साखळी

“आई मला जरा आराम हवा आहे..”

शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आई म्हणाली.
“अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामाच करायचा आहे..”
मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.
“आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार..”
अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामाच करायचा आहे..
मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.
“अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा..”
“अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामाच करायचा आहे…”
मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..
“अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या..थोडे दिवस फक्त, मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे..”
ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.
“अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला..”
“मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे…”
ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..
“आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी..”
“आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल, ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे..”
तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..
“मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार..”
“अगं आपली सुधा गर्भार आहे, माहेरी बाळंतपण करायचंय ना तिचं..”
मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..
“चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता आराम.”
“सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे..आरव ला सांभाळाल का?”
नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..
“चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार..”
“अगं ऐकलं का, गुडघे दुखताय माझे, उठवलं जात नाही..bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे..डॉकटर ने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का..”
नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य गेलं..आणि आराम करायचा राहूनच गेला..
एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव घेऊन गेला..अखेर तिला आराम मिळाला, अगदी दिर्घकाळाचा..!!!

https://www.facebook.com/irablogs/
लेख आवडल्यास माझ्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा.

Leave a Comment