समूहात वावरताना

 समूहात वावरतांना

आज खूप दिवसांनी आरतीची मावसबहीण तिला भेटायला आली होती. म्हणजे अगदी 3 वर्षांनी दोघीजणी भेटल्या होत्या, पण यावेळीही सरिता घाईतच होती, मिस्टरांना कसंबसं मनवून बहिणीला भेटायला ती आलेली, फक्त 15 मिनिटं बसायचं म्हणून तिचे मिस्टर तयार झाले होते. एका लग्नानिमित्त दोघेही आलेले पण जाता जाता बहिणीला भेटण्यासाठी सरीताने तगादा लावला होता. सरिताला बघून आरती अगदी सुखावून गेली, लहानपणी बहिणी कमी अन मैत्रिणीच जास्त होत्या दोघी. सगळं काही एकमेकांना सांगत असत, सरिता येताच आरतीने पटकन तिला आत घेतले, तिच्या मिस्टरांना पाणी दिलं आणि सरिताला घेऊन ती आत गेली. 

“काय गं फार घाईत आलीस, निवांत वेळ काढून यायचं की..”

“कसलं जमतं गं आता, आज सुद्धा कसंतरी जमवून आणलंय बघ..”

आरती हे ऐकत असतानाच तिला एका मैत्रिणीचा फोन आला, एका पदार्थाची रेसिपी विचारण्यासाठी. आरती तिच्याशी फोनवर बोलत बसली, इकडे सरीताच्या जीवाची नुसती घालमेल, मिस्टर कधी आवाज देतील सांगता येत नव्हतं आणि इकडे आरती फोन ठेवायला तयार नाही, खूप काही बोलायचं होतं तिच्याशी, खूप काही सांगायचं होतं पण आरती फोनमध्ये गढून गेलेली..शेवटी अर्धा तास झाला तरी फोन सुरूच, शेवटी सरिता आणि तिच्या मिस्टरांनी आरतीचा निरोप घेतला, अगदी टाटा करतानाही आरतीच्या कानाला फोन लागलेलाच होता. 

वरील प्रसंग एक प्रतिकात्मक प्रसंग आहे, पण अशी खूप उदाहरणं मी आजूबाजूला बघितली आहेत. चार माणसांमध्ये बसलो असता समोरच्या जित्या जागत्या माणसाशी बोलायचं सोडून फोनवर तिसऱ्याच माणसाशी बोलायला माणसाला फार अप्रूप वाटतं. आलेला प्रत्येक फोन घ्यायलाच हवा असं नसतं, महत्वाचे सोडले तर केवळ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांचे सहज केलेले फोन आपण टाळूही शकतो. भलेही त्यांनी त्यांच्या सोयीनुसार फोन केला असला तरी त्यावेळी आपण मोकळे असूच असं नाही, बऱ्याचदा त्यावेळेस आपण महत्वाच्या कामात असतो, घोळक्यात असतो, समूहात असतो, लोकांशी बोलत असतो..गरजेचं नाही की अश्यावेळी असे फोन उचलले गेलेच पाहिजे, आणि उचललाच तर “कामात आहे, नंतर बोलतो” असं बोलण्याचं सौजन्य तरी किमान दाखवावं. पण तसं न करता आजूबाजूचं भान न राखता खुशाल वायफळ बोलत बसणं समूहात शोभण्यासारखं नाही. घरी कुणी भेटायला आले असता त्यांच्याशी बोलणं सोडून तिसऱ्याच माणसाशी फोनवर गप्पा करत बसणं, कुणाला भेटायला गेलो असता वायफळ गप्पांचा फोन सुरू ठेवणं ही मानसिकता मला तरी पटत नाही.

दुसरी अजून एक बाब, समूहात राहताना समूहाचे नियम आपल्यालाही बांधील असतील याचा काहींना अगदी विसरच पडतो. आपण कुणीतरी स्पेशल आहोत, देवाने आपल्याला स्पेशल काहीतरी दिलं आहे अश्याच आविर्भावात ही मंडळी असतात. माझ्याच बाबतीतला एक प्रसंग, माझ्या मुलाला नुकतंच एका मोठ्या शाळेत नर्सरी साठी प्रवेश घेतला होता. कोरोना मुळे ऑनलाइन वर्ग चालणार होते, ते सुरू होण्यापूर्वी पालकांना काही सूचना देण्यासाठी एक व्हिडिओ मिटिंग ठेवली होती. त्यात शिक्षकांनी ऑनलाइन शाळेची वेळ जाहीर केली. आता साहजिक आहे की जी वेळ निर्धारित केली गेली आहे त्याच वेळेस शाळा होणार, त्या वेळेनुसार आपण आपलं वेळापत्रक आखणं भाग होतं, पण काही पालक मात्र “वेळ बदला, आमचं यावेळी ऑफिस असतं..”, “आमच्या घरी आम्ही दोघे जॉब ला असतो” , “माझ्या मिसेस ला यावेळी जमणार नाही, वेळ बदला..” अश्या आश्चर्यकारक विनंत्या येत होत्या. आता एका पालकाच्या जॉब साठी इतर मुलांची वेळ बदलणं शक्य आहे का? आणि आपल्यामुळे आपण इतर 30 मुलांचा वेळ बदलायला लावतोय हे त्यांना योग्य तरी वाटतं का? असो, स्वतःला “स्पेशल” समजणाऱ्या अश्या व्यक्तींना शेवटी प्रवाहात सामील होण्यावाचून गत्यंतर नसते..

एका सरकारी कामानिमित्त सरकारी ऑफिसमध्ये गेले होते, ती कर्मचारी आधीच कामाच्या व्यापाने वैतागलेली, आपल्याला आपलं काम व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्याशी नम्रतेने बोलून त्यांना सहकार्य करून पूर्णत्वास न्यायचं हे साधं गणित आहे. तिथे एक नखरेबाज मुलगी आपलं आधार कार्ड वर बदल करण्यासाठी आलेली, तिच्या ddocuments चा काही घोळ असल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी तिला सगळी documents आणायला लावली. पण ते न करता ती त्यांच्याशी हुज्जत घालू लागली, बाकीच्या लोकांनाही खोळंबून ठेवलं. झेरॉक्स करताना, पेन मागून घेतांना जणू तिची अडचण म्हणजे सगळ्यांचीच अडचण आहे असं मानून गाजवत होती. शेवटी तिथल्या कर्मचाऱ्यांकडून तिचा रितसर अपमान तर झालाच, पण अश्यावेळी हेही वाटलं की समूहात वावरताना कुठे नम्रपणे वागावं, आणि कुठे आक्रमक व्हावं याचं ज्ञान तिच्या घरच्यांनी द्यायला हवं होतं. Daddy’s girl म्हणून सगळं आयतं हातात मिळणाऱ्या आणि अंगावर साधा ओरखडा सुद्धा येऊ न देणाऱ्या पालकत्वात ही एक कमतरता राहून जाते. 

समूहात वावरताना तुम्हालाही अश्या तिरसट माणसांचा अनुभव आलाच असेल ना?

Leave a Comment