सत्य-2

घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन तिचं मत विचारलं,

आमचा पाठिंबा आहे म्हणून दोघांचा स्वीकार केला..

दोघेही सेटल झाले की लग्न करायचं असं ठरलं..

एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू झालं..

त्याचे आई वडील लांबच्या शहरात, तो शिकायला मिनाक्षीच्या शहरी,

त्यामुळे त्याचं येणं जाणं जास्त असे…

रोज मेसेज, फोनवर बोलणं..

एकही दिवस खंड पडत नसे..

एके दिवशी त्याचा मेसेज आलाच नाही..

तिला चुकल्याचुकल्या सारखं झालं…

तिने फोन केला..

कामात आहे म्हणत त्याने फोन ठेवला..

तिला वाईट वाटलं..

जाऊद्या कसल्यातरी टेन्शन मध्ये असेल..

पण पुन्हा तेच..

त्याचे मेसेज बंद झाले,

फोनवर मोजकच बोले,

नंतर तेही बंद..

त्याने फोन उचलणं बंद केलं..

दोघांचीही परीक्षा होती,

आता परिक्षेवर लक्ष देऊन नंतर याचा सोक्षमोक्ष लावू म्हणत तिने काही दिवस हा विचार बाजूला ठेवला..

परीक्षा झाली,

तिने त्याला भेटायचं ठरवलं..

फोन लावला, फोन बंद…

पुन्हा लावला..बंद..

दोन दिवसांनी लावला..बंदच!

ती हवालदिल झाली,

प्रेमाच्या आणाभाका घेऊन झालेल्या,

लग्नाची स्वप्न पाहून झालेली..

एकमेकांना वचनं देऊन झालेली…

आणि अचानक याचं हे वागणं?

तिची मानसिक स्थिती खालावली,

शरीर कृश होऊ लागलं..

कशातच मन रमेना..

तिने आईला सगळं सांगितलं..

आई म्हणाली,

“बाळा तू हे कितपत पचवशील भीती होती म्हणून तुला सांगितलं नाही..”

“काय? काय सांगितलं नाही?”

आई बोलताना थरथरत होती, जीभ जड झालेली..

“आई सांग पटकन, काय कळलंय तुला?”

“हेच, की त्याने तुला फसवलं..एका श्रीमंत आणि अतिशय सुंदर मुलीशी त्याची ओळख झाली आणि त्याने तुझ्याशी संपर्क तोडला…दोघेही लवकरच लग्न करणार आहेत..”

मिनाक्षीच्या पायाखालची जमीनच सरकली, आत्ताच्या आत्ता तिला देवाने उचलून न्यावं असं तिला वाटू लागलं.. डोकं बधिर झालं…शरीर स्तब्ध झालं..

आई डोळ्यात पाणी आणून सांगत होती..

“बाळा हेच सत्य आहे..”

तिचे डोळे लाल झाले, स्वाभिमान जागृत झाला आणि द्वेषाची ठिणगी पेटली..

“मी काय रस्त्यावर पडलेली वाटली काय त्याला? त्याला काय वाटलं, त्याने मला नाकारलं तर मी संपेल? आयुष्यभर कुढत राहीन? त्याच्या विरहात तडफडेन? अजिबात नाही…आता त्याला दाखवून देते, त्याच्याशिवाय मी आनंदी राहू शकेन, त्याच्याहुन दसपट सुयोग्य मुलगा आयुष्यात आणेन..”

आईने तिचं अवसान पाहिलं, आईला काहीसं बरं वाटलं…

लेकीने दुःखं पचवलं आणि नवीन मार्गही काढला..

कालांतराने घरच्यांनीच एक चांगलं स्थळ शोधलं..

मुलगा राजकुमाराला लाजवेल असा, जय पेक्षा कित्येक पटीने सुंदर…आणि मोठ्या पदावर…

मीनाक्षी त्याच्यावर प्रेम करू लागली,

म्हणजे प्रयत्न करू लागली, प्रेम करण्याचा..

कारण पहिल्या प्रेमाची सर दुसऱ्या प्रेमाला कशी मिळणार?

****

सत्य-3

2 thoughts on “सत्य-2”

Leave a Comment