे त्या interview वर…जा बरं..”

हे बोलत असतानाच त्यांचा समोर साबुदाण्याची खिचडी प्लेट समोर येते…आणि त्या खिचडी कडे बघतच बसतात..

“आई…आई…घ्या खाऊन घ्या, उपाशी राहू नका आणि गोळ्या वेळेवर घ्या…”

असं म्हणत ती निघून जाते…सासूबाईंच्या फोनवर “आई…आई…हॅलो…हॅलो..” आवाज येत राहतो…
सासूबाई तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघतच राहतात…आणि त्यांच्या डोळ्यातून नकळत पाणी येतं… त्यांना त्यांची चूक समजते

8 thoughts on “साबुदाण्याची खिचडी”

  1. इतक्या पटकन नाही लक्षात येत ती एक मानसिकता आहे सुने ला वगळता मुलीला स्वतंत्रपणे पाहणे पन छान आहे सासरच्या मंडळींनी विचार करून निर्णय घ्यावा

    Reply
  2. छान, पण इतक्या लवकर वा शक्यतो ही मानसिकता नाहीच बदलत कधी….

    Reply

Leave a Comment